काही वर्षांपूर्वी निवडणुकीच्या एका प्रचारसभेत, तुम्ही हाफ चड्डीवाल्यांना मत देणार का, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि भाजपची खिल्ली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उडवली होती. तेच पवार आता त्याच हाफ चड्डीवाल्या स्वयंसेवकांच्या प्रेमात पडले आहेत. संघाची कार्यपद्धती त्यांना खूप आवडली आहे. एकेकाळी उद्धव ठाकरे हेसुद्धा संघाची कार्यपद्धती आणि शिस्त यांच्या प्रेमात पडले होते.
त्यांनी म्हणे शिवसेनेला संघासारखे शिस्तबद्ध वळण देण्यासाठी आराखडा बनवला होता. त्यानुसार पुढची वाटचाल करायचे ठरवले होते. शरद पवार यांच्या पक्षाची रविवारी मुंबईत बैठक झाली. त्यावेळी त्यांनी आपले विचार मांडले. लोकसभेत शरद पवार यांच्या पक्षाचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीला भरघोस यश मिळाले. लोकसभेत राज्यातील ४८ पैकी ४५ जागा मिळवू, असे छातीठोकपणे सांगणार्या महायुतीची दाणादाण उडाली.
त्यामुळे त्यांच्या नेत्यांच्या पोटात भीतीचा गोळा तर महाविकास आघाडीच्या गोटात आनंदाचे उधाण आले, पण जेव्हा राज्यात विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा महाविकास आघाडीला अपयशाचा प्रचंड धक्का बसला. सुरुवातीला महाविकास आघाडीतील नेत्यांनी मतदान यंत्रावर खापर फोडून राज्यभर आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला, पण त्याचा काही उपयोग होणार नाही असे कळल्यावर ते सोडून दिले. कारण निवडणूक आयोगासोबत सर्वोच्च न्यायालयानेही मतदान यंत्रावरून विरोधी पक्षांना झापले. कारण विजय होतो तेव्हा तुमची तक्रार नसते, पण पराजय झाला की तुम्हाला मतदान यंत्रात दोष दिसतो, असे सुनावले.
महाविकास आघाडीचे शिल्पकारच शरद पवार आहेत, पण पुढे त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आणि त्याची मालकी आणि चिन्ह अजित पवार यांच्याकडे गेले. त्यांचा पक्ष विस्कळीत झाला. शरद पवार यांच्यासोबत अनेक वर्षे राहिलेले आणि त्यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ यांच्यासारखे नेते त्यांना सोडून गेले. याची खंत शरद पवार यांना नक्कीच वाटत असेल. कारण पक्षाला निष्ठावंत नेते आणि कार्यकर्ते मिळाले नाही तर पक्षाची अवस्था काय होऊ शकते याचा प्रत्यक्ष अनुभव पवार सध्या घेत आहेत.
विधानसभा निवडणुकीतही आपल्याला लोकसभा निवडणुकीप्रमाणे यश मिळेल असे वाटत असताना भलतेच घडले. महाविकास आघाडीची इतकी दाणादाण उडाली की विधानसभेत विरोधी पक्षनेत्याचे स्थान असू द्या, अशी विरोधकांकडून सत्ताधार्यांना विनंती करावी लागली. इतकी दयनीय अवस्था का झाली, याचा विचार शरद पवार यांनी नक्कीच केला असेल. विधानसभा निवडणुकीत भाजपला जे भरघोस यश मिळाले त्यामागे काय कारण आहे, ते त्यांना सापडले. तेच त्यांनी पक्षाच्या बैठकीत मांडले.
भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी भाजपसाठी केलेले नि:स्वार्थ कार्य म्हणजे घरोघरी जाऊन केलेला प्रचार भाजपच्या विजयाला कारणीभूत ठरला. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी निर्माण व्हायला हवी. संघाच्या कार्यकर्त्यांची त्यांच्या विचारधारेशी असलेली निष्ठा आणि वचनबद्धता विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून दिसून आली. आपणही छत्रपती शाहू महाराज, जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेशी एकनिष्ठ असणार्या कार्यकर्त्यांचे एक मजबूत जाळे उभारण्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे आवाहन पवारांनी केले.
संघासोबत राष्ट्रसेवा दल आणि इतर काही संघटनांची स्थापना झाली होती, पण त्यांचा प्रभाव ओसरला. भाजपसारखी अन्य कुठल्या पक्षाला समांतर संघटना निर्माण करता आली नाही, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली. मुद्दा असा आहे की पवार जेव्हा विचारधारेशी निष्ठा आणि वचनबद्धता यांचा उल्लेख करतात तेव्हा पवार यांचा आजवरचा राजकीय प्रवास पाहिला तर वरील दोन शब्दांशी त्यांनी किती वेळा फारकत घेतली ते दिसून येईल. पवारांना निष्ठा आणि वचनबद्धता पाळणारे कार्यकर्ते हवे आहेत, पण त्यांनी त्याचे किती पालन केले, असा प्रश्न उपस्थित होतो.
शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करीत शरद पवारांनी आपली राजकीय कारकीर्द उभी केली. त्याचवेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संकुचित, जातीयवादी, धर्मवादी म्हणून कायम हिणवले, पण त्याच पवारांना आज संघाचे कार्यकर्ते आणि त्यांच्या कार्यपद्धतीचे अनुकरण करावे असे वाटत आहे. खरंतर सहकार क्षेत्रात पवारांचे मोठे नाव आहे. त्यांनी अनेक सहकारी संस्था उभ्या केल्या आहेत. त्या माध्यमातून त्यांनी अनेकांना श्रीमंत बनवले आहे.
बारामतीला त्यांनी समृद्ध बनवले आहे, पण आर्थिक समृद्धीतून निष्ठावान लोक घडतीलच असे नाही. उलट यातून बरेचदा नफ्यातोट्याचाच अधिक विचार करणारे तयार होतात. इथेच संघाचे स्वयंसेवक वेगळे ठरतात. ते आर्थिक नफ्यातोट्याचा विचार करीत नाहीत. त्यांना जे नेमून दिलेले काम असते ते निमूटपणे करतात. ते कुठलाही गाजावाजा करीत नाहीत. निष्ठा कितीही पैसे मोजले तरी बाजारात विकत मिळत नाही हे पुरोगामी पवारांना माहीत नाही का?