समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत आपण मुसलमानांचे मसिहा असल्याच्या थाटात कायम पवित्रा घेतल्याचे दिसेल. त्यातूनच मग मुस्लिमांची बाजू घेऊन हिंदूंच्या भावनांना कसा धक्का बसेल, अशा प्रकारची वक्तव्ये त्यांच्याकडून केली जातात. त्यांच्या अशा भूमिकेमुळे ते अनेक वेळा टीकेचे लक्ष्य झालेले आहेत. सध्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर छत्रपती झालेल्या संभाजी महाराज यांनी औरंगजेबाशी कशी निकराची झुुंज दिली, मृत्यू समोर दिसत असताना ते औरंगजेबाला शरण गेले नाहीत, आपला स्वाभिमान आणि धर्माभिमान अजिबात ढळू दिला नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्याला शरण यावे, आपला जीव वाचवण्यासाठी दयेची भीक मागावी, अशी औरंगजेबाची अपेक्षा होती, पण तसे कदापि झाले नाही. शरीराचे लचके तोडले जात असताना, असह्य वेदना होत असतानाही छत्रपती संभाजी महाराज धीरोदात्तपणे मृत्यूला सामोरे गेले. त्यांनी त्यांचा स्वाभिमान ढळू दिला नाही.
त्यामुळेच ते मराठी जनतेसाठी प्रेरणादायी ठरले. त्यामुळे संभाजी महाराजांनंतर मराठ्यांनी औरंगजेबाला शेवटपर्यंत झुंजवत ठेवले. हिंदवी स्वराज्य संपविण्यासाठी दिल्लीतून प्रचंड फौजफाट्यासह महाराष्ट्रात आलेल्या औरंगजेबाचा महाराष्ट्रातच शेवट झाला. त्याची कबर इथेच खोदावी लागली. इतिहासाचे जाणकार अभ्यासक पु.ग.सहस्त्रबुद्धे यांनी ‘माझे चिंतन’ या पुस्तकात म्हटले आहे, ‘उत्तरेत धुमाकूळ घालणार्या मुसलमान सरदारांची थडगी महाराष्ट्रात का, जशी माती तशी माणसे’. हिंदवी स्वराज्य संपवण्यासाठी आलेला औरंगजेब इथेच संपला.
अबू आझमी हे महाराष्ट्रातील विशेषत: मराठी अस्मितेला धक्का देण्याची संधी सोडत नाहीत. त्यासाठी ते अगदी ताकदीने विरोध करतात. ज्या महाराष्ट्रात आपण राहतो, तिथली भाषा, प्रथा, परंपरा, मराठी अस्मिता, मराठी समाजाची आदरस्थाने यांच्याविषयी आम्हाला काही देणेघेणे नाही, असाच त्यांचा पवित्रा बर्याचदा दिसून येतो. काही वर्षांपूर्वी विधानसभेत मराठीच्या मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमदारांनी त्यांना प्रत्युत्तर दिले होते.
अबू आझमी महाराष्ट्रातल्या अशा एका वर्गाचे प्रतिनिधीत्व करतात की, जो महाराष्ट्रात राहून आपले वेगळेपण जपू इच्छित असतो, म्हणजे आम्ही तुमच्यात राहत असलो तरी तुमच्यासोबत नाही, असा हा वर्ग मानतो. त्यामुळे अशा लोकांना जनगणमन म्हणण्यात, भारत माता की जय म्हणण्यात, मराठी बोलण्यात कमीपणा वाटतो.
असदुद्दीन ओवेसी हे तर इतक्या टोकाला जातात की, हमारे गले पे कोई छुरी भी रखेगा तो भी हम भारत माता की जय नही बोलेंगे. त्यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवेसी यांनी तर भारतातून अर्धा तास पोलीस बाजूला करा, बघा आम्ही काय करतो ते, असे आव्हान दिले आहे. त्यांच्यावर त्याबाबतचा खटला अजूनही चालू असावा.
‘छावा’ या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अबू आझमी यांनी औरंगजेबाची भलामण करणारी वक्तव्ये केली. ही भलामण करून त्यांनी सध्या ‘छावा’ चित्रपटामुळे औरंगजेबाविषयी जनमानसात जो राग निर्माण झालेला आहे, त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्या क्रौर्याचे उदात्तीकरण झाले. थोडक्यात, तुम्ही त्याच्या क्रौर्याकडे पाहू नका, असाच त्यातून अर्थ अप्रत्यक्षपणे ध्वनित होतो.
औरंगजेबाची भलामण करणार्या वक्तव्यानंतर राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात आझमी यांच्या विरोधात आवाज उठवण्यात आला. इतकेच नव्हे तर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली. केंद्रातही भाजपचे सरकार आणि राज्यातही भाजपचे सरकार अशी स्थिती आहे.
त्याचसोबत ‘छावा’ चित्रपटामुळे देशभरात औरंगजेबाच्या क्रौर्याबद्दल संतापाची लाट उसळली आहे, याचा विचार करून आझमी यांनी बहुदा आपले शब्द मागे घेण्याची भूमिका घेतली असावी. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आदर आहे, माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे वक्तव्य मागे घेतो, असा व्हिडिओ आझमी यांनी प्रसिद्ध केला आहे.
औरंगजेब संपला तरी आपल्या देशातील औरंगजेबाचे समर्थक संपलेले नाहीत, असेच अशा प्रवृत्तीतून दिसून येते. आजही अशी काही मंडळी या देशात आहेत की, जे शरीराने भारतात असतात, पण मनाने पाकिस्तानात असतात. त्यातूनच मग इथले मीठ खावून, इथल्याच व्यवस्थांचा लाभ घेऊन ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे दिलेले ऐकू येतात. पाकिस्तान झिंदाबादचे नारे देणार्यांना पाकिस्तानात जायचे आहे की, भारताचेच पाकिस्तान बनवायचे आहे, हा एक गंभीर प्रश्न आहे. जेव्हा भारताची फाळणी होऊन पाकिस्तान निर्माण झाले तेव्हा अनेक मुसलमान आपल्या मर्जीने भारतात राहिले.
आज पाकिस्तानात फारसे हिंदू राहिलेले नाहीत, कारण त्यांचा सफाया करण्यात आला. भारताच्या हद्दीत असलेल्या काश्मीरमधूनही हिंदूंचा सफाया करण्यात आला. त्यामुळे पाकिस्तान झिंदाबाद या घोषणेचा अर्थ मर्यादित नाही, असेच म्हणावे लागते. त्यात पुन्हा ज्या मुघल शासकांनी या देशावर राज्य केले ते कसे महान होते, हे सांगून आपण भारतात राहून कुठल्या प्रवृत्तींना खतपाणी घालत आहोत, हे अबू आझमी यांच्यासारख्या लोकांना कळत नाही, असे वाटून घेणे बालबोधपणाचे ठरेल.
भारत हा दोन प्रकारच्या प्रवृत्तीमुळे त्रस्त झालेला आहे. एका बाजूला काही लोक स्वत:ला औरंगजेबाचे वारसदार मानून त्याची भलामण करतात, तर दुसर्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने करणारे राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यासारखे अस्तनीतले निखारे आहेत. आपण बोलताना कुणाविषयी काय बोलत आहोत, याचे यांना भान कसे राहत नाही, हा एक संशोधनाचा विषय आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर जेव्हा जनक्षोभ उसळतो, तेव्हा मग कुठे तरी लपून बसायचे, नाही तर मग व्हिडिओ प्रसिद्ध करून दिलगिरी व्यक्त करायची, यावेळी त्यांना माफी हा शब्द उच्चारतानाही लाज वाटते.
राहुल सोलापूरकर हे एक अभ्यासू व्यक्ती आहेत, ते महापुरुषांच्या जीवनावर व्याख्याने देतात. अशा लोकांना आपण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जाहीरपणे काय बोलत आहोत याचे भान असू नये याचे आश्चर्य वाटते. दुसर्या बाजूला प्रशांत कोरटकर या व्यक्तीने इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना फोन करून छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधाने केली. त्यानंतर त्याने तो मी नव्हेच असा पवित्रा घेतला, पण आपले पितळ उघडे पडले आहे, हे कळल्यावर तो राज्याबाहेर पळून गेला.
आता कुठून तरी लपून मला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आहे, असे म्हणत आहेत. मुद्दा असा आहे की, सोलापूरकर असो की कोरटकर असो, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल इतका आदर असेल तर मग त्यांचा अवमान करणारी वक्तव्ये तुमच्या तोंडातून येतातच कशी? की जे तुमच्या पोटात मळमळत असते, ते अस्वस्थ झाल्यामुळे ओठात येते? अशा या अस्तनीतल्या निखार्यामुळे सामाजिक सलोख्याला आग लागत असते.
त्यामुळे सरकारने अशांचा चोख बंदोबस्त करायला हवा. अशा वेळी आपपरभाव ठेवू नये. औरंगजेबाची भलामण करणार्या अबू आझमींवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी त्वेषाने मागणी करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर या दोघांविषयी शांत कसे काय, हा कोड्यात टाकणारा प्रश्न आहे. कारण या दोघांनी तर दोन्ही छत्रपतींचा अवमान केलेला आहे.