कृष्णराव गणेशपंत फुलंब्रीकर ऊर्फ मास्टर कृष्णराव हे एक प्रतिभावान गायक, नट व संगीतदिग्दर्शक होते. त्यांचा जन्म २० जानेवारी १८९८ रोजी श्री क्षेत्र आळंदी येथे झाला. त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी नाट्यकला प्रवर्तक मंडळीमध्ये प्रवेश केला. १९११ पासून त्यांना गायनाचार्य भास्करबुवा बखल्यांचे पट्टशिष्यत्व लाभले.
ख्याल, ठुमरी, नाट्यगीत, भजन इ. गानप्रकार ते सारख्याच रंगतीने पेश करीत. त्यांनी ‘गंधर्व नाटक मंडळी’ मध्ये १९२५ ते १९३३ या काळात गायकनट व संगीतदिग्दर्शक अशी बहुमोल कामगिरी बजावली. शारदा, सौभद्र, एकच प्याला, विद्याहरण, स्वयंवर, द्रौपदी, आशा-निराशा इ. नाटकांतील त्यांच्या पदांच्या चाली यांचा उदाहरणादाखल निर्देश करता येईल. व्ही. शांताराम यांच्या धर्मात्मा, अमरज्योती, वहाँ, गोपालकृष्ण, माणूस, शेजारी इ. मराठी-हिंदी चित्रपटांना सुमधुर संगीत दिले.
पुढे १९४२ मध्ये भक्तीचा मळा या चित्रपटात संगीतदिग्दर्शनाबरोबरच त्यांनी सावता माळ्याची प्रमुख भूमिकाही केली. तसेच आचार्य अत्र्यांचा वसंतसेना, विश्राम बेडेकरांचा लाखाराणी व नंतरच्या काळातील कीचकवध, विठू माझा लेकुरवाळा या चित्रपटांनाही त्यांनी सुश्राव्य संगीत दिले. वंदे मातरमला त्यांनी दिलेली चालही अत्यंत लोकप्रिय ठरली.
आकाशवाणीच्या सल्लागार समितीचे सदस्य व आकाशवाणीवरील प्रमुख संगीतरचनाकार या नात्याने त्यांनी भरीव कार्य केले. ‘भारत गायन समाज’, पुणे या संस्थेचे ते अध्यक्ष होते. त्यांना ‘संगीत कलानिधी’ ही पदवी, पद्मभूषण (१९७१),‘रत्न सदस्यत्व’ (फेलोशिप, १९७२), ‘बालगंधर्व’ व ‘विष्णुदास भावे’ ही सुवर्णपदके असे अनेक मानसन्मान लाभले. अशा या सर्जनशील संगीतकाराचे २० ऑक्टोबर १९७४ रोजी पुणे येथे निधन झाले.