Homeसंपादकीयअग्रलेखSantosh Deshmukh Murder : कठोर निर्णयाची अपरिहार्यता!

Santosh Deshmukh Murder : कठोर निर्णयाची अपरिहार्यता!

Subscribe

परळीमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची भयानक प्रकारे हत्या करण्यात आल्यानंतर बीड जिल्ह्यातील विविध भयंकर प्रकार पुढे आले. त्याचे प्रमाण इतके होते की, संतोष देशमुख यांची हत्या हे केवळ हिमनगाचे टोक आहे, असे म्हणण्याची वेळ यावी. बीडमधील वाळू माफिया, राख माफिया, अनेकांकडे असलेली बेकायदेशीर शस्त्रे, त्यांचा एकमेकांविरोधात होणारा बेछूट वापर अशा अनेक गोष्टी पुढे येऊ लागल्या.

या सगळ्याचा केंद्रबिंदू होता तो त्या घटनेनंतर फरार झालेला वाल्मिक कराड. त्याच्या अंगी जर कुठला दोष नव्हता, तर तो अनेक दिवस गायब का झाला होता. त्याचसोबत या कराडचे बोलवते धनी म्हणून राज्यातील महायुती सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून आरोप होऊ लागले.

त्यावेळी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होते. तेव्हा धनंजय मुंडे अधिवेशनात गैरहजर असत. इतकेच नव्हे तर नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंंबईत येऊन गेले. त्यांनी महायुतीच्या सगळ्या आमदारांचे एक मार्गदर्शन सत्र घेतले. त्याला धनंजय मुंडे गैरहजर होते. ज्यावेळी खुद्द पंतप्रधान सगळ्या आमदारांना बोलावतात, त्यावेळी एखादा आमदार असलेला मंत्री कसा काय गैरहजर राहू शकतो, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी तर आका आणि आकाचा आका, अशी टोपण नावे देत वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा अखंड पंचनामाच सुरू ठेवला आहे. सुरेश धस हे जे धाडस दाखवत आहेत, त्याचे अनेकांना आश्चर्य आणि कौतुकही वाटत आहे. त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीसुद्धा धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावेच लागेल, अशी मागणी सातत्याने लावून धरली आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गायब झालेला वाल्मिक कराड मोठ्या नाट्यपूर्ण प्रकारे पोलिसांना शरण आला. त्यानंतर जेव्हा मोठा जनक्षोभ उसळला, संतोष देशमुख यांच्या भावाने पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करण्याचा इशारा दिला तेव्हा कराडला मकोका लावण्यात आला. महायुतीच्या पालकमंत्रीपदाचे घोेडे बराच काळ अडलेले होते. पालकमंत्री हे पद आर्थिकदृष्ठ्या फार महत्त्वाचे मानले जाते, त्यामुळे ते मिळवण्यासाठी मोठी धडपड सुरू असते.

अखेर शेवटी शनिवारी पालकमंत्रीपदे जाहीर करण्यात आली, पण धनंजय मुंडे यांना कुठल्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आलेले नाही. त्यातून धनंजय मुंडे यांना आपल्या भविष्याचे संकेत कदाचित मिळाले असावेत. कारण वाल्मिक कराड हा मुंडे कुटुंबीयांचा एकेकाळी घरगडी होता आणि त्यांचा खास माणूस आहे, हे पुढे आलेले आहे.

या कराडचे अचंबित करणारे अनेक कारनामे पुढे येत आहेत. एखादा माणूस जेव्हा आपल्या दहशतीने इतकी माया जमवतो, इतकी जरब निर्माण करतो, अटकेत असल्यावरही परळी बंद पाडतो, तेव्हा त्याला राजकीय पाठबळ असल्याशिवाय ते शक्य नसते, हे लोकांना माहीत आहे.

संतोष देशमुख यांची हत्या आणि वाल्मिक कराड याचे कारनामे या गोष्टी महायुती सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. कारण विशेषत: उद्धव ठाकरे गटाकडून महायुतीवर आणि गृहमंत्री फडणवीसांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. कारण राज्यातील गुंडगिरी, माफिया राज संपवण्याची जबाबदारी गृहखात्याची असते. त्यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांना कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत.

धनंजय मुंडे यांना याची कुणकुण लागली असावी, म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रसच्या शिर्डीतील नवसंकल्प शिबिरात धनंजय मुंडे यांनी रविवारी भाजपला अप्रत्यक्षपणे लक्ष्य करण्याच्या हेतूनेच पहाटेच्या शपथविधीचा विषय उपस्थित केला असावा. कारण हा विषय तसा आता जुना झालेला आहे. अजितदादा आता भाजपसोबत येऊन स्थिरावले आहेत. असे असताना २३ नोव्हेंबर २०१९ रोजी पहाटेचा शपथविधी पार पडला होता. त्यावेळी मी अजितदादांना सांगत होतो भाजपसोबत जाऊ नका. हे षड्यंत्र आहे.

तेव्हापासून अजितदादांना पक्षातून दूर करण्यासाठी षड्यंत्र सुरू झाले, असे मुंडे म्हणाले. मुंडे यांनी हा विषय उकरून काढून अजित पवार यांनाही पेचात टाकले आहे. अजित पवार यांनी आजवर धनंजय मुंडे यांची पाठराखण केलेली दिसत आहे, पण एकूणच लोकभावनेचा विचार करता भाजपला ते परवडणारे नाही. त्यांना सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी काही ठोस निर्णय घ्यावे लागणार आहेत. कारण आगामी काळात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत.

सध्या बीडमधील एकूणच परिस्थितीचा जाहीर पंचनामा प्रसारमाध्यमांवरून होत आहे. त्यावरून विरोधकांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा लावून धरला आहे. महायुतीतील मुख्य पक्ष असलेल्या भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला प्रभाव वाढवायचा असेल तर दादांना काय वाटेल, याचा विचार करून चालणार नाही. कठोर निर्णय घेणे ही त्यांची अपरिहार्यता असेल.