सावळाराम लक्ष्मण हळदणकर हे एक प्रसिद्ध भारतीय चित्रकार होते. त्यांंचा जन्म २५ नोव्हेंबर १८८२ रोजी सावंतवाडी येथे झाला. विद्यार्थीदशेतच त्यांनी चित्रकलेतील ग्रेड (श्रेणी) परीक्षेतही विशेष नैपुण्य संपादन केले. १९०३ मध्ये मुंबईला सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांना अनेक मातब्बर, ज्येष्ठ कला-शिक्षकांचे व चित्रकारांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. १९०७ पासून चित्रकार म्हणून त्यांचा नावलौकिक झाला. मुंबई, चेन्नई, कोलकाता, सिमला, अमृतसर, म्हैसूर येथील प्रदर्शने, तसेच दिल्ली येथील ऑल इंडिया फाईन आर्ट्स अँड क्राफ्ट सोसायटीची प्रदर्शने अशा सर्व ठिकाणी त्यांची चित्रे झळकू लागली. अनेक चित्रांना मानाची पारितोषिकेही मिळाली.
त्यांनी १९०८ मध्ये दादर येथे चित्रकला वर्ग सुरू केला. पुढे त्याचाच विस्तार होऊन १९४० मध्ये गिरगाव येथे ‘हळदणकर फाईन आर्ट इन्स्टिट्यूट’ ही संस्था स्थापन झाली. त्यांनी काही स्नेह्यांच्या सहकार्याने ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ ही संस्था १९१८ मध्ये स्थापन केली. १९२५ मध्ये त्यांना त्यांच्या मोहमेडन पिलग्रिम या कॅन्व्हासवरील तैलरंगातील फकिराच्या चित्राला बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक मिळाले. त्यांच्या निर्मितीत प्रामुख्याने व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे व पौराणिक विषयांवरील प्रसंगचित्रे यांचा समावेश आहे.
जलरंग व तैलरंग या दोन्ही माध्यमांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांच्या अ पायस लाइफ, ग्लो ऑफ होप, पोर्ट्रेट ऑफ मिसेस डेव्हिस, फकिरीतील अमिरी, डिव्हाइन फ्लेम, निरांजनी, स्वातमानंद स्वामी इ. चित्रांपैकी ग्लो ऑफ होप हे चित्र सर्वाधिक गाजले. त्यांनी रंगवलेल्या पं. मदनमोहन मालवीय यांच्या व्यक्तिचित्राचा राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्याकडून खास गौरव करण्यात आला. दिल्ली येथील ललित कला अकादमीतर्फे १९६२ मध्ये त्यांना अधिछात्रवृत्ती देऊन गौरविण्यात आले. सावळाराम हळदणकर यांचे ३० मे १९६८ रोजी निधन झाले.