एका सामान्य तरुणीला पहाटेच्या वेळी प्रवास करावा लागतो, ती सार्वजनिक वाहतुकीचा आधार घेते आणि तिला वाटतं की ती सरकारच्या देखरेखीखाली सुरक्षित आहे. पण वास्तव काय आहे? तीच बस, जी एका सामान्य प्रवाशासाठी प्रवासाचं साधन असतं, तीच बस नराधमांसाठी बलात्काराच्या गुहेत बदलते आणि प्रशासन मात्र हात हातावर ठेवून बसलेलं असतं. पुण्यात स्वारगेट बसस्थानकावर घडलेल्या अमानुष घटनेने हेच भयावह सत्य समोर आणलं आहे.
महिलांसाठी सरकारच्या सुरक्षाव्यवस्था म्हणजे फक्त एक फोल दिखावा आहे. ही घटना म्हणजे केवळ एका तरुणीवर झालेल्या अत्याचाराची कहाणी नाही, तर एका संपूर्ण व्यवस्थेच्या अयशस्वीतेचं आणि नालायकपणाचं प्रखर उदाहरण आहे. पुण्यासारख्या मोठ्या शहरात, स्वारगेटसारख्या गजबजलेल्या ठिकाणी जर एका बसमध्येच बलात्कार होतो, तर ग्रामीण आणि दुर्लक्षित भागांमध्ये किती भयावह प्रकार होत असतील याचा विचार करावा.
महिला सुरक्षेसाठी मोठमोठे पोस्टर झळकवले जातात, ‘निर्भया फंड’च्या नावाखाली करोडो रुपये खर्च केले जातात आणि शेवटी काय? महिलांसाठी ही शिवशाही बस नाही, तर नराधमांसाठी खुलेआम चालणारी ‘बलात्कारशाही’ बस बनली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
नुकतीच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अभूतपूर्व उत्साहात साजरी झाली. शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू झालेल्या बसमध्ये असे कृत्य घडणे हे शासनासाठी लज्जास्पद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्यभर स्त्रियांना सन्मान, संरक्षण आणि सुरक्षिततेचे अभय दिले. त्यांच्या स्वराज्यात स्त्रियांवर अत्याचार करणार्यांसाठी कठोर शासन होते.
त्यांच्याच नावाने सुरू असलेल्या ‘शिवशाही’ बसमध्ये असा प्रकार होत असेल तर याला जबाबदार असलेली सरकारची निकम्मी व्यवस्था, बेजबाबदार पोलीस प्रशासन आणि भ्रष्ट कर्मचारी हे सर्वजण शिवरायांच्या शिकवणीला नाकारणारे अपराधी आहेत, असे समजावे. या प्रकरणात सर्वात घाणेरडं वास्तव समोर आलं आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी उघडपणे सांगितलं की, या ठिकाणी जुन्या बसगाड्या लॉजिंगसाठी वापरल्या जात होत्या. म्हणजेच ही जागा केवळ एका रात्रीसाठी गुन्हेगारांनी वापरलेली नाही, तर हा प्रकार रोजच्या रोज चालत होता.
ही माहिती पोलीस प्रशासनाला नव्हती? राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकार्यांना हे ठाऊक नव्हतं? यावर विश्वास ठेवायचा का? या अत्याचारांना मूकसंमती देणारे हे सरकारी कर्मचारी आणि अधिकारीच या गुन्ह्याचे मुख्य सूत्रधार आहेत. जर स्वारगेटसारख्या मोठ्या बस स्थानकावर असे प्रकार राजरोसपणे घडत असतील, तर इतर जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती असेल, याचा विचार जरी केला तरी अंगावर काटा येतो.
जुन्या, भंगार बसगाड्यांचा वापर कित्येक ठिकाणी वेश्याव्यवसाय, लैंगिक शोषण आणि बलात्कारांसाठीच केला जात असल्याची सत्यता भयावह आहे. या सडलेल्या व्यवस्थेला जबाबदार कोण? राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकार्यांना हे ठाऊक नाही, असं म्हणणं म्हणजे सत्य झाकण्याचा फोल प्रयत्न! पोलीस, सरकारी अधिकारी आणि स्थानिक गुन्हेगार यांच्या मिलीभगतीनेच या बसगाड्यांचा वापर लैंगिक शोषणासाठी केला जातो.
रात्रीच्या वेळी या ठिकाणी काय चालतं, याकडे जाणूनबुजून डोळेझाक केली जाते. जर सरकार आणि प्रशासनाने तात्काळ या बसगाड्यांची तपासणी करून त्या हटवण्याची कठोर कारवाई केली नाही, तर उद्या अशाच एका गंजलेल्या बसमध्ये कोणाची तरी मुलगी, बहीण किंवा आई नराधमांच्या वासनेचा बळी ठरेल!
या घटनेने राज्य पोलीस यंत्रणेचाही बुरखा फाडून टाकला आहे. पोलीस काय करतात? ते गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळी पोहोचतात, थोडी चौकशी करतात, एक-दोन आरोपी पकडतात आणि मग प्रकरण मिटवत जातात. ज्या ठिकाणी अशा घटना वारंवार घडतात, त्या ठिकाणी पोलीस नियमित गस्त घालतात का? सुरक्षा व्यवस्था मजबूत केली जाते का? नाही! कारण व्यवस्थेतील बड्या अधिकार्यांना अशा घटनांची पर्वा नाही.
एका सामान्य नागरिकाला जर या प्रकाराची माहिती असते, तर पोलिसांना का नसावी? महिला सुरक्षेसाठी केंद्र आणि राज्य सरकार कोट्यवधी रुपये खर्च करतं, पण हा पैसा खरोखर महिलांच्या सुरक्षेसाठी खर्च होतो का? ‘निर्भया फंड’ कुठे जातो? मोठमोठ्या घोषणा, जाहिराती, पोस्टरबाजी यावर कोट्यवधी खर्च होतो, पण प्रत्यक्षात काहीच बदल होत नाही. महिलांसाठी सुरक्षित वाहतूक सेवा तर सोडाच, पण साधं सुरक्षित बसस्थानकही हे सरकार देऊ शकत नाही. या प्रकरणानंतर आता तरी जुन्या बसगाड्या उभ्या करून त्यांचा गैरवापर करणार्या अधिकार्यांना निलंबित करावेे.
बस स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेर्यांची संख्या वाढवावी आणि त्यावर कायमस्वरूपी पोलिसांची नजर ठेवावी. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा उभी करावी आणि तिची जबाबदारी थेट पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्यांवर टाकावी. जर आता काही झालं नाही, तर उद्या आपल्या लाडक्या बहिणी सुरक्षित राहणार नाहीत. आता फक्त घोषणाबाजी नको, तर प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली आहे.