देशातील बहुतांश राजकारणी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये दादा, भाई, मामा, साहेब अशा विविध आदरयुक्त नावांनी लोकप्रिय असतात. परंतु जनता दल युनायटेडचे (जदयू) प्रमुख नितीश कुमार पलटूराम या टोपणनावाने बिहारच्या राजकारणात ओळखले जातात. कधी केंद्रात तर कधी राज्यात आघाड्या-कुरघोड्यांचे राजकारण करत संधी मिळेल तशी सत्तेच्या दिशेने निघालेल्या नौकेत ऐनवेळी उडी मारण्यासाठी नितीश कुमार प्रसिद्ध आहेत.
त्यांच्या पलटूगिरीचे डझनभर किस्से गाजलेले आहेत. अगदी ६ ते ७ महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने नितीश कुमारांच्या या पलटूगिरीचा अनुभव इंडिया आघाडीतील सर्वच राजकीय पक्षांनी घेतला. भाजपविरोधात उघड भूमिका घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आदींवर जळजळीत भाषणे ठोकणारे नितीश कुमार निवडणूक लागण्याच्या आधी टुणकन उडी मारून एनडीएत कधी सामील झाले हे इंडिया आघाडीतील अनेकांना कळलेही नाही.
टेलिव्हिजन मीडियासोबतच सोशल मीडियाचा कॅनव्हास मोठा असल्याने नितीश कुमारांच्या पलटूगिरीचा अनुभव देशातल्या जनतेलाही घेता आला. नितीश कुमारांच्या पलटूगिरीचा मुद्दा इथे मांडण्यामागे केंद्रात पडद्यामागे सुरू असलेल्या काही सूचक हालचाली आहेत.
नितीश कुमारांचा जदयू हा केंद्रातील भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) एक प्रमुख घटक पक्ष आहे. जदयूचे १२ खासदार केंद्राच्या सत्तेत सहभागी आहेत. त्यातील काहींना मंत्रीपदेही मिळालेली आहेत. तरीही नितीश कुमार सध्या काही कारणांनी नाराज आहेत. त्यांच्या नाराजीमागचे कारण ठरले आहे ते केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी केलेले एक वक्तव्य. यावर्षीच्या नोव्हेंबरमध्ये बिहार विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजप, जदयू, राजद, हिंदुस्थान अवामी मोर्चा आदी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.
या पार्श्वभूमीवर एका प्रसार माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत अमित शहांना बिहारचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर निवडणुकीनंतर भाजपचे संसदीय मंडळ मुख्यमंत्रीपदाच्या चेहर्यावर निर्णय घेईल, असे ठोकळेबाज उत्तर अमित शहांनी दिले. अमित शहांचे हेच उत्तर नितीश कुमारांना खटकल्याचे म्हटले जात आहे. नितीश कुमार सध्या बिहारचे मुख्यमंत्री आहेत.
बिहारच्या २४३ जागांच्या विधानसभेत भाजपकडे ७८ आणि जदयूकडे ४५ जागा असूनही भाजपने बिहारमध्ये नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद बहाल केले आहे. राजद (७९) आणि काँग्रेस (१९)ची साथ सोडून भाजपसोबत आल्याचा मोबदला म्हणून नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याची भाजपही ही खेळी असली, तरी पुढच्या वेळी हाच फॉर्म्युला कायम ठेवण्याची भाजपकडून सूतराम शक्यता नाही.
महाराष्ट्रातील निवडणुकीनंतर राज्यात बिहारचा फॉर्म्युला वापरा आणि माझे मुख्यमंत्रीपद कायम ठेवा यासाठी आठवडाभर रुसून बसलेल्या एकनाथ शिंदेंची डाळ काहीकेल्या शिजली नाही. तीच वेळ कदाचित बिहार निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यास ७३ वर्षांच्या नितीश कुमारांवर येऊ शकते. म्हणूनच मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करण्यासाठी दिल्लीत गेलेल्या नाराज नितीश कुमारांनी भाजपच्या एकाही वरिष्ठ नेत्याची भेट घेतली नव्हती.
आरिफ खान यांनी गुरुवारी बिहारचे नवे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यातही नितीश कुमारांची नाराजी दिसली. ही नाराजी हेरून नितीश कुमार पुन्हा आमच्यासोबत आल्यास त्यांचे स्वागतच करू असा टोला राजदचे प्रमुख लालू प्रसाद यांनी लगावला. यानंतर चर्चांना पुन्हा उधाण आले. नितीश कुमार निवडणुकीआधी केंद्र आणि राज्यातील सत्तेतून बाहेर पडतील, असा कयास आहे. केंद्रातील एनडीए सरकार सध्या मित्रपक्षांच्या पाठबळावर टिकून आहे.
भाजप (२४०) बहुमतापासून दूर राहिल्याने त्यांना सत्तास्थापनेसाठी जदयू (१२), टीडीपी (१६) अशा मित्रपक्षांची साथ घ्यावी लागली आहे. नितीश केंद्राच्या सत्तेतून बाहेर पडल्यास एनडीएला (२९३) धोका नसला, तरी भाजपने काही दिवसांपूर्वीपासूनच पर्यायी मित्राची चाचपणी सुरू केल्याचे म्हटले जाते. हा पर्यायी मित्र आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष. शरद पवार यांच्या पक्षाचे ८ खासदार आहेत.
अजित पवारांचा १ खासदार जोडल्यास राष्ट्रवादीचे एकूण ९ खासदार होतात. काही दिवसांपूर्वीच शेतकर्यांच्या एका शिष्टमंडळासोबत शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट झाली होती. तत्पूर्वी शरद पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अमित शहा यांनी पवारांची दिल्लीतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली होती.
इंडिया आघाडीत काँग्रेसचे राहुल गांधी, शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे अदानींविरोधात उघड भूमिका घेत असले, तरी शरद पवार, सुप्रिया सुळे यांची अदानींबाबतची भूमिका मवाळ आहे. या दोघांमधील संबंधही जगजाहीर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात अदानी हा एक समान धागा आहे. त्यामुळे आगामी काळात एनडीएतून नितीश कुमार बाहेर आणि शरद पवार एनडीएत गेल्यास आश्चर्य वाटायला नको. फक्त यावेळी या दोघांमधला पलटूराम कोण असेल ते लवकरच दिसेल.