-संजय सोनवणे
दुपारी एक दीडची वेळ, मुंबईला जाणारी १ वाजताची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस फास्ट लोकल बदलापूरहून पकडली. उल्हासनगरला अशोक अनिल थिएटरमध्ये आजचे चित्रपटाचे खेळ थांबवल्याचं समजलं, त्याठिकाणी सगळ्या स्क्रिन्स भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी आरक्षित केल्या असल्यानं तरुण-तरुणींची गर्दी थिएटरकडे निघाली होती, मुंबई, ठाण्यातही अनेक सिंगल आणि मल्टीप्लेक्समध्येही फायनल मॅच दाखवली जात होती. आजचा दिवस कोणीही सुपरस्टार नसतं, क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल म्हणजे भारतीयांसाठी राष्ट्रीय एकात्मतेचा उत्सव असतो. लोकलमध्ये एकाच्या मोबाईलमध्ये डोकावणारे अनेकविध प्रवासी या दिवशी पहायला मिळतात, ज्याच्या मोबाईलमधून सामना पाहिला जात असतो त्याच्या चेहर्यावरही कृतार्थतेची भावना होती. लोकल ट्रेनमध्ये विविधरंगी जगणारी माणसं रोजच भेटतात, क्रिकेट वर्ल्डकपच्या दिवशी या विविधतेत पाहिलं जाणारं ऐक्य आणि माणूसपणाचा रंग देशाच्या राष्ट्रध्वजाच्या रंगांत मिसळून गेलेला असतो. सामना सुरू झाला तेव्हा अचानक सगळा लोकल डब्बा जिवाच्या आकांताने पकडलेल्या ट्रेनसीवरून उभा झाला, क्रिकेटच्या अंतिम सामन्याआधीच राष्ट्रगीत सुरू झालं होतं, त्यानंतर भारतमाता की जयच्या जयघोषानं पुन्हा सगळे आपापल्या शेजारच्याच्या मोबाईलमध्ये डोकावू लागले.
क्रिकेटचा शोध जरी भारतावर दीडशे वर्षे राज्य करणार्या इंग्रजांनी लावला असला तरी खेळाची ही परंपरा भारताने स्वातंत्र्याआधीपासून जोपासलेली असते. क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलपर्यंत भारत पोहचला असल्यास सगळेच लगानमधले ‘भुवन’ झालेले असतात, मग समोरचा संघ कोणताही असो, रविवारच्या भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यातही भारतीय क्रिकेटप्रेमी ‘भुवन’च्या भावनेनंच सहभागी झाला होता. भारत-पाकिस्तान सामन्यातला हायव्होल्टेज उत्साह अलीकडच्या काळात प्रेक्षकांच्या खिलाडूवृत्तीमुळे कमी झालेला आहे. पाकिस्तानच्या आतताई तिरस्काराच्या जागी जंटलमन गेम्समधील सभ्यपणा दाखल होऊ लागला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाचा दबदबा या विश्वचषकातही कायम आहे, मात्र सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये असल्याने या सामन्याचे राजकीय धोरणही चर्चिलं जात आहे, क्रिकेट सामान्यांचे हे साईड इफेट्सही महत्वाचे आहेत. राज्यातला आरक्षणाचा प्रश्न, न्यायालयातील आमदार अपात्रतेचा विषय, महागाई, इंधन दरवाढ, दिवाळीत न मिळालेल्या बोनसचा विषय रविवारी चर्चा करण्यास वर्ज्य आहेत, हा एक दिवस भुलीचा असतो, क्रिकेटचा फिव्हर अनेस्थेशियासारखा असावा, लोकांच्या रोजच्या प्रश्नांतून येणार्या चिंता वेदनांतून काही काळापुरती भूल मिळण्यासारखा, हा कैफ, ही नशा रोजच्या विवंचनांनी भरलेला भवताल विसरायला लावते.
समाज माध्यमांवरही क्रिकेट फायनल सामन्याचे परिणाम दिसत असतात. हा अंतिम सामना गुजरातच्या अहमदाबादेतल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचं नाव बदललेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झाल्याने आता अगदी देव जरी ऑस्ट्रेलियाच्या बाजूने बॅट घेऊन खेळायला उतरला तरी भारतच जिंकणार, असे म्हणणार्यांचा अतिउत्साही गट असतो, तर ज्यांच्या नावाने नव्याने नामकरण झालेलं आहे, ते प्रत्यक्ष या अंतिम सामन्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असणार आहेत, त्यामुळे चांद्रयान मोहिमेसारखंच या सामान्यातही आपणच जिंकणार, हा ‘मास्टरस्ट्रोक’ असल्यानं भारतीय संघाकडून खेळण्याची औपचारिकता उरली असल्याची मिश्कील उपरोधिक चर्चाही रंगलेली असते. सोशल मीडियावर या सामन्यामुळे थेट दोन गट पडलेले असतात. चांद्रयान मोहिमेच्या यशस्वीतेसारखा केवळ केंद्रातल्या सत्ताधार्यांना भारताच्या विजयाचा लाभ मिळू नये, म्हणून कांगारुंनी जिंकावं, अशी घोषणा करणारेही समाजमाध्यमांवर सक्रिय असतात, तर अशांची थेट ऑस्ट्रेलियाला पाठवणी करण्यासाठी त्यांचा व्हीजा आणि पासपोर्ट तयार असल्याचे सूचित करणारे असतात. सोशल मीडियावर मिम्स केले जातात, यंदाच्या क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात वापरल्या जाणार्या चेंडूमध्ये मायक्रोचिप बसवलेली असून ती भारत कमकुवत स्थितीत आल्यास अशा आपत्काळात चांद्रयान मोहिमेतल्या अंतराळ यानाकडून देशाच्या सर्वोच्च राजकीय सत्तेकडून ऑपरेट केली जाणार आहे, त्यामुळे पराभवाची चिंताच नको, याशिवाय स्टेडियमच्या मैदानात जरी हा खेळ जरी भारत-ऑस्टे्रलियादरम्यान असला तरी यात केंद्र आणि विरोधक यांच्यातला हा स्टेडियमबाहेरील राजकीय सामना असल्याची ‘क्रिकेटची राजकीय चर्चा’ समाजमाध्यमांवर पहायला मिळते. हा सामना सुरू असताना अचानक मैदानातल्या पिचवर एक क्रिकेटरसिक दाखल झाला, त्याने विराट कोहलीशी बोलण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीने पॅलेस्टीनचं समर्थन करणारे शब्द लिहिलेलं टी-शर्ट परिधान केलं होतं. यावरूनही समाजमाध्यमांवर पॅलेस्टिन आणि इस्त्राईल समर्थकांमध्ये महायुद्ध पेटलं होतं. क्रिकेटच्या खेळाला महायुद्ध बनवण्याचं काम इथल्या माध्यमांनी खूप आधीच केलेलं आहे. हायव्होल्टेज, स्फोटक, ज्वर, वॉर असले शब्द बनवून सभ्य माणसांच्या खेळाच्या स्टेडियमचं रणांगणात रूपांतर कधीच झालेलं आहे. या रणांगणाला निर्णायक युद्धभूमी समाजमाध्यमांनी बनवली आहे. क्रिकेट रसिकांनो सामना पाहताना आपापली हृदये संभाळा, रक्तदाब वाढू देऊ नका, असा काळजी करणार्यांचा गटही सक्रिय झाला आहे. दुसरीकडे या खेळातून आपल्याला काय मिळणार? उद्या पुन्हा कामावर जायचंच आहे, आपले पोटापाण्याचे प्रश्न भारत जिंकला तरी सुटणार आहेत का? असंही ‘निराशावादी’ बोलणारे सक्रिय झाले आहेत.
या आधीच्या उपांत्य फेरीत मोहम्मद शामीनं 7 बळी घेतले, आता अंतिम सामन्यात तो काय करतो बघू? शामीच्या नावातील ‘मोहम्मद’पणाला विरोध करणारेही होतेच. तर भारत-ऑस्टे्रलियाच्या सामन्यात भारताच्या विजयासाठी हनुमान चालिसा पठण, होमहवन करणार्यांचे करणार्यांचे गटही सक्रिय झाले होते. केवळ क्रिकेटपुरते खेळभावनेला खेळासारखे घेतले जात नाही, असा विषय चर्चेपुरताच चर्चिला जातो, गोर्या साहेबांच्या देशातून आपल्याकडे आलेल्या क्रिकेटवर या देशाचं इतकं प्रेम आहे की, इथल्या कबड्डी, खो-खो आणि हॉकी या स्वदेशी खेळांनाही उपरेपणाची भावना यावी. अगदी ऑलिम्पिकमध्येही देशानं सुवर्ण, रजत, कांस्य पदक पटकावल्यानंतरही इतकं कौतुक होत नाही. ऑलिम्पिक खेळून देशात परतलेल्या खेळाडूंच्या स्वागतासाठी विमानतळावर तुरळक मोजकी अशी औपचारिक सनदी गर्दी असते, तर क्रिकेटामध्ये जिंकलेल्यांसाठी हार तुर्यांची झुंबड उडालेली असते. विश्वचषक जिंकणार्यांची त्या-त्या शहरातून विजयी मिरवणूक काढली जाते, मात्र पराभव झाल्यावर याच खेळाडूंच्या घरावर हल्ले झाल्याचे प्रकारही आपल्या देशात नवे नसतात.
क्रिकेटने माणसं काही काळापुरती होईना जोडली जातात, त्यांना त्यांच्या सुख-दुःखांचा विसर पडतो. एरवी आपापल्या कोशात जगणारी, घर, कुटुंब, नोकरी-भाकरीच्या लढाईत जुंपलेली ही सामान्य-अतिसामान्य, मध्यमवर्गीय, कामगार, मालक, व्यावसायिक, सधन, गरीब, स्त्री-पुरुष, लहान-मोठे एकाच पातळीवर येतात. जसे देवालयाच्या एकाच रांगेत सगळे आपापले विविधपण विसरून एकाच भक्तीभावाने तासंतास थांबलेले असतात, हे थांबणं असंच असतं, क्रिकेटच्या महाअंतिम सामन्यातही सातत्याने धावपळ करणारा देश मनाने या सामन्यापुरता थांबलेला असतो. भारत जिंकल्यास सामान्य माणसाकडून मारुतीला २१ नारळ अर्पण करेनपासून एखाद्या महिला सेलिब्रिटीकडून विवस्त्र होऊन एखाद्या चौपाटीवर धावण्यापर्यंतची आमिषं नियतीला दाखवली जातात. तर हे सगळे सामने अर्थातच फिक्स असल्याचा आरोपही होतोच, भारत ही जगासाठी उपयुक्त बाजारपेठ असल्याने हे सगळं चालवलं, घडवलं जात असल्याचा आरोप आणि त्याचे होणारे खंडनही नवे नसते.
भारतासोबत असलेल्या महत्वाच्या क्रिकेट सामान्यात श्रद्धा, अंधश्रद्धा, मान्यतांना ऊत आलेला असतो, विशिष्ट ठिकाणी बसूनच मॅच पाहिल्यास आपण जिंकतोपासून मद्यगृहात विशिष्ट नंबरचा टेबल बूक करण्यापर्यंतच्या मान्यता असतात, अमूक रंगाचे कपडे परिधान करणे, उपवास आदी प्रकार केले जातात. खेळाला खेळासारखं न घेण्यामागे गुंतवलेल्या मानवी जाणिवा या खरंतर कमकुवत मनाचं लक्षण असावं, भारत जिंकतो म्हणजे नेमकं कोण जिंकतो, या देशातला पिचलेला आणि विकासाचा अपेक्षाभंग झालेला आणि जगण्याच्या लढाईत नेहमीच छोट्या मोठ्या तडजोडी करणार्याला, जगण्याच्या स्पर्धेत अपयशी होणार्या प्रत्येकाला अशा सामन्यातून जिंकण्याचा ‘फिल’ मिळतो. देश जिंकला म्हणजेच मी जिंकलो, जिंकण्याची ही प्रबळ इच्छा ही सातत्याने आलेल्या भवतालच्या पराभवाविरोधातील माणसाच्या मनात चाललेल्या शीतयुद्धाविरोधात केलेले बंड असते. स्पर्धेत समोरच्याला हरवल्याशिवाय माझं जिंकणं अशक्य आहे, हे युद्धतत्वज्ञान खेळातही त्यामुळेच आणलं जातं. सामान्य माणसांच्या जगण्यातल्या नेहमीच्या हाराकिरीच्या वेदनेतून जिंकण्याचा उसना अनेस्थिशिया म्हणजेच क्रिकेटचा ज्वर असतो. या ज्वराला देशप्रेमाचं कोंदण लावलं जातं, देशभक्तीची रंगीत झालर लावली जाते, या निमित्तानं आपल्या देशातील स्वातंत्र्याच्या चळवळी आणि युद्ध संस्कृतीच्या विजयाचा उत्सव साजरा केला जातो. एकाच दिवसाचा हा विजय या देशातल्या नागरिकांना सुखावून जातो, हे सुखावणं एका मोठ्या दुःखाच्या रखरखीत वाळवंटातल्या गोड्या नितळ पाण्यासारख्या हिरव्यागार ‘ओयासिस’ सारखं असतं. हार असो वा जीत, क्रिकेट सगळ्या भारतीयांना एकजूट करत असते, हे वास्तव आहे.