क्षेत्र कोणतेही असो, व्यवहार हाच जगण्याचा आधार आहे. उगाच ताकाला जाऊन भांडे कशाला लपवायचे. आपल्या समाजामध्ये ज्याला व्यवहार कसा करायचा चांगले समजते, तोच पुढे जातो. लौकिक-भौतिक अर्थाने त्याचा विकास होतो आणि त्यामुळेच त्याला आदर वगैरेही मिळू लागतो. ज्यांना व्यवहार जमत नाही त्यांना आपल्याकडे फारशी किंमत नसते. घरातही त्यांचे कोणी ऐकत नाही. कारण बुद्धिमत्ता, समंजसपणा, वेगळा विचार करण्याची क्षमता, विश्लेषण करण्याची ताकद आणि अनुभव या सगळ्यापेक्षा आपल्याकडे व्यवहार येतो का, यालाच जास्त महत्त्व दिले जाते.
व्यवहार करताना एकच मुद्दा महत्त्वाचा असतो तो म्हणजे स्वत:चा कसा जास्त फायदा होईल हे समजणे. ‘व्यवहारात हुशार’ याचा अर्थ दुसर्यावर कुरघोडी करून स्वत:चा फायदा साधणे असा घेतला जातो. सहज म्हणून राजकारण्यांकडे बघा. ते या कामामध्ये सर्वात हुशार असतात. खरंच राज्याचा विकास झाला का, झालाच असेल तर तो कोणी केला, नसेल झाला तर त्याला जबाबदार कोण, झालेल्या विकासाचा आपल्याला काय फायदा झाला, असे प्रश्न सहज म्हणून शांतपणे स्वत:ला विचारा आणि उत्तरे शोधा.
मग तुम्हाला समजेल की राज्यातील नागरिकांसाठी आम्ही इतके काही केले म्हणणार्या राजकारण्यांची संपत्ती पाच-पाच वर्षांमध्ये कशी वेगाने वाढते. याचे कारण त्यांना व्यवहार कसा करायचा हे नीटपणे समजते. दुसरे म्हणजे ज्यांना व्यवहार करण्याचे गमक कळते त्यांचीच राजकारणात चलती असते. जे केवळ समाजकारणासाठी राजकारण वगैरे बडबडत राहतात, ते त्यांच्या वॉर्ड आणि प्रभागापुरतेच अडकून राहतात.
विषय व्यवहाराचा आहे तर सोशल मीडियावरच्या व्यवहाराचाही विचार केला पाहिजे. सोशल मीडियावर वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स येऊन स्थिरावले आहेत. या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर लाखो युजर्स आहेत. ते दिवसातील बराचसा काळ या व्यासपीठांवर सक्रिय असतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही क्षण हलक्या-फुलक्या पद्धतीने घालवता यावेत, आभासी जगात का होईना आपल्या मित्र-मैत्रिणींच्या, नातेवाईकांच्या, आप्तेष्टांच्या संपर्कात राहता यावे यासाठी या व्यासपीठांवर अनेक जण आले.
सुरुवातीला हे सगळे त्याच पद्धतीने सुरू होते, पण हळूहळू आपल्या स्थायीभावाप्रमाणे सोशल मीडियावरही सुरू झाला व्यवहार… आता या व्यासपीठांवरील सुरुवातीचा हलके-फुलकेपणा विरळ होऊन उरलाय फक्त व्यवहार! सोशल मीडियावर लोक कशा पद्धतीने एकमेकांशी वागतात याचा सहज म्हणून अभ्यास करायला लागल्यावर हे लक्षात यायला लागते. या व्यवहारातून जरी कोणाला आर्थिक नफा कमवायचा नसला तरी व्यवहारातून पदरात काहीतरी पाडून घ्यायचे असते. मग लाईक असू दे, शेअर असू दे, कमेंट असू दे किंवा आभासी जगातून बाहेर येऊन प्रत्यक्षातील आयुष्यात केली जाणारी मदत असू दे.
आपण सोशल मीडियावर एखादी पोस्ट प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर येणार्या प्रतिक्रिया या फक्त आपल्या पोस्टसंदर्भातच असतात असा गैरसमज करून घेऊ नये. कारण या प्रतिक्रिया देण्यामागे संबंधितांकडून एक व्यवहार सुरू असतो. अनेक वेळा हा व्यवहार खूप उशिरा लक्षात येतो, पण जेव्हा लक्षात येतो त्यावेळी धक्काच बसतो. कारण प्रतिक्रिया देणार्यांपैकी वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळा व्यवहार डोक्यात ठेवून तुमच्या पोस्टवर आपल्या भावना व्यक्त केलेल्या असतात.
काहींना तुमच्याकडून बदल्यात काही कमेंट्स किंवा लाईक्स हवे असतात. काहींना तुमच्याकडून त्यांच्या पोस्ट शेअर केल्या जाव्यात अशी अपेक्षा असते. काहींना तुमच्याकडून काही सवलतींची अपेक्षा असते, तर काहींना तुमच्यासोबत प्रत्यक्ष मैत्री वाढवायची असते. जर तुम्ही त्याला खतपाणी घालण्यासारखे काही संकेत दिले, तर त्यांचा व्यवहार पुढे सरकतो आहे असे त्यांना जाणवते. जर तुम्ही तसे काही संकेत दिलेच नाहीत, तर मग हळूहळू या कामातून आपल्याला काहीच मिळणार नाही असे समोरच्याला जाणवू लागते आणि मग तो हळूहळू तुमच्या पोस्टकडे दुर्लक्ष करायला लागतो.
व्यवहारामध्ये असेही काही असतात की जे तटस्थ राहून त्यांचा व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. ते तुमच्या सगळ्या पोस्ट फॉलो करीत असतात. काही लिहिले असेल तर वाचत असतात आणि व्हिडीओ असेल तर बघत असतात, पण ही मंडळी कधीच त्यावर काहीच प्रतिक्रिया देत नसतात. ना लाईक, ना कमेंट, ना शेअर. कधीच काही नाही. तुमच्या पोस्टवर काही प्रतिक्रिया देऊन तुम्हाला कशाला मोठे करायचे? बरं, तुमच्या पोस्टवर मी काही प्रतिक्रिया देणे म्हणजे मी लहान आणि तुम्ही मोठे असे या मंडळींना वाटत असते.
अशा स्थितीत काहीतरी लिहिण्यापेक्षा किंवा लाईक करण्यापेक्षा काहीच न बोलता शांत राहणे असे करून त्यांनी त्यांचा व्यवहार साधलेला असतो. जेव्हा कधी यापैकी काही मंडळी प्रत्यक्षात समोर येतात त्यावेळी ते एकांतात तुमच्या पोस्टचा विषय निघाला की चुरूचुरू बोलू लागतात. मग आपल्याला प्रश्न पडतो की याच्याकडे एवढी सगळी माहिती आहे, तर मग तो तिथे पोस्टखाली कधीच काही प्रतिक्रिया का देत नाही? खरंतर असे अनेकांच्या बाबतीत घडलेले असेल. जेव्हा हे वाचाल त्यावेळी असे अनेक प्रसंग आपल्याबाबत घडले आहेत याची सहजपणे जाणीव होईल.
वर ज्यांचा उल्लेख केला त्यांच्या अगदी विपरीत म्हणजे दिसेल त्या पोस्टवर लाईक करत बसणारे. ही मंडळी म्हणजे ज्यांना सोशल मीडियावरचा हा ‘व्यवहार’ अजिबातच कळत नाही अशा वर्गातले. सोशल मीडियावरील एखादा प्लॅटफॉर्म उघडल्यावर तिथे दिसणार्या सगळ्या पोस्टवर सरसकट लाईक करीत सुटतात ही मंडळी. ‘हे प्रभू, कौन है यह लोग, कहां से आते है यह लोग’, असा प्रश्न सोशल मीडिया प्लॅटफॉर्म निर्माण करणार्या मंडळींना पडलेला असेल.
कारण या युजर्सना नक्की काय आवडते याचा थांगपत्ता त्यांच्या अल्गोरिदमलाही लागलेला नाही. त्यामुळे या लोकांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार काय दाखवायचे, असा प्रश्न अल्गोरिदम तयार करणार्यांनाही पडला असेल की काय, असा प्रश्न सहजपणे मनात येतो. हे जरी स्वत:च्या फायद्याचा व्यवहार करण्यात पटाईत नसले तरी तेसुद्धा जिथे-तिथे लाईक करून एकप्रकारे व्यवहारच करीत असतात.
व्यवहाराचा हा मुद्दा हळूहळू सोशल मीडियावरून प्रत्यक्षातील जीवनात येऊन ठेपतो. म्हणजे सोशल मीडियावर जर तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या पोस्टवर कमेंट करीत असाल, लाईक करीत असाल, तर तो किंवा ती तुम्हाला प्रत्यक्ष भेटल्यावर वेगळ्याच पद्धतीने वागवते. तुमचे स्वागत जरा जास्तच प्रेमळ पद्धतीने करते. एखाद्या समारंभात तुम्ही भेटणार असाल, तर तुम्हाला इतरांपेक्षा वेगळी वागणूक दिली जाते. कारण तुम्ही त्यांना सोशल मीडियावर पाठिंबा देत असता. जर तुम्ही त्यांना तिथे लाईक करणे कमी केले, त्यांच्या पोस्ट शेअर करणे कमी केले तर प्रत्यक्ष जीवनातही ती व्यक्ती तुम्हाला दूर ठेवणेच पसंत करते. तुम्हाला खासगी कार्यक्रमांना बोलावणेही टाळू लागते.
सोशल मीडिया आता आभासी जगासोबत प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. लोकांना कुठेही गेल्यावर तिथे काय आहे हे स्वत: पाहण्यापेक्षा तिथे आम्ही कसे एन्जॉय करतोय हे तुम्हाला दाखवण्यात जास्त रस असतो. हासुद्धा एक प्रकारचा व्यवहारच असतो. कारण त्यातून संबंधित व्यक्तीला इतरांचा कुठला तरी जुना हिशेब चुकता करायचा असतो. कोणाला काहीतरी दाखवायचे असते. वरवर हे सहजपणे पोस्ट केल्याचे दाखवून दिले जात असले तरी त्यामागेही डोक्यात काहीतरी प्लॅन असतोच. हा प्लॅन त्याच व्यवहारातून तयार झालेला असतो.
सोशल मीडियातील व्यवहाराच्या संकल्पनेतून असे सगळे होत असल्यामुळे आधी म्हटल्याप्रमाणे तिथे मनापासून प्रतिक्रिया देणारे युजर्स कमी कमी होत चालले आहेत. व्यवहार आधी मग बाकी सगळे, या विचारामुळे आपल्या एखाद्या पोस्टवर आलेल्या प्रतिक्रियांचेही गेटकिपिंग करण्याची वेळ संबंधितांवर येते. ‘चार प्रतिक्रिया ते आमच्या पोस्टवर करतात आणि चार लाईक्स आम्ही त्यांच्या पोस्टला करतो’, असा सगळा व्यवहार आहे. सोशल मीडिया फुकट असला तरी त्यावरील व्यवहारात स्वत:चा फायदा बहुतेकांना हवाच आहे.