महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या 19 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने गंगा नदीच्या पाण्याविषयी बोचरी टिपण्णी केली. त्यामुळे काही लोकांनी तो लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे, त्यामुळे त्यांनी असे बोलणे योग्य नाही, तशा भावना व्यक्त केल्या.
राज यांनी ज्या पद्धतीने गंगा नदीतील पाण्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या, ती जर सोबर असती तर त्यावर कुणाला तसा आक्षेप घेताही आला नसता. राज यांनी ती टिपण्णी करताना भारतातील नद्यांच्या सध्याच्या अवस्थेविषयी सत्य सांगितले ते कुणालाच नाकारता येणार नाही. भारतातील बहुतांश नद्या या प्रदूषित झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांचे पाणी अंघोळ करण्यासारखे राहिलेले नाही, त्यामुळे ते पिणे अगदीच हानिकारक अशी स्थिती आहे.
भारतामधील नद्यांना माता म्हणून संबोधले जाते. त्यांची पूजा केली जाते, पण पूजा केल्यानंतर त्या पूजेसाठी वापरलेले सगळे साहित्य नदीत टाकले जाते. विविध प्रकारच्या उत्सवाच्या निमित्त स्थापित करण्यात येणार्या मूर्तीचे विसर्जन नद्यांमध्ये केले जाते. प्रक्रिया न केलेले सांडपाणी तसेच रासायनिक उद्योगांतून सोडले जाणारे रासायनिक पाणी नद्यांमध्ये सोडले जातेे, विविध प्रकारचा कचरा नद्यांमध्ये टाकला जातो.
एखादी गोष्ट जेव्हा धर्माला आणि आध्यात्मिक श्रद्धेला जोडली जाते, तेव्हा त्याविषयी कुणी बोलायला धजत नाही. कारण आपल्याकडे पाप-पुण्याचा मोठा पगडा लोकांच्या मनावर असतो. त्यामुळे आपण कुणाची श्रद्धा दुखवू नये, किंवा जी श्रद्धास्थाने आहेत, त्यांच्यावर टीकात्मक बोलू नये, तसे केल्यास आपल्याला पाप लागेल, ही भावना असते. त्यात पुन्हा आषाढी कार्तिकीला किंवा कुंभमेळ्याला लोक जाऊन नद्यांमध्ये स्थान करतात, त्यामागेही पाप मुक्तीचा हेतू असतो.
जीवन जगताना आपल्या हातून ज्या कळत नकळत चुका होतात, अपराध होतात, त्यापासून मुक्ती मिळावी, अशी माणसांची भावना असते. त्या पापांतून आपल्याला मुक्ती मिळाली तर आपल्या जीवनातील अडथळे दूर होतील, आपली प्रगती होईल, इतकेच नव्हे तर आपल्याला पुढचा जन्म चांगला मिळेल, अशीही काही लोकांची भावना असते. पण अलीकडच्या काही वर्षांमध्ये विविध कारणामुळे नद्यांच्या प्रदूषणात वाढ झालेली आहे.
त्याकडे खरे तर केंद्रातील आणि राज्यातील सरकारांनी लक्ष देण्याची गरज आहे, पण त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. नद्यांच्या स्वच्छतेसाठी दरवर्षी काही कोटी खर्च केले जातात, पण ती एक औपचारिकता असते, ती दरवर्षी पार पाडली जाते, पण परिस्थिती जैसे थे असते. मुंबईतील मिठी नदीची सफाई हे त्याचे मासलेवाई उदाहरण आहे. गेली अनेक वर्षे तिच्या सफाईवर काही कोटी खर्च झाले असतील, पण नदीच्या स्थितीत काहीही फरक पडलेला नाही.
गंगा नदीला हिंदू धर्मात मोठे धार्मिक महत्त्व आणि पावित्र्य आहे. गंगेच्या पाण्याचे पूजन केले जाते, इतकेच नव्हे तर माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मुखात गंगाजल घातले जाते. इतके त्या नद्याच्या पाण्याचे महत्त्व आहे. ‘आपलं महानगर’च्या सारांश या पुरवणीतून ‘नदीभ्रमण’ ही मालिका गेले वर्षभर चालली, त्यातून देशातील नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न चिंताजनक असल्याचे मांडले गेले. त्यात फक्त चंबळ नदी ही अन्य नद्यांच्या तुलनेत स्वच्छ आहे, कारण तिची पूजा केली जात नाही, असे दिसून आले.
राज ठाकरे यांनी भारतभरात नद्या स्वच्छतेसाठी जो अमाप खर्च केला जातो, त्यात किती फोलपणा आहे, तो आपल्या भाषणातून उघड केला. त्यात काहीही चुकीचे नाही. कारण राजीव गांधी पंतप्रधान होते, त्यावेळी त्यांनी गंगा स्वच्छतेसाठी मोठ्या निधीची तरतूद करून मोठे अभियान सुरू केले होते. त्यानंतर 2014 साली केंद्रात भाजपचे बहुमतातील सरकार आले तेव्हा गंगा स्वच्छतेसाठी ‘नमामि गंगे’ हा प्रकल्प सुरू करण्यात आला.
त्यासाठी 20 हजार कोटींची तरतूद केली. पण त्याचा फारसा काही उपयोग झालेला दिसत नाही, त्यामुळे उपहासाने लोक त्या अभियानाला ‘क्षमामि गंगे’ म्हणू लागले आहेत. तीर्थस्थळी जेव्हा अनेक लोक एकत्र जमतात, त्यावेळी तिथली स्वच्छता बिघडून जाते. संत गाडगेबाबा हे आषाढी- कार्तिकीला पंढरपूरला जात असतं, पण ते मंदिरात जाऊन विठ्ठल दर्शन घेत नसतं. मोठ्या संख्येने तिथे गेलेल्या वारकर्यांनी उरकलेल्या देहधर्माची स्वच्छता करण्यासाठी जात असत.
लोकांना दुर्गंधीचा त्रास होऊ नये, रोगराई पसरू नये, हा त्यामागील त्यांचा हेतू होता. अनेक संतांना अनुयायी मिळाले, पण संत गाडेगबाबा हे असे संत होऊन गेले ज्यांना अनुयायी मिळाले नाहीत, ते मिळाले असते, तर आपल्या देशातील नद्या आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ दिसली असती. विदेशातील स्वच्छतेबाबत आपण गोडवे गात असतो, आणि इथल्या अस्वच्छतेवर टीका करत असतो, पण आपल्या देशात अस्वच्छता करणारे आपणच असतो, त्यासाठी कुणी बाहेरच्या देशातून येत नाहीत.