Eco friendly bappa Competition
घर संपादकीय ओपेड कुठल्या शिवसेनेला मिळेल जनतेचा आशीर्वाद?

कुठल्या शिवसेनेला मिळेल जनतेचा आशीर्वाद?

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या सोबतीने राज्यात सरकार स्थापन केले. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, असे एकनाथ शिंदे सतत म्हणत आहेत. शिंदे मुख्यमंत्री झाले इथपर्यंत बर्‍याच शिवसैनिकांनी पटवून आणि रुचवून घेतले, परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरेंना डावलून शिंदे गटाच्या हातात शिवसेना सुपूर्द करण्याचा दिलेला निर्णय बहुतांश शिवसैनिकांना पटलेला दिसत नाही. त्यामुळे कुठल्या शिवसेनेला शिवसैनिकांचा आशीर्वाद मिळतो, ते पुढील काळात दिसेल.

शिवसेनेतील बंडखोरी आणि पाठोपाठ आलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शिवसेनेत आडवी-उभी फूट पडली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या हाती अधिकृतरित्या सुपूर्द केल्यापासून शिंदे गटाच्या राजकीय वर्चस्वाला आता कायद्याचे कवच प्राप्त झाले आहे. परिणामी आम्हीच शिवसेना आहोत, असा छातीठोक दावा करणार्‍या शिंदे गटातील नेत्यांनाच नव्हे, तर भाजपच्या राजकीय धुरिणांनाही वेगळेच स्फुरण चढले आहे, तर दुसरीकडे निवडणूक आयोगाचा निर्णय अमान्य असलेल्या ठाकरे गटाकडून या निर्णयाला अपेक्षितरित्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सत्तासंघर्षाच्या पेचासोबतच शिवसेना कुणाची? या तांत्रिक पेचावर आता सर्वोच्च न्यायालयाचा निकालच तो काय अंतिम असेल, अशी आशा ठाकरे गट अजूनही बाळगून आहे.

- Advertisement -

शिवसेनेबाबतचा हा निकाल नेमका कधी लागेल आणि कुणाच्या बाजूने लागेल यावर सद्य:स्थितीत तरी कुणाला काहीच भाष्य करता येणार नाही, मात्र या सगळ्या तांत्रिक लढाईशी घेणे देणे नसलेले स्थानिक पातळीवरील सर्वसामान्य शिवसैनिक मात्र पक्ष नेतृत्वातील बदलामुळे पार गोंधळून गेलेत. शिंदे गटाच्या शिवसेनेत आपले राजकीय भवितव्य सुरक्षित की ठाकरे गटाच्या शिवसेनेत अशा संभ्रमावस्थेतच अर्धे शिवसैनिक शिंदे गटात तर अर्धे शिवसैनिक ठाकरे गटात विभागले गेले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी वा नेत्याशी निष्ठा ठेवत दोन्ही गटात विभागले गेलेल्या शिवसेनेचे काम या शिवसैनिकांकडून चोखपणे सुरू असले, तरी त्यांच्या मनातली घालमेल थांबलेली नाही.

राजकीय पक्ष मग तो कुठल्याही विचारधारेचा का असेना तो वाढतो, विस्तारतो केवळ कार्यकर्त्यांच्या जीवावर आणि त्यांच्याच जोरावर. कार्यकर्त्यांचे जाळे तळागाळाला जितके मजबूत तितके पक्षसंघटनही मजबूत. पक्षाच्या वरच्या फळीतील नेता कुठलीही निवडणूक लढवत असू दे, प्रत्येक घरातील मतदाराचे मत मतपेटीपर्यंत खेचून आणण्याचे काम करतात ते पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेच. याची पुरेपूर जाणीव असलेले कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज्याच्या कानाकोपर्‍यात तयार केले होते, परंतु सत्तासंघर्षाच्या लढाईत विभागले गेलेले हेच शिवसैनिक आता शाखा ताब्यात ठेवण्यावरून एकमेकांना भिडू लागले आहेत. एकमेकांची डोकी फोडू लागले आहेत. स्वत:ला निष्ठावंत म्हणत दुसर्‍यावर आरोपाचे बोट उगारू लागले आहेत. अशा तर्‍हेने एकमेकांमध्येच विभागले गेलेल्या शिवसैनिकांना पुन्हा आपल्याकडे खेचून पक्ष संघटनेची शक्ती बळकट करण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांपुढेही उभे राहिले आहे. ज्यावेळी राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी आपला वेगळा पक्ष स्थापन केला तेव्हा शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेचे दोन मुख्य नेते वेगळे झाले होेेते, पण शिवसैनिक एकच होते. त्यांच्या मनाची द्विधा अवस्था झालेली होती. त्यामुळे कोणता झेंडा घेऊ हाती, असा पेच त्यांच्यासमोर उभा राहिला होता. कारण आजवर हातात हात आणि गळ्यात गळा घालून काम करणारे शिवसैनिक विभागले गेले होते.

- Advertisement -

शिवसेना या मराठी माणसांच्या संघटनेची फाळणी त्यांना असह्य होत होती, पण नेतेच विभागले गेल्यामुळे ते काही करू शकत नव्हते. या फाळणीमुळे पुढे शिवसैनिक विभागला गेला आणि आपापसात लढू लागला तेव्हा शिवसेनेचे राजकीय नुकसान झाले. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक खासदार, आमदारांनी बंड केल्यामुळे शिवसेना नव्या संकटात सापडली आहे, त्यामुळे शिवसैनिकांमध्ये पुन्हा कोणता झेंडा घेऊ हाती, असा पेच निर्माण झालेला आहे.
ठाकरे गटाला तर निवडणूक आयोगाने विरोधात दिलेल्या निकालाचा मोठाच फटका बसलेला आहे. ना पक्षाचे नाव सोबत ना पक्षचिन्ह. अशा दोलायमान स्थितीत नव्याने पक्ष बांधणी करण्याचे ध्येय समोर ठेवून सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. उरल्यासुरलेल्या नेत्यांची मोट बांधून ठाकरे गटाने नियोजनपूर्वक जनसंपर्काला सुरुवात केलेली आहे. पक्षफुटीनंतर तात्काळ काढण्यात आलेल्या महाप्रबोधन यात्रेला तळागाळातील शिवसैनिकांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला होता. हे हेरून ठाकरे गटाकडून एकापाठोपाठ एक करत शिवसंवाद यात्रा, निष्ठा यात्रा आणि आता शिवगर्जना यात्रा अशा जनसंपर्क यात्रा काढल्या जात आहेत. प्रत्येक यात्रेची जबाबदारी ठराविक नेत्यांवर सोपवून अत्यंत नियोजनपूर्वक राज्यातील महत्त्वांच्या पॉकेट्समध्ये पक्ष विचारांचा प्रसार सुरू आहे.

खासकरून शिंदे गटातील मंत्री, आमदार आणि खासदारांचे मतदारसंघ टार्गेट करून ठाकरे गटाकडून या यात्रा काढल्या जात आहेत. खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, अरविंद सावंत, सुषमा अंधारे यांच्या यात्रांना तळागाळातील शिवसैनिकांकडून जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या नेत्यांच्या भाषणाला उचलून धरले जात आहे. भाषणे कार्यकर्त्यांमध्ये व्हायरल होत आहेत. कधी चिमटे तर कधी तीक्ष्ण शाब्दिक बाणांनी शिंदे गटातील नेतेही घायाळ होत आहेत. पुढे याच वाक्याला वाक्य भिडून शिंदे आणि ठाकरे गटातील नेते हमरीतुमरी करत एकमेकांच्या अंगावर धावून जात आहेत.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले, एकनाथ शिंदे यांनी भाजपला सोबत घेऊन शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन केले आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवले. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे असे म्हणत स्वत: मुख्यमंत्रीपदाचा मुुकुट डोक्यावर चढवला. इथपर्यंत बर्‍याच शिवसैनिकांनी पटवून आणि रुचवून घेतले, परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरेंना डावलून शिंदे गटाच्या हातात शिवसेना सुपूर्द करण्याचा निर्णय बहुतांश शिवसैनिकांना पटलेला दिसून येत नाही. शिवसेना ही ठाकरेंचीच अशी भावना अजूनही तळागाळातील शिवसैनिकांच्या मनात आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय शिवसैनिकांना अन्यायकारक वाटत आहे. त्यामुळे हळुहळू का होईना परंतु ठाकरे गटाच्या यात्रांना मिळणारा प्रतिसादही वाढतानाच दिसत आहे. काल परवाची उद्धव ठाकरेंची खेडमधील सभा हे त्याचेच निदर्शक म्हणावे लागेल. खेड हा शिवसेना नेते रामदास कदम यांचा बालेकिल्ला समजला जातो. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि कुटुंबावर अत्यंत शेलक्या भाषेत टीका करत पक्ष सोडला, किंबहुना साथ सोडली.
आपल्याला आणि आपला मुलगा योगेश कदम याला राजकारणातून हद्दपार करण्यासाठी ठाकरेंनी बरेच प्रयत्न केले. त्यासाठी अ‍ॅड. अनिल परब यांनाही कामाला लावले. आता थेट मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरातून लोक जमवून खेडमध्ये सभा घेतली याचा अर्थ ठाकरेंनी आपली धास्ती घेतल्याचा दावा रामदास कदम यांनी केला, परंतु उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर मात्र त्यांच्या दाव्यातील सर्व हवा निघून गेली. खेडमध्ये मागील बरीच वर्षे बघितली नाही, इतकी विराट सभा उद्धव ठाकरे यांची झाली, हे खुद्द स्थानिकांनी मान्य केले. खेडमधील गोळीबार मैदानात उद्धव ठाकरेंची तोफ खर्‍या अर्थाने धडाडली. निवडणूक आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही.

निवडणूक आयोग एखाद्या पक्षाला नाव देऊ शकते, चिन्ह देऊ शकते, परंतु पक्ष देऊ शकत नाही, हे अत्यंत मार्मिक वाक्य या सभेत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना उद्देशून काढले. हा पक्ष माझे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केला होता. ज्याप्रकारे बाळासाहेब ठाकरे मोठ्या अभिमानाने मी प्रबोधनकारांचा पुत्र आहे, असे म्हणायचे त्याचप्रमाणे मीदेखील मी बाळासाहेबांचा पुत्र असल्याचे अभिमानाने सांगतो, यात चुकीचे काहीच नाही, असे उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला.
ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये सभा होती, त्याच दिवसापासून ठाकरे गटाच्या शिवगर्जना यात्रेला टक्कर देण्यासाठी मुंबईत भाजप-शिवसेना युतीच्या आशीर्वाद यात्रेलाही सुरुवात झाली. घाटकोपर पश्चिमेकडील अमृतनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आशीर्वाद यात्रेचा पहिला टप्पा सुरू झाला. या यात्रेचे नेतृत्व मुंबई भाजपचे अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार आणि खासदार मनोज कोटक यांनी केले. या यात्रेत आशिष शेलार अयोध्येतून आणलेला धनुष्यबाण उंचावून दाखवत होते. एकहाती विधानसभा, लोकसभा जिंकण्याचे टार्गेट समोर ठेवलेल्या भाजप नेत्याने युतीतील सहकार्‍याचे पक्षचिन्ह झळकावणे ही सध्याच्या घडीला तरी मोठीच बाब म्हणावी लागेल.

बहुसंख्य भाजप कार्यकर्त्यांच्या गर्दीत सायंकाळी आशीर्वाद यात्रेच्या दुसर्‍या टप्प्यात वरळी ते मुंबादेवी अशी यात्रा काढण्यात आली. या यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांच्यासहीत सहभागी झाले होते. आपल्या बाळासाहेबांचे हिंदुत्व, शिवसेना आणि धनुष्यबाण आमच्याकडे आहे, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आशिष शेलार म्हणाले. हे त्यांचे म्हणणे खरेच आहे, परंतु आगामी मुंबई महापालिका, विधानसभा आणि पुढे लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी सर्वसामान्य जनतेचा किंबहुना शिवसैनिकांचा जो आशीर्वाद या दोन्ही पक्षांना अपेक्षित आहे. तो आपल्या बाजूने कितपत आहे, याचाही त्यांनी अंदाज घेतलेला बरा.

 

 

 

 

- Advertisment -