घरसंपादकीयअग्रलेखधडा कोणी दिला आणि कोणी घेतला?

धडा कोणी दिला आणि कोणी घेतला?

Subscribe

सध्या राज्यात असो की देशपातळीवर, थोरामोठ्यांचा किंवा महापुरुषांचा अवमान केल्याशिवाय राजकारणाची गाडी पुढेच सरकत नाही अशी स्थिती आहे. राज्यात सत्तांतर घडत असताना महापुरुषांच्या अवमानाबद्दल तर जणूकाही चढाओढच लागली होती. मुळात प्रसिद्ध लेखक दिवंगत व. पु. काळे यांचे ‘माझा आदर्श ठेवा, असे सांगण्याची हिंमत सध्याच्या कोणत्याही राजकारण्यात नाही,’ अशा आशयाचे वाक्य आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात याला छेद देत एक विधान केले होते.

‘छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले आहेत. तुमचे हीरो तुम्हाला इथेच मिळतील. त्यासाठी बाहेर जायची गरज नाही. डॉ. आंबेडकरांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच सध्याचे आदर्श आहेत,’ असे राज्यपालांनी म्हटले होते. सावित्रीबाईंचं लग्न वयाच्या दहाव्या वर्षी झाले होते. त्यावेळी जोतिबा फुले हे 13 वर्षांचे होते, या भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावरूनही वादळ उठले होते. शिवसेनेत पडलेल्या मोठ्या फुटीमागे भाजप असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील राजकारण टिपेला पोहोचलेले असतानाच तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांची अशी विधाने समोर येताच राजकारणाच्या केंद्रस्थानी विनासायास भाजप येत होता. याच कारणास्तव भगतसिंह कोश्यारी यांची राज्यपालपदावरून उचलबांगडी करण्यात आली.

- Advertisement -

तथापि मुंबई उच्च न्यायालयाने भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले वक्तव्य हे महापुरुषांचा अपमान करणारे नव्हते. त्यांचे वक्तव्य काल्पनिक नव्हते, असा निर्वाळा दिला आहे. तसेच मागसवर्गीयांचा अपमान करणारे वक्तव्य नसल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. कोश्यारी यांनी त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून हीच भूमिका मांडली होती. महापुरुषांचा अनादर करण्याची कल्पना आपण स्वप्नातही करू शकत नाही. वर्तमानातील कर्तव्यदक्ष व्यक्तींचा आदर्श सांगणे म्हणजे महापुरुषांचा अपमान नव्हे, असे त्यांनी या पत्रात लिहिले होते. न्यायालयाने त्यांच्या या भूमिकेवरच शिक्कामोर्तब केले आहे. भगतसिंह कोश्यारी यांची वक्तव्ये इतिहासाचे विश्लेषण करण्याच्या स्वरूपाची तसेच इतिहासातून शिकण्यासारखे धडे आहेत, अशी टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे आणि त्याची दखल सर्वांनीच घेण्याची गरज आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा वारंवार अपमान करणार्‍या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याची नोंद घेणे गरजेचे आहे.

‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान नोव्हेंबर 2022 मध्ये राहुल गांधी महाराष्ट्रात आले होते. तेव्हा त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त भाष्य केले होते. ‘भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आदर्श सावरकर आहेत. ते दोन-तीन वर्षे अंदमानच्या कारागृहात होते. तिथे त्यांनी दया अर्ज लिहिण्यास सुरुवात केली. त्यांनी ब्रिटिशांकडून पेन्शन घेतली. त्यांनी ब्रिटिशांसाठी आणि काँग्रेसच्या विरोधात काम केले,’ असा दावा त्यांनी केला होता. त्यावरून काँग्रेस वगळता सर्वांनीच नाराजी व्यक्त केली होती, मात्र ही यात्रा मध्य प्रदेशात दाखल होताच ‘सावरकर हा अध्याय आमच्यासाठी आता बंद झाला आहे,’ असे काँग्रेसने जाहीर केले. याचाच अर्थ आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात सावरकरांबद्दलचा वाद निर्माण केला होता. मोदी आडनावावरून केलेल्या वक्तव्यावरून राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आणि त्यांना खासदारकी गमवावी लागली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा ‘माझं नाव सावरकर नाही, माझं नाव गांधी आहे आणि गांधी कोणाची माफी मागत नाहीत,’ असे वक्तव्य केले. याच्या पाच दिवस आधी ‘भारत जोडो’ यात्रेतील जम्मू-काश्मीरमधील महिलांविषयी एका टिप्पणीवरून दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांना नोटीस बजावली होती. तेव्हाही त्यांनी ट्विट करत ‘सावरकर समझा क्या… नाम राहुल गांधी है,’ असे म्हटले होते. अर्थातच त्यावरूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

- Advertisement -

सावरकरांचा अवमान करून राहुल गांधी यांना प्रामुख्याने भाजपला डिवचायचे होते. यावरून महाराष्ट्रात सहयोगी पक्ष असलेली शिवसेना फार विरोध करणार नाही, अशी अपेक्षा काँग्रेसची होती, मात्र आपण राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी सहमत नाही, अशी सुरुवातीला मवाळ भूमिका घेणार्‍या शिवसेनेने आता ‘सावरकरांचा अपमान सहन करणार नाही,’ अशी ठाम भूमिका तर घेतलीच, शिवाय राहुल गांधी यांच्या खासदारकीवरून विरोधकांची मोट बांधली जात असताना शिवसेनेने त्यापासून फारकत घेतली. अन्य विरोधी पक्षनेत्यांनी लगेचच याची दखल घेत प्रादेशिक पक्षांना दुखावणे आपल्याला परवडणारे नाही, असा सल्ला काँग्रेसला दिला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीदेखील सावरकरांचा मुद्दा सोडून अनेक मुद्दे आपल्यासमोर आहेत, त्यावर चर्चा करा, असे सांगत काँग्रेस आणि शिवसेनेची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आहे. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काळानुरूप नवे आदर्श निर्माण करण्याची गरज विशद केली होती, पण काँग्रेसने असा आदर्श निर्माण करण्याऐवजी महापुरुषांवरच टीका करण्यास सुरुवात केली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या सल्ल्यातून काँग्रेस धडा घेणार का, हा खरा प्रश्न आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -