Maharashtra Assembly Election 2024
घरसंपादकीयओपेडउमेदवारांचा अभ्यास कधी करणार आपण?

उमेदवारांचा अभ्यास कधी करणार आपण?

Subscribe

लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलीय. तरीही आपण जागे व्हायला तयार नाही. एखाद्या पुढार्‍याच्या दावणीला स्वत:ला बांधून घेत आपण खूप सहजपणे मिंधे होतो त्यांचे. पाळीव कुत्र्यागत ‘त्यांच्या’पुढे शेपटी हलवत बसतो. त्यांनी हाड म्हटलं की शेपटी झुकवून पळायचं. त्यांनी चुचकारलं की पुन्हा यायचं लाळ घोटत... डोळ्यांदेखत स्वप्नांची प्रेतयात्रा बघताना स्वाभाविकच फ्रस्ट्रेशन येतं. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यापेक्षा प्रलोभनं देणार्‍यांचा आधीच विचार केला तर? तसे होत नाही, म्हणूनच प्रत्येक निवडणुकीनंतर आपल्याला ‘सर्वसामान्य’ म्हणून गृहीत धरलं जातं. आपण ज्याचं काम केलं, ज्याला मत दिलं, तो आपल्याकडे नंतर ढुंकूनही पाहत नाही. मतदानाच्या दिवशी राजा असलेलो आपण मतमोजणीनंतर भिकारी होतो. तरीही प्रत्येक निवडणुकीत आपण त्यांची हुजरेगिरी करायला तयार असतो.

ते म्हणतात बॅनर बांधा,
आम्ही मुकाट्याने बांधतो..
ते म्हणतात, सतरंज्या अंथरा
आम्ही घरची कामे सोडून अंथरतो…
ते म्हणतात पत्रकं वाटा,
आम्ही इमाने-इतबारे वाटतो…
ते म्हणतात सभा आहे, गाडीत बसा
आम्ही गाडी गच्च भरेपर्यंत बसतो…
ते म्हणतात तुम्ही दमलात,
आम्ही लगेच दीर्घ सुस्कारा सोडून घाम पुसतो…
शेवटी ते म्हणतात आता दारू प्या,
दारू पिऊन आम्ही वाट्टेल तसा नंगानाच करतो…
ते म्हणतात म्हणून आम्ही करतो
ते म्हणतील ती पूर्व दिशा…
जणू आम्ही बुद्धी गहाण ठेवलीय त्यांच्याकडे
वा बुद्धीचं रिमोट कंट्रोल तरी दिलाय…

खरं तर निवडणूक काळात आपण ठामपणे कुणालाच झुगारून टाकत नाही. अशा काळात जी मंडळी भावनांशी खेळतात त्यांना दारातही उभं करायला नको, पण तितकीही धमक नसते आपल्यात. ज्यांना मोक्याच्या क्षणी लायकी दाखवायची असते त्यांचीच आपण पायकी करतो. त्यांनाच अगदी सहजपणे शरण जातो. अशावेळी कोणत्याच बाबतीत वैचारिक घोळ नसतो. ना नीतिमूल्यांबाबत ना तत्त्वांबाबत! आपल्याला फक्त या परिस्थितीचा फायदा उठवायचा असतो. दुथडी भरून वाहणार्‍या भ्रष्टाचाराच्या महापुरात आपण अगदी शेवटच्या क्षणी डुबकी मारतो अन् पाळीव कुत्र्यागत ‘त्यांच्या’पुढे शेपटी हलवत बसतो. त्यांनी हाड म्हटलं की शेपटी झुकवून पळायचं. त्यांनी चुचकारलं की पुन्हा यायचं लाळ घोटत…म्हणूनच प्रत्येक निवडणुकीनंतर आपल्याला ‘सर्वसामान्य’ म्हणून गृहीत धरलं जातं.

- Advertisement -

आपण ज्याचं काम केलं, ज्याला मत दिलं, तो आपल्याकडे नंतर ढुंकूनही पाहत नाही. मतदानाच्या दिवशी राजा असलेलो आपण मतमोजणीनंतर उपेक्षित होतो. तरीही प्रत्येक निवडणुकीत आपण त्यांची हुजरेगिरी करायला तयार असतो. आपण त्यांची हाजी-हाजी का करतो? तर म्हणे बेरोजगारांना रोजगार मिळतो, गरिबांना दाता मिळतो, तळीरामांवर मदिराक्षीची कृपा होते, मनातली वखवख भागवता येते, काही काळ तरी खिसे भरले जातात; पण इलेक्शननंतर काय? विषण्ण वैफल्य! एखाद्या गणिकेसारखं वापरून सोडून देतात आपल्याला. डोळ्यांदेखत स्वप्नांची प्रेतयात्रा बघताना स्वाभाविकच फ्रस्ट्रेशन येतं, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यापेक्षा प्रलोभनं देणार्‍यांचा आधीच विचार केला तर?

पात्रता असूनही नोकरीसाठी वशिला का लागतो? शासकीय भरती प्रक्रिया वादग्रस्तच का ठरते? सीईटीचे पेपर कसे फुटतात? जीवनयात्रा संपवण्याची बळीराजाची मालिका का संपत नाही? दुष्काळावर कायमस्वरुपी उपाययोजना का होत नाही? बेरोजगारीचा आकडा दिवसागणिक का वाढतोय? आपल्या महागड्या गाड्यांचा सत्यानाश कुठल्या महामार्गांमुळे होतो? पावसाळ्यात आमची घरंही तलावागत तुडुंब का भरतात? पाणी आरक्षणाबाबत सरकारचे एक धोरण का नसते? प्रदेशनिहाय सरकारची डोकी वेगवेगळी भूमिका का मांडतात? भूमिपूजनानंतर कामे का रखडतात? आचारसंहितेच्या आधीच कामांची घाईगर्दी का सुरू असते? संविधानाला धोका आहे असं अगदी सहजपणे का म्हटलं जातं? सत्तेतील दोन्ही पक्ष एकमेकांना जाहीरपणे विरोध का करतात? सत्तेचा मेवा खातानाच रस्त्यावर उतरून आंदोलने का केली जातात?

- Advertisement -

निवडणुकीच्या तोंडावर मित्र पक्षांत कमालीचे मतभेद उघड होऊनही केवळ निवडणुकीसाठी युत्या, आघाड्या होतातच कशा? सत्ताधार्‍यांना विरोध करायचा नैतिक अधिकार आहे का? ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांनाच पक्षाबाहेरचा रस्ता कसा दाखवला जातो? निवडणुकीत एखाद्या पक्षाचीच लाट कशी तयार होते? सभांना गर्दी होणार्‍या नेत्यांच्या पक्षांना मते का मिळत नाहीत? नेत्यांच्या नात्यात होणार्‍या आपापसांतील भांडणाचा फटका मतदारांना का बसतो? ऐन निवडणुकांच्या वेळी नेत्यांच्या डोळ्यांतील पाण्याकडे बघून सहानुभूतीची भावना का निर्माण होते? कायदेशीर प्रक्रियेला राजकीय झालर का लावली जाते? तपास यंत्रणांचा वापर राजकीय फायद्यांसाठी कसा केला जातो?

भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या नेत्याला विशिष्ट पक्षात गेल्यावर क्लीन चिट का मिळते? आमच्या बापजाद्याने वाढविलेली शहरं बाहेरून येणारा कुणीही दत्तक कशी घेऊ शकतो? ऐनवेळी पक्षात येणार्‍यांना खिरापतीसारखी तिकिटं का वाटली जातात? धर्मनिरपेक्ष पक्षातील मंडळी अचानक हिंदुत्ववादी का होतात? हिंदुत्ववादी धर्मनिरपेक्षांना कवेत का घेतात? कालपर्यंत विरोधाची तलवार मिरवणारे अचानक तलवार म्यान का करतात? ही मंडळी सत्ताधार्‍यांच्या कंपूत का जाऊन विसावतात? कालपर्यंत भर सभांमध्ये विरोधकांचे व्हिडीओ लावणारे अचानक भूमिका कशी बदलतात? जाती-जातीत भांडणे लावणारे साव कसे राहतात? आरक्षणासारख्या मुद्यांचा नेहमीच राजकीय फायदा घेणार्‍यांवर आपण विश्वास का ठेवतो? याचा आपण कधी विचार करणार आहोत का? खरं तर आपण याचा विचारच करत नाही. एखाद्याच्या बोलण्याने संमोहित होतो.

त्यातून चुकीच्या माणसाचा प्रचार करून आपण ही आफत ओढवून घेतो. निवडणुकीवेळी आपण प्रलोभनांना बळी पडतो. एरवी तत्त्वांच्या गप्पा मारत असलो तरी निवडणुकीत या तत्त्वांचा गाशा गुंडाळून तो अडगळीत टाकून दिला जातो. याच काळात माणसं ओळखता आली तर मतदारसंघाला एकाही प्रश्नाला सामोरं जावं लागलं नसतं.

मुळात आपण कुठली निवडणूक आहे हे समजून तरी किती घेतो? ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका यांचे प्रश्न वेगळ्या स्वरुपाचे असतात. मूलभूत सुविधांशी संबंधित हे प्रश्न असतात, तर विधानसभेच्या सभागृहाशी संबंधित प्रश्न वेगळे असतात. या प्रश्नांवर खरं तर लोकसभेच्या निवडणुकीत घसा कोरडा करण्यात फार काही हाशिल नाही. लोकसभेशी संबंधित मुद्दे हे अगदी वेगळे असतात. या मुद्यांचा लोकप्रतिनिधींना किती अभ्यास आहे हे सुरुवातीला बघायला हवे.

त्यानंतर आपणही या मुद्यांचा अभ्यास करून एका मतापर्यंत पोहोचायला हवे. यापूर्वी महागाई, बेरोजगारी, देशाचे वाढलेले वा घटलेले दरडोई उत्पन्न, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, मूलभूत सोयीसुविधांचा अभाव हे निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे असायचे, पण आता? अमूक पक्ष तमूकने फोडला म्हणून फलाना एकटा पडला.. म्हणत आपले डोळे पाणावतात. या पाणावलेल्या डोळ्यांना मग महागाई दिसत नाही की बेरोजगारी.. शेतकर्‍यांच्या आत्महत्या दिसत नाहीत की दरडोई उत्पन्न..आपण त्यांच्या भावनिक आवाहनात वाहून जातो.

ज्ञानाचं पहिलं काम असत्य जाणून घेणं आहे; तर दुसरं सत्याला जाणणं आहे. म्हणूनच आपण उमेदवारांचा लौकिकाथार्र्ने अभ्यास करायला हवा. शाळेतल्या शेवटच्या बाकावर बसणार्‍या मठ्ठ मुलासारखा जो सभागृहात ढिम्म बसतो, ज्याला नागरिकांच्या कुठल्याच प्रश्नाची तमा नसते, जो प्रश्न बाजूला ठेवून टक्केवारीचीच समीकरणं जुळवत असतो आणि जो समाजकारणापेक्षा राजकारणातच अधिक नाक खुपसतो अशांसाठी काम करताना शंभरदा विचार करायला हवा. आपण भूतकाळाची पुनरावृत्ती तर करत नाही ना? अर्थात निवडणूक काळात कुणाचं कामच करू नये असाही याचा अर्थ होत नाही. किंबहुना निवडणुकीत प्रत्येकानेच सक्रिय होणं गरजेचं आहे.

प्रत्येक सुजाण तरुणाने या प्रक्रियेत हिरीरीने सहभाग घ्यायला हवा. लोकांनी लोकांसाठी चालवलेल्या या देशात खरी सत्ता लोकांच्याच हाती आहे. त्यामुळे या सत्तेला विधायक परिमाण देण्यासाठी या प्रक्रियेत उतरायला हवं. उमेदवाराचं शिक्षण काय? त्याचं चारित्र्य कसं? त्याच्यातले सद्गुण-दुर्गुण कोणते? सामाजिक कार्यात त्याचा आजपर्यंतचा सहभाग काय? त्याच्या बोलण्यात आणि कृतीत किती फरक आहे? मतदारसंघातील प्रमुख समस्यांची त्याला किती जाण आहे? निवडून आल्यावर मतदारसंघाच्या विकासाची त्याला किती आब असेल? या सर्व प्रश्नांचे ठोकताळे पडताळून मगच आपण कामाला लागावं.

एखाद्या पक्षाकडे बघून या प्रक्रियेत उतरण्यापेक्षा उमेदवाराकडे बघून त्यात सहभागी व्हावं. कदाचित तो पैशांअभावी, मनुष्यबळाअभावी एकटाही असेल. अशावेळी आपल्याला त्याच्याभोवती समूह तर करता येईल. मग या समूहाचा समाज जागृती आणि त्याचबरोबर मतदार जागृतीसाठी उपयोग करून घेता येईल. आपली ही सेवा प्रचारापुरतीच मर्यादित न राहता मतदान काळातही सक्रिय असायला हवी. प्रत्येक बुथवर आपली माणसं असावी. प्रत्येक मतदाराला त्याच्या हक्कांची जाणीव करून द्यावी. डोळ्यांवर झापडं बांधून कोणत्या एका चिन्हावर शिक्कामोर्तब करून अजाणतेपणे मूलभूत हक्क उपभोगणार्‍यांमध्ये जागृती घडवायला हवी. मतदानाचा केवळ टक्का वाढविण्यासाठी नव्हे तर मतदान शंभर टक्के कसे होईल यासाठी प्रयत्न करायला हवेत!

उमेदवारांचा अभ्यास कधी करणार आपण?
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -