Homeसंपादकीयअग्रलेखPune Medha Kulkarni : सदाशिव पेठेत पीरबाबा?

Pune Medha Kulkarni : सदाशिव पेठेत पीरबाबा?

Subscribe

पुण्यात आणि तेसुद्धा सदाशिव पेठेत पीरबाबाचे स्थान असल्याचे सांगून तिथे कुणीतरी आपली श्रद्धाभावना व्यक्त केली. त्यासाठी तिथे एका शाळेच्या भिंतीच्या काही भागाला हिरवा रंग देऊन फुले आणि पणती लावली. चक्क सदाशिव पेठेत ही घटना घडल्यामुळे सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात ही घटना अल्पावधीत सर्वदूर पसरली. या जागी हिरवा रंग देण्यात आल्यामुळे या जागेवर वक्फ बोर्डाकडून कब्जा करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली.

ही बातमी भाजपच्या पुण्यातील राज्यसभेवरील खासदार मेधा कुलकर्णी यांच्यापर्यंतही पोहचली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहचून त्या भिंतीवरील हिरव्या रंगावर भगवा रंग दिला आणि तिथे गणपतीचा फोटो ठेवला. हिरवा रंग दिसला की सध्या हिंदू लोक जास्त सतर्क होताना दिसत आहेत. अलीकडेच एक बातमी प्रसिद्ध झाली होती. लातूरमधील शेतकर्‍यांच्या काही एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी तक्रार केली.

त्यानंतर वक्फ बोर्डाने खुलासा केला की, आमच्याकडून अशी कुठलीही नोटीस संबंधित शेतकर्‍यांना पाठवण्यात आलेली नाही. त्यानंतर ते प्रकरण शांत झाले. मध्यंतरी महाराष्ट्रातील काही किल्ल्यांवर विशिष्ट धर्मियांनी अतिक्रमण केल्याचा दावा करण्यात आला. त्यावरून त्या किल्ल्यांजवळील गावांमध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. शेवटी खुद्द कोल्हापूरच्या छत्रपतींना तिथे जावून ते प्रकरण शांत करावे लागले. हिरवा आणि भगवा हे दोन रंग आता जणू काही दोन धर्मियांची ओळख म्हणून मानले जाऊ लागले आहेत.

मेधा कुलकर्णी यांनी हिरव्या रंगावर भगवा रंग स्वत:च्या हातांनी चढवून त्याला देवळाचा आकार दिला. त्यावर टीका करताना शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एका खासदाराने काय काम करायला हवे याचा सल्ला दिला, पण एकेकाळी शिवसेनेच्या भगव्या रंगाचे काय वजन होते, भगवा रंग दिसला की कुणाला त्या दुकानाला हात लावायची हिंमत होत नसे, याची सुषमा अंधारे यांना कल्पना नसावी.

मुंबईत हाजीअली दर्गा, माहिम दर्गा, माऊंट मेरी या ठिकाणी हिंदू लोक जातात. इतकेच काय पण भारतात काही धर्मस्थळे अशी आहेत की ती अन्य धर्मियांची असली तरी तिथे हिंदू लोक आपली आस्था व्यक्त करतात. भारताचा इतिहास पाहिला तर असे दिसेल की मुस्लीम आक्रमक भारतात आले. त्यातील बर्‍याच जणांनी आपले बस्तान इथेच बसवले. त्यातील काही जण इथले राज्यकर्ते झाले. त्यामुळे मुस्लीम धर्माचा भारतात प्रभाव वाढत गेला.

त्या धर्माला बरेच अनुयायी मिळाले. इथल्या मूळच्या अनेक हिंदू धर्मियांना मुस्लीम व्हावे लागले. त्याला विविध कारणे आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तरी असे दिसेल की विविध गावांमध्ये हिंदू धर्मीय पिराचा आदर करताना दिसतात. मुस्लिमांच्या उरुसामध्ये सहभागी होतात. त्यामुळे दोन धर्मियांमधील हा भाईचारा टिकून राहिला आहे. तो तसाच टिकून राहावा अशी अपेक्षा आहे. अगदी हिंदी चित्रपटसृष्टीही पाहिले तर असे दिसेल की कितीतरी हिंदू देवदेवतांवरील गीते मुस्लीम गीतकारांनी लिहिली आणि मुस्लीम गायकांनी गायली आहेत.

भारताची फाळणी ही हिंदू आणि मुस्लीम या धार्मिकतेच्या आधारावर झाली आहे, पण या फाळणीनंतर व्यापक दृष्टिकोन बाळगणारा भारत म्हणजे हिंदुस्थान आज प्रगत झालेला दिसत आहे, तर फाळणी होऊन अट्टाहासाने वेगळे झालेल्या पाकिस्तान आणि बांगलादेशाची स्थिती काय झालेली आहे ते दिसत आहे. त्या दोन्ही देशांमध्ये लोकशाही रुजू शकली नाही. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आज जीवाच्या भीतीने भारतात आश्रय घेऊन आहेत. भारत सरकारने त्यांना संरक्षण दिले आहे.

अयोध्येत राम मंदिराची उभारणी होणे हा हिंदूंच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे त्याची उभारणी झाल्यावर सगळ्या हिंदूंना खूप समाधान वाटले. कारण तो अनेक वर्षांचा लढा होता. संसदेत सध्या वक्फ बोर्डाचा विषय गाजत आहे. वक्फ बोर्डाच्या कार्यप्रणालीत सुधारणा करण्यासंबंधीचे विधेयक भाजपने संसदेत आणले आहे. विरोधी बाकांवर असलेल्या इंडिया आघाडीने या विधेयकाला विरोध केला आहे. सध्या ते संसदेच्या संयुक्त समितीकडे आहे.

वक्फ बोर्ड ज्या जमिनींवर किंवा वास्तूंवर आपला दावा सांगेल त्या वास्तू त्यांच्या कशा नाहीत हे सिद्ध करण्याची जबाबदारी ज्यावर दावा केला जातो त्याची असते. हिंदुत्ववादी सरकार केंद्रात असल्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांना नवे बळ मिळाले आहे. त्यामुळे मुस्लिमांच्या काही मशिदींखाली किंवा बाजूला हिंदू मंदिराचे पुरावे सापडत आहेत. तेथील अधिक माहिती घेण्यात येत आहे. तिथे पुरातत्त्व खात्याच्या माध्यमातून उत्खनन करण्यात येत आहे. ही प्रकरणे न्यायालयात गाजत आहेत. अशा उत्खननामुळे काही ठिकाणी धार्मिक संघर्ष उसळत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आता आपल्याला मुस्लिमांच्या धार्मिक स्थानांचा आदर करायला हवा. प्रत्येक धर्मस्थळी असे उत्खनन करणे योग्य नव्हे, असे म्हटले आहे, पण त्यांच्या या मताला हिंदू संघटनांकडून विरोध होत आहे. जे आपले आहे, ते आपल्याला मिळायलाच हवे, अशी त्यांची मागणी आहे. पुढील काळात या गुंतागुंतीच्या विषयातून मार्ग काढण्याची जबाबदारी जशी सरकारची आहे, तशी ती दोन्ही बाजूंच्या धर्मियांचीदेखील आहे.