न्यायवैद्यक शास्त्राचे प्रणेते डॉ. एडमंड लोकार्ड यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, गुन्हा केल्यानंतर आरोपी तिथे कुठला ना कुठला पुरावा सोडतोच. त्यांचे हे वाक्य जरी खरे असले तरी तो पुरावा शोधून त्याची संबंधित गुन्ह्याशी सांगड घालणे आणि देशातील कायद्याच्या चौकटीत हे सर्व न्यायालयापुढे ठेवणे हे काम पोलिसांचे आणि सरकारी वकिलांचे असते.
या साखळीतील प्रत्येकाने आपले काम चोखपणे केले तर केरळमधील नेयातीकरा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालासारखा निकाल येऊ शकतो. ज्या गुन्हेगारी खटल्यासंदर्भात हा निकाल दिला आहे, ती संपूर्ण घटनाच ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’ या वर्गवारीत मोडणारी आहे. अगदी गेल्याच आठवड्यात न्यायालयाने हा निकाल दिला.
आता काय आहे प्रकरण ते पाहू. केरळमधील एक तरुणी आणि तरुण यांच्यातील ही प्रेमकहाणी. तरुणीचे नाव आहे ग्रीष्मा आणि तरुणाचे नाव आहे शॅरॉन. 2021 मध्ये हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले, पण काही दिवसांतच ग्रीष्माच्या घरच्यांनी तिचे लग्न एका दुसर्याच मुलाशी निश्चित केले. त्याचे नाव आहे सतीश. त्यांचा साखरपुडाही झाला. या साखरपुड्यानंतरही ग्रीष्माने शॅरॉनशी असलेले प्रेमसंबंध कायम ठेवले.
मला तुझ्याशीच लग्न करायचे आहे, तुझ्यासोबत पळून यायला मी तयार आहे वगैरे ग्रीष्माने शॅरॉनला सांगितले. त्यानंतर या दोघांनी गुपचूप 2022 मध्ये लग्न केले. लग्नानंतर इतर दाम्पत्यांमध्ये जे काही होते ते सर्व या दोघांमध्येही झाले. फक्त त्याबद्दल दोघांच्याही कुटुंबीयांना काहीही माहिती नव्हते. इथपर्यंत सगळे अगदी इतर प्रेमकथांमध्ये घडते त्याचप्रमाणे घडत गेले, पण जसजशी सतीशशी ठरलेल्या लग्नाची तारीख जवळ येऊ लागली तसतशी ग्रीष्मा शॅरॉनशी असलेले प्रेमसंबंध तोडायला लागली.
शॅरॉनला ते मान्य नव्हते, कारण त्याचे ग्रीष्मावर जीवापाड प्रेम होते. दोघांनी गुपचूप लग्न केलेले असल्यामुळे आता मागे का फिरायचे, असा प्रश्न होता त्याचा. आपल्या मागणीचा शॅरॉन विचार करीत नसल्याचे लक्षात आल्यावर ग्रीष्माने एक प्लॅन आखला. तो होता शॅरॉनला कायमचे संपवण्याचा, पण त्यासाठी तिने जी पद्धत वापरली ती वेगळीच होती.
ग्रीष्माने पहिल्यांदा गुगलवर जाऊन पॅरासिटॅमॉलचा अधिक डोस दिल्याने शरीरावर काय परिणाम होतो याचा शोध घेतला. त्याचे उत्तर मिळाल्यावर तिने खूप सार्या पॅरासिटॅमॉल आणि डोलो गोळ्या पाण्यात मिसळून त्याचा अर्क तयार केला. तो अर्क तिने एका ज्यूसमध्ये मिसळला आणि शॅरॉनला पिण्यासाठी दिला. ज्यूसची चव कडवट लागल्याने शॅरॉनने ते प्यायला नकार दिला. दोघांमध्ये यावरून वादविवाद झाले, पण तो ज्यूस प्यायला नाही. हा होता शॅरॉनला मारण्याचा ग्रीष्माचा पहिला प्लॅन. तो अयशस्वी ठरला, तरी शॅरॉनला कायमचे संपवण्याचा तिच्या मनाने केलेला निश्चय संपला नव्हता.
ग्रीष्माने पुन्हा एकदा शॅरॉनला आपण त्याच्या प्रेमात आहोत हे दाखवायला सुरुवात केली. शॅरॉनशी असलेले शारीरिक नाते आहे त्याच पद्धतीने तिने चालू ठेवले. पुन्हा एकदा तिने गुगलवर काही कीटकनाशकांबद्दल शोध घेण्यास सुरुवात केली. त्या कीटकनाशकांमुळे मानवी शरीरात काय बदल होतात, शरीरातील विविध अवयव निकामी होतात का याची माहिती तिने जमवली आणि ते कीटकनाशकही मिळवले.
खूप सार्या पॅरासिटॅमॉलमिश्रित ज्यूस प्यायला शॅरॉनने नकार दिल्याचा मागचा अनुभव तिच्याकडे होता. त्यामुळे यावेळी त्याला खूप भावनिक केले पाहिजे याचा मनोमन तिने निश्चयही केला होता. एके दिवशी तिने शॅरॉनला फोन केला आणि तुझे अपहरण होईल, तुला मारून टाकतील, असे सांगत त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली. तिच्या फोननंतर लगेचच तो एका मित्राला घेऊन तिच्या घरी गेला.
यावेळी तिने भावनिक साद घालत एक सरबत पिण्याचा आग्रह शॅरॉनला केला. आपल्यातील प्रेमासाठी हे सरबत प्यायलेच पाहिजे, असे ग्रीष्माने त्याला सांगितले. तिच्या प्रेमपूर्वक आग्रहावरून त्याने ते कडू सरबत प्यायलेसुद्धा. याच सरबतात ग्रीष्माने ते कीटकनाशक मिसळले होते. ते प्यायल्यानंतर तिथून बाहेर पडल्यावर काही वेळातच त्याला उलट्या होऊ लागल्या.
ज्या पद्धतीने गुगल सर्चमध्ये ग्रीष्माने सगळे शोधले होते त्याच पद्धतीने एक एक लक्षण शॅरॉनमध्ये दिसू लागले होते. ग्रीष्माने आपल्याला फसवले, तिने सरबतात काहीतरी वेगळेच मिसळले हे शॅरॉनला कळले होते, पण त्याचे तिच्यावर प्रेम होते, त्यामुळे त्याने तिच्याविरोधात ब्रसुद्धा काढला नाही. अगदी मृत्यूपूर्वी पोलिसांना दिलेल्या जबाबातही त्याने ग्रीष्माविरोधात काहीही तक्रार केली नाही. कीटकनाशकामुळे शॅरॉनचा रुग्णालयात मृत्यू झाला.
ग्रीष्मानेच हेतूपूर्वक हे सगळे केले होते हे जरी शॅरॉनच्या नातेवाईकांना, त्याच्या मित्रांना ठाऊक असले तरी न्यायालयात सिद्ध कसे करायचे, हा मोठा प्रश्न होताच, पण या खटल्यामध्ये तेथील पोलीस, न्यायवैद्यक विभागाचे अधिकारी आणि तज्ज्ञ यांनी खूप बारकाईने काम करून विविध पुरावे पुढे आणले, पण या सगळ्यामध्ये महत्त्वाचे काम केले ते ग्रीष्माने केलेल्या गुगल सर्चने.
शॅरॉनला मारण्याच्या पहिल्या प्रयत्नावेळी पहाटे पहाटेच ग्रीष्माने पॅरासिटॅमॉल गोळीचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्यावर काय दुष्परिणाम होतात याचा शोध घेतला होता. सरबतामध्ये कीटकनाशक मिसळून शॅरॉनला ते प्यायला देण्याच्या काही दिवस आधीच ग्रीष्माने याबद्दल गुगलच्या माध्यमातून सविस्तरपणे माहिती जमवली होती. ते नेमके कीटकनाशकही तिने मिळवले होते. विशेष म्हणजे हे सगळे शोध घेतल्यानंतर तिने आपली सर्च हिस्ट्री डिलिट केली होती, जेणेकरून पोलिसांना संशय आला तरी काहीही पुरावे मिळू नयेत.
न्यायवैद्यक विभागातील अधिकार्यांनी तज्ज्ञांच्या साह्याने ही सर्च हिस्ट्री पुन्हा शोधून काढली. त्यावेळी गुगलवर सर्च केलेली हिस्ट्री डिलिट केल्यानंतर ती पुन्हा मिळवता येते का असा शोध ग्रीष्मानेही घेतल्याचे आढळले. ग्रीष्माने शॅरॉनला मारण्याच्या उद्देशानेच हे सगळे सर्च केले आणि त्याप्रमाणे पुढे कृती केली याची साखळी जोडण्यात पोलिसांना यश आले.
आपल्याकडील कायद्यानुसार परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारेही आरोपीला शिक्षा सुनावता येऊ शकते, फक्त आरोपीनेच गुन्हा केला आहे असे त्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयापुढे सिद्ध करता आले पाहिजे. त्याविषयी कुठलीही शंका राहता कामा नये. या प्रकरणात हे पुरावे महत्त्वाचे ठरले आणि 24 वर्षांच्या ग्रीष्माला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.
आपल्या निकालपत्रामध्ये अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. बशीर यांनी म्हटले आहे की, ‘ग्रीष्माने शॅरॉनला तडफडायला लावून मारले, पण ढगातील (क्लाऊड) देवानेच या गुन्ह्यातील डेटा सांभाळून ठेवला.’ गुगल सर्चच्या माध्यमातून ग्रीष्माने जो काही शोध घेतला होता त्या सगळ्याचा डेटा मिळाल्यामुळेच पोलीस तिच्यापर्यंत पोहचू शकले.
न्यायालयाने हा गुन्हा दुर्मीळातील दुर्मीळ ठरवला असून ग्रीष्माने केलेल्या कृत्यामुळे समाजात प्रेमसंबंधात असलेले तरुण-तरुणी एकमेकांकडे कायम संशयाने पाहतील, असेही म्हटले आहे. कायद्यातील तरतुदीनुसार आता सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा तेथील उच्च न्यायालयाकडून कायम केली जाईल की नाही हे पाहावे लागेल.
शिक्षा काहीही मिळाली तरी ग्रीष्माच्या दुष्कृत्यांचा पुराव्यानिशी उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. खूप सारी प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. तिथे न्याय लवकर मिळत नाही. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, हे तर आपण ऐकतच असतो, पण असा एखादा निकाल आपल्याला पोलिसांवरील, तपास यंत्रणांवरील, न्यायालयांवरील विश्वास आणखी वाढवण्यास मोलाची मदत करतो एवढे मात्र नक्की.