सल्ले द्यायला कोणाला आवडत नाही? सल्ले देण्यासाठी प्रत्येकजण तयारच असतो. त्यातही एखाद्याने चूक केली की, तू कसा ‘मूर्खपणा’ केला, हे सांगायला अनेकजण सरसावतात. पण हेच सरसावणारे जेव्हा घोडचूक करतात तेव्हा? कोणताही आगापिछा नसलेल्या कंपन्यांच्या जाहिरातीवर डोळे झाकून विश्वास ठेवायचा आणि आपल्या आयुष्यभराची कमाई त्यात कथितरित्या गुंतवायची, हा कसला शहाणपण म्हणायचा?
म्हणूनच टोरेस या कंपनीच्या गुंतवणूकदारांच्या नशिबात केवळ डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली आहे. टोरेस कंपनीच्या कर्त्याधर्त्यांनी अवघ्या ११ महिन्यांत दादरसह गिरगाव, कांदिवली, कल्याण, सानपाडा, मीरा रोड येथे कार्यालये थाटली आणि गुंतवणुकीवर दर आठवड्याला १० टक्के व्याज परतावा देणार असल्याचे आमिष दाखवले.
अपेक्षेप्रमाणे या आमिषाला भुलून मुंबईतील जवळपास ३ लाख गुंतवणूकदारांनी ही विषाची परीक्षा केली. कंपनीने दाखवलेल्या प्रलोभनाला बळी पडत, अनेकांनी आपल्या घामाचा पैसा, निवृत्तीनंतर आधार असलेला भविष्य निर्वाहनिधीदेखील या कंपनीत गुंतवला. एवढेच नव्हे तर, टोरेसमधून ग्राहकांना बनावट हिरे विकल्याचे समोर आले आहे. बाजारात ज्याची किंमत २०० ते ३०० रुपये आहे, असे हिरे त्यांनी ६ ते ७ हजार रुपयांना विकले.
गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन टोरेस कंपनीचे संचालक, व्यवस्थापक यांच्यासह अन्य संबंधितांनी गाशा गुंडाळला. आपली फसवणूक झाल्याचे कळताच सोमवारी शेकडो गुंतवणूकदारांनी मुंबईतील दादर, नवी मुंबईतील तुर्भे आणि मीरा-भाईंदर कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. हे सर्व भामटे पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्वरित हालचाल करत कंपनीचा संचालक सर्वेश अशोक सुर्वे, महाव्यवस्थापक तानिया कसातोवा आणि स्टोअर इन्चार्ज व्हेलेंटिना कुमार यांच्या मुसक्या आवळल्या.
पण पुढे काय? गुंतवणूकदारांना पैसे परत मिळणार आहेत का? मिळणार असतील तर ते कधी? मुळात अशा एकापाठोपाठ एक अशा अनेक खासगी योजनांद्वारे लहान-लहान कंपन्या गुंतवणूकदारांना आमिष दाखवत असतात. १९९६ मधील बेस्ट कर्मचारी अशोक शेरेगर प्रकरणापासून अशा फसव्या गुंतवणुकीचे प्रकार ठळकपणे समोर आले. अवघ्या ३० दिवसांत गुंतवणूक दुप्पट करून देण्यास त्याने सुरुवात केली होती.
१९९७ मध्ये आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अटक कारवाई सुरू केली. त्याच्यापाठोपाठ सीयू मार्केटिंग या कंपनीच्या माध्यमातून उदय आचार्य यानेही अशाच विविध योजना लोकांसमोर मांडल्या. बनावट योजनांद्वारे त्याने सुमार २६ हजार गुंतवणूकदारांचे जवळपास ४०० कोटी हडप केले. त्याला १९९९ला अटक करण्यात आली.
समृद्ध जीवन या नावाने गुंतवणूकदारांना प्रलोभन दाखविणारा महेश मोतेवार यालाही पोलिसांनी २०१५ मध्ये ताब्यात घेतले. सेबीची कोणतीही परवानगी न घेता मोतेवारकडून गुंतवणूक आणि ठेवी स्वीकारल्या जात होत्या. याची दखल घेऊन सेबीने त्याला मनाई केली होती. तरीही मोतेवारने या योजना सुरूच ठेवल्याने त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला. विशेष म्हणजे, या भामट्यांनी प्रामुख्याने पुणे-मुंबई यासारख्या शहरांना लक्ष्य केले असल्याचे लक्षात येते. आता ऑनलाईन व्यवहारामुळेदेखील फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.
बँका, सरकार तसेच प्रसार माध्यमांसह सोशल मीडियावरून जनजागृती केली जात असली तरी आपल्या बँकेचा, डेबिट कार्डचा तपशील कसलाही विचार न करता अनोळखी कॉलवर दिला जात आहे. शिवाय, ओटीपीही शेअर केला जात आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे, शिकले-सवरलेले आणि चांगल्या हुद्यावर काम करणारेही फशी पडत आहेत. विविध प्रलोभनांना सर्वसामान्य बळी पडतात, हे केवळ असे भामटेच जाणतात असे नाही तर, राजकारणीही जाणतात. त्यामुळे त्यांच्याकडून दिल्या जाणार्या आश्वासनांना बळी पडणार्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे.
आम्हीच तुमचे तारणहार आहोत, असा आव ते आणतात आणि त्यावर सर्वसामान्य डोळे झाकून विश्वास ठेवतात. निवडणुकीच्या आधी विविध घोषणांची खैरात केली जाते. यासाठी पैसा कसा उभा करणार याचे गणित मांडलेले नसते. विविध करआकारणीतून सरकारी तिजोरीत पैसा जमा होत असतो. म्हणजेच, एखाद्या मोफत योजनेसाठी लागणारा निधी उभा करण्यासाठी सर्वसामान्यांच्या खिशावरच डल्ला मारावा लागतो.
त्यामुळे नित्यनेमाने कर भरणारे नागरिकच या नवनव्या योजनांमध्ये भरडले जातात. राजकारण्यांचे मात्र व्यवस्थित सुरू असते. पुढच्याला ठेच मागचा शहाणा, अशी मराठीत म्हण आहे. मात्र, एकापाठोपाठ एक उघड होणार्या घटना पाहिल्या तर, शहाणे अद्याप कोणी झाले नसल्याचे जाणवते. टप्प्याटप्प्याने अशी प्रकरणं घडतच आहेत. यातील फसगत झालेल्या गुंतवणूकदारांच्या नशिबी केवळ पश्चाताप आणि कोर्टकचेर्या आल्या.
आपलेच पैसे परत मिळवण्यासाठी त्यांना पदरमोड करावी लागत आहे. या प्रलोभनांच्या नादात अनेकांची स्वप्ने उद्ध्वस्त झाली. शेरेगर प्रकरणाला तर तब्बल २८ वर्षे उलटल्यानंतरही सर्वसामान्य अजूनही प्रलोभनांना बळी पडत आहेत. डोळस असूनही ठेचाळणार्यांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे आणखी शेरेगर, उदय आचार्य, महेश मोतेवार आणि टोरेस कंपन्या येतच राहतील आणि त्यांच्या जाळ्यात लोक असे अडकत राहतील, हीच भीती आहे.