Homeसंपादकीयअग्रलेखMobile Phone : मोबाईलमध्ये अडकलेली माणसे

Mobile Phone : मोबाईलमध्ये अडकलेली माणसे

Subscribe

राजधानी मुंबईतल्या मंत्रालय आणि विधानभवन परिसरातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. खातेवाटप, शपथविधी, मंत्रीपदावरून होणार्‍या वाटाघाटी, मुत्सद्दी चर्चा, बैठका आणि ‘अनाकलनीय’ विजयाच्या राजकारणाने हा परिसर भारून गेला आहे. याच परिसरात अगदी मंत्रालयाच्या समोर आणखी एक अ-राजकीय परंतु तेवढ्याच चिंतेची आणि दखल घेण्यासारखी दुसरी ‘अनाकलनीय’ घटना घडली आहे. घटना तशी छोटीच आहे, मात्र अनाकलनीय यासाठी की, आजपर्यंत अशी घटना घडलेली नव्हती.

‘अमूक एका वाहनाची माणसाला धडक’ हा मथळा कुठल्याही वर्तमानपत्रातल्या किंवा वृत्तवाहिन्यांमध्ये नियमित असतो. परंतु ‘माणसाची वाहनाला धडक’ असा मथळा वाचकापुढे आल्यास शब्दांची ओळीतली जागा बदलल्यानं बातमीचा अर्थच बदलून गेल्यानं ही ‘उपसंपादकाची डुलकी’ असावी असा संशय घेण्यास जागा आहे. पण या मथळ्यात ‘तसं’ काहीच चुकलेलं नाही, अगदी असं खरंच घडलं आहे, आणि हे सगळं घडलं आहे, ते ठिकाणही महाराष्ट्राचा कारभार जिथून चालवला जातो त्या अगदी थेट मंत्रालयासमोरच, मंत्रालय परिसर हॉर्नचा कलकलाट आणि महागड्या वाहनांनी नेहमीच गजबजलेला असतो. मुंबईतल्या कानाकोपर्‍यातून येणार्‍या अनेक बसेस मंत्रालयाजवळील बसस्थानकात विसावतात, या मंत्रालयीन परिसराचे कमालीचे महत्त्व असल्याने वाहतूक पोलीस आणि शहर पोलिसांचा या ठिकाणी कायम बंदोबस्त असतो, त्यामुळे बेशिस्त वाहतुकीच्या घटना आणि अपघातांचे प्रमाण तुलनेने कमीच असते, मात्र शुक्रवारच्या ऐन दुपारी एका नागरिकाने मोबाईलच्या तंद्रीत चक्क बेस्ट बसला धडक दिली. बेस्टची ११३ क्रमांकाची प्रवासी बस बॅकबे बस डेपोकडे जात असताना मंत्रालयासमोर आली असता रस्त्यावरून मोबाईलवर बोलणारी एक पादचारी व्यक्ती बसच्या मागील बाजूस अचानक धडकली, यात ही व्यक्ती जखमी झाल्याने त्यांना नागरिकांनी तातडीने जे.जे. रुग्णालयात दाखल केले.

आता या अपघाताची माहिती घेण्याचे काम बेस्ट आणि वाहतूक पोलिसांकडून सुरू झाले आहे. बेस्ट बसने झाडाला, कारला किंवा विजेच्या खांबाला धडक दिल्याच्या बातम्या याआधी अनेकदा वर्तमानपत्रात येऊन गेल्या आहेत. परंतु एखाद्या माणसाने बेस्ट बसला धडक दिल्याची ही बातमी पत्रकारितेच्या इतिहासात कदाचित पहिलीच असावी, म्हणून या बातमीचे महत्त्व आहेच.‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ किंवा ‘हिट अँड रन’ च्या घटनेत बरेचदा मद्यपानाचा मेंदूवर चढलेला कैफ कारण ठरतो, त्यामुळे मद्यपान करून होणारे अपघात आणि वाहन चालवताना मोबाईलवर बोलताना होणारे अपघात एकाच तागडीत तोलणे अन्यायकारक ठरेल, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे ही एक कला आहे.

ज्येष्ठ साहित्यिक चिं.वि.जोशींच्या भाषेत मोटारीच्या सुकाणू चाकावर (स्टेअरिंग व्हील) वर हात असताना मोबाईलवरील ध्वनीक्षेपकाद्वारे संवाद साधणे ही एक कलाच आहे. हायवेवर हॉर्नच्या कलकलाटात मोबाईलवरील संवाद समजून घेण्यासाठी पराकोटीची एकाग्रता लागते, त्यासाठी एखाद्या ध्यानस्ताप्रमाणे प्राण कानात गोळा करावे लागतात, वाहन चालवताना कानात खोवलेल्या इअरफोनमुळे बाहेरच्या जगाचा नको असलेला कलकलाटी संवाद वाहनचालकाला ऐकूच जात नाही, त्यामुळे अ‍ॅम्ब्युलन्स, पोलीस सायरन, आगीचा बंब असे ‘तातडीचे’ विघ्न वाहनचालकापर्यंत पोहचतच नाहीत. असे इअरफोन कानात टाकल्याने मागून येणार्‍या लोकलट्रेनचा आवाज न आल्यामुळे अनेकांची थेट त्या परमपित्याशीच भेट होते.

या बाहेरच्या मोहमायी जगापासून अलिप्त राहून मोबाईलसाधक आपली संवादातील एकाग्रता तसूभरही ढळू देत नाही, हे झाले चारचाकी वाहनचालकाचे…परंतु दुचाकीस्वारांसमोर मोबाईल संवादाचे हे आव्हान आणखीनच खडतर होते. माणसाच्या खांद्यावर त्याच्या त्याच्या जबाबदारीचे ओझे असल्याचे आपण ऐकलेले, पाहिलेले असते. परंतु बरेचदा रस्त्यावर खड्डे चुकवत दोन चाकांचे संतुलन राखत विविध वळणे घेत आपापल्या मार्गाने जाणार्‍या दुचाकीस्वारांच्या खांद्यावर सर्वसामान्य माणसांपेक्षा जास्त असे मोबाईलचे अतिरिक्त ओझे असते, ही माणसे त्यामुळेच जगावेगळी ठरावीत, प्रत्यक्ष काळानेच ही अतिरिक्त जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकलेली असते, या जबाबदारीत जराशीही चूक झाल्यास अशा दुचाकीस्वारावर आलेली ‘वेळ’ त्याच्यासह त्याला आडवे येणार्‍या-जाणार्‍यांसाठीही ‘काळ’ ठरतो. अवघ्या दोन चाकांवर, खांदा आणि मानेच्या पकडीत अगदी कानाच्या जवळ मोबाईल धरून ठेवणे ही अद्भुत कलाच म्हणावी लागेल. स्वत:ला मोबाईल नावाचे सहावे इंद्रीय जोडून घेतल्याने विधात्याने केवळ पंचेंद्रिये जोडून पृथ्वीवर पाठवलेल्या अतिसामान्य माणसांच्या तुलनेत ही माणसे वैशिष्ठ्यपूर्ण ठरतात.

मोबाईलच्या या साधनेत माणसाला बाहेरच्या जगाचा विसर पडतो, चित्त एकाग्र होते. सामान्य माणसं याला कुचेष्टेने तंद्री किंवा देहभान हरपणे म्हणतात, खरेतर ही एक प्रकारची मनाची अतिउच्च पातळी गाठणारी अशी ती ध्यानसाधना असते. त्या ध्यानात समग्र लीन असलेल्या माणसाला भवताल दिसेनासा होतो, मग तो वाहनात असेल किंवा रस्त्यावरून चालत असेल, अगदी समोर असलेली बस किंवा ट्रकही त्याच्या दृष्टीस पडत नाही तर कानांना मोबाईलशिवाय हॉर्न, बाहेरचा गोंगाट असं काहीही ऐकू येत नाही, ही पराकोटीची ध्यानसाधना साधकासोबतच त्याच्या संपर्कात येणार्‍यांना बरेचदा थेट स्वर्गाचा मार्ग दाखवते. खेडेगाव असो नाही तर शहर मोबाईल हा आता प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत बनून गेलेला आहे, असे म्हटले तरी चालेल, पण त्याचा वापर घरात काय किंवा सार्वजनिक ठिकाणी काय तो वापरताना आपण भान ठेवायला हवे, अन्यथा जीव गमावण्याची वेळ येऊ शकते.