आठवडाभरापासून अनेक घडामोडींमुळे जगभरात पाकिस्तानचीच चर्चा सुरू आहे. मंगळवारी इस्लामाबादमधील डी चौकावर कब्जा घेताना पाकिस्तानी सैनिकांनी केलेला गोळीबार, अश्रुधुराचा मारा यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्व घडामोडींनंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या तेहरिक-ए-इन्साफ म्हणजेच ‘पीटीआय’ पक्षाने आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.
पाकिस्तानमध्ये कायम अराजकता असते. आताही शरीफ सरकारविरोधात इम्रान खान यांनी तुरुंगातून रस्त्यावर लढा उभारला आहे. त्यामुळे याचा मोठा झटका पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. हे सर्व प्रकरण काय आहे, हे जाणून घेण्यापूर्वी तत्पूर्वीच्या काही घडामोडींची माहिती करून घेणे गरजेचे आहे.
19 नोव्हेंबर 2024
खैबर पख्तुनख्वा प्रांतात दहशतवादविरोधी कारवाईत लष्कर-ए-इस्लाम या दहशतवादी संघटनेचे 9 दहशतवादी मारले केले. यात दोन कमांडरचा समावेश आहे. त्याच वेळी ८ सुरक्षारक्षकदेखील मारले गेले. येथील बन्नू जिल्ह्यातील 7 पोलिसांचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. त्यांचा शोध घेताना ही चकमक घडली.
21 नोव्हेंबर 2024
याच खैबर पख्तुनख्वाच्या कुर्रम भागात एका व्हॅनवर दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी या प्रवासी व्हॅनवर बेधुंद गोळीबार केला. यात 9 वर्षांच्या मुलीसह तब्बल 50 प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यात अनेक महिला होत्या. पाकिस्तानमधील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे.
ज्या भागात वरील दोन्ही घटना घडल्या, त्या खैबर पख्तुनख्वा प्रांतावर माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाची सत्ता आहे. गेल्या आठवड्यात इम्रान खान यांच्या तेहरिक-ए-इन्साफ या पक्षाने इस्लामाबादच्या दिशेने रॅली काढण्याचा आणि आंदोलनाचा इशारा सरकारला दिला होता. हा इशारा देताना प्रामुख्याने तीन मागण्या केल्या होत्या.
पहिली आणि सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे वर्षभरापासून तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांची लगेच सुटका करावी, दुसरी मागणी यंदा फेब्रुवारीत झालेल्या निवडणुकीत मतदानात हेराफेरी झाल्याचे मान्य करावे आणि तिसरी मागणी म्हणजे अलीकडेच केलेली घटनादुरुस्ती रद्द करावी. या घटनादुरुस्तीमुळे सरकारकडे न्यायमूर्तींच्या नियुक्तीचा अधिकार आला आहे. या अधिकारामुळे राजकीय खटल्यांच्या निकालावर परिणाम होऊ शकतो, याकडे तेहरिक-ए-इन्साफ या पक्षाने लक्ष वेधले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर आधीच्या दोन घटना आणि त्यानंतर खैबर पख्तुनख्वा प्रांतातून इम्रान खान यांच्या सुटकेसाठी सुरू झालेले आंदोलन यांचा काही संबंध आहे का, याचा पाकिस्तान सरकार अभ्यास करत आहे. कदाचित या दोन्ही घटनांमागे इम्रान खान यांच्या पक्षाचा हात असावा, अशीही शंका व्यक्त होत आहे. मात्र, याबाबत पाकिस्तान सरकारकडे कुठलाही ठोस पुरावा नसल्याने या जरतरच्या गोष्टी आहेत. तरीही पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा यामागे नक्की कोण आहे, याचा शोध घेत आहे.
इम्रान खान 2022 पर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधान होते. त्यानंतर त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करून त्यांना सत्तेतून पायउतार करण्यात आले. 2022 मध्ये पाकिस्तानमध्ये सत्तापालट झाला. इम्रान खान यांच्यावर दीडशेहून अधिक गुन्हे असून त्यात भ्रष्टाचार, बेकायदा कृत्ये, देशाची गोपनीय माहिती सार्वजनिक करणे यांसारखे अनेक आरोप आहेत. त्यामुळे सध्या ते रावळपिंडी तुरुंगात आहेत. इम्रान खान यांच्या सुटकेसाठी त्यांची पत्नी बुशरा बीबी आणि खैबर पख्तुनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री अली अमिन गंडापूर यांनी मोठी ताकद पणाला लावली आहे.
खैबर पख्तुनख्वा ते इस्लामाबाद रॅली हा त्याचाच भाग आहे. तेहरिक-ए-इन्साफचे कार्यकर्ते आणि समर्थक यांची हजारोंची रॅली मंगळवारी इस्लामाबादमध्ये पोहोचली. ही रॅली इस्लामाबादमध्ये पोहचू नये यासाठी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी गरज पडल्यास थेट गोळीबाराचे आदेश दिले होते. इम्रान खान यांच्या समर्थकांना इस्लामाबादमध्ये रोखण्यासाठी रस्त्यात कंटेनर ठेवून वाटा रोखण्याचा प्रयत्न शरीफ सरकारने केला होता.
मात्र, आंदोलन चिघळले आणि इम्रान खान समर्थक तसेच सुरक्षासैनिक भिडले. जाळपोळ, हल्ला आणि अराजकता यात 6 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. यातील 4 सुरक्षासैनिक आणि दोन पीटीआयचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर इस्लामाबादमधील अत्यंत महत्त्वाच्या अशा डी चौकावर कब्जा मिळवलेल्या तेहरिक-ए-इन्साफच्या कार्यकर्त्यांना रोखण्यास आणि त्यांना परतून लावण्यास पाकिस्तानी सैनिकांना यश आले.
या संघर्षानंतर इम्रान खान यांच्यासाठी सुरू केलेले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय तेहरिक-ए-इन्साफ पक्षाने जाहीर केला आहे. दरम्यान, दोन दिवसांच्या या धुमश्चक्रीत 100 हून अधिक लोक जखमी झाले असून पोलिसांनी तेहरिक-ए-इन्साफच्या हजारो कार्यकर्त्यांना अटक केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये अराजकता निर्माण करण्याचा इम्रान खान यांचा प्रयत्न असल्याचा आरोप पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी केला आहे.
तेहरिक-ए-इन्साफ पक्षाच्या कार्यकर्त्यांना इस्लामाबादपर्यंत सरकारी यंत्रणांच्या विरोधाला सामोरे जावे लागत होते. मात्र, इस्लामाबादमध्ये हिंसाचार झाला. तेहरिक-ए-इन्साफच्या आंदोलकांनी गुमान माघार न घेतल्यास त्यांना थेट गोळ्या घालण्याचे आदेश सरकारने दिले. त्याप्रमाणे आधी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. त्यानंतरही आंदोलक मागे न फिरल्याने सैनिकांनी गोळीबार केला. त्यानंतर आंदोलन चिघळले पण, पुढे काय करायचे याचे निश्चित धोरण नसल्याने तेहरिक-ए-इन्साफच्या आंदोलकांना माघार घेण्यापासून पर्याय नव्हता.
या सर्व पार्श्वभूमीवर तुरूंगामधून इम्रान खान यांनी एक्स या समाजमाध्यमावर मेसेज पाठवून कार्यकर्त्यांना शेवटपर्यंत लढण्याचे आदेश दिले आहेत. माजी पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू असलेल्या इम्रान खान यांनी, माझ्या संघासाठी माझा संदेश आहे की, शेवटचा चेंडू टाकेपर्यंत लढत राहा, आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
तर इस्लामाबादमध्ये आंदोलन चिघळल्यानंतर आणि 6 बळी गेल्यानंतर इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बीबी यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. तरीही त्यांनी इम्रान खान यांच्या सुटकेसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा निर्धार केला असून हा देशाच्या स्वातंत्र्याचा लढा असल्याचा संदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. मात्र, त्यांच्या अटकेची शक्यता असल्याने बुशरा बीबी तातडीने खैबर पख्तुनख्वा प्रांताकडे रवाना झाल्या आहेत. दरम्यान, बुशरा बीबी यांच्यावर पठाणांना भडकावण्याचा आरोप पाकिस्तान सरकारने केला आहे.
इस्लामाबादमधील गोळीबाराची गंभीर दखल अमेरिकेने घेतली आहे. पाकिस्तान सरकारने मानवाधिकार आणि त्यांच्या मूलभूत स्वातंत्र्याचा आदर करावा, असे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील राजकीय वारे बदलणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
याला आणखी एक संदर्भ आहे. जेव्हा तेहरिक-ए-इन्साफचे आंदोलक इस्लामाबादमध्ये आले तेव्हा काहींनी सैनिकांशी हस्तांदोलन केले तर काहींनी मिठ्या मारल्या. पाकिस्तानमध्ये लोकशाही असली तरी लष्कराची भूमिका महत्त्वाची असते. अशातच अमेरिकेने दिलेल्या सल्ल्यानंतर पाकिस्तानकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
वास्तविक पाकिस्तान हा मुस्लीम देश आहे आणि धर्माच्या आधारावरच त्यांनी वेगळ्या देशाची मागणी करून भारताची फाळणी करून घेतली होती. मात्र, पाकिस्तान देश म्हणून अस्तित्वात आल्यानंतरही तेथे कधीही शांतता नांदली नाही. भारतद्वेष हाच पाकिस्तानी राजकारण्यांचा अजेंडा राहिला आहे.
त्यामुळे वारंवार भारतावर कुरघोडी करून संघर्ष सुरू ठेवला. मात्र, देशात प्रचंड महागाई, प्रगतीपासून कोसो दूर, शिया-सुन्नी यांच्यातील संघर्ष, शेजारी अफगाणिस्तानमधून होणार्या कारवाया यामुळे पाकिस्तानमध्ये कधीही राजकीय स्थैर्य राहिले नाही. यातूनच लष्कराचे वर्चस्व, पंतप्रधानपदी राहिलेल्या नेत्यांच्या हत्येचा कट हे सर्व जगजाहीर आहे. केवळ धर्माच्या नावाने देश चालत नाही, हाच संदेश यातून जातो.