अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे पार पडले. या संमेलनाचे उद्घाटक असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचे भाग्य आपल्याला लाभले याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी मराठी भाषा आणि महाराष्ट्राविषयी अतिशय चांगले विचार आपल्या भाषणातून मांडले. या संमेलनाच्या निमित्ताने काही गोष्टी पुढे आल्या. संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी आपल्या भाषणातून अतिशय चांगले विचार मांडले. खरंतर प्रत्येक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या भाषणातील विचार हे चांगलेच असतात.
काही संमेलनाध्यक्ष आपल्या भाषणाला कुठल्या तरी सत्ताधार्यावर ताशेरे ओढून त्याला वादाची फोडणी देतात. या फोडणीमुळे साहित्य संमेलनातील साहित्यिक चर्चेपेक्षा त्या वादग्रस्त विधानाची चर्चा जास्त होत राहते. त्यामुळे बरेचदा साहित्य संमेलनाचा जो मूळ हेतू असतो तो बाजूला राहतो. साहित्यिक आणि लोक त्या वादाभोवती घुटमळत राहतात. त्यामुळे साहित्य संमेलनाचे व्यासपीठ हे मराठी भाषा आणि तिला पोषक वातावरण कसे निर्माण होईल यासाठी आहे की तीन दिवसांत काही वादग्रस्त विधाने करून आपल्याभोवती सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आहे, असा प्रश्न पडतो. कारण साहित्य संमेलन झाल्यावर पुढील साहित्य संमेलनापर्यंत या संमेलनाचे अध्यक्ष वर्षभर काय करीत असतात याचे सामान्य माणसाला कुतूहल असते.
मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून सगळेच अध्यक्ष मराठी भाषेच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त करतात, पण आजघडीला विचार केला तर किती मराठी साहित्यिकांची मुले आणि नातवंडे मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये जातात याचे सर्वेक्षण करावे. तसे केल्यास मोठा अपेक्षाभंग होईल. काही सन्माननीय अपवाद सोडले तर ही मंडळी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये का घालतात, मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये का पाठवत नाहीत, याचे ही साहित्यिक मंडळी उत्तरे देऊ शकतील का? सध्या आपली मुली इंग्रजी माध्यमात शिकतात हा सगळ्यांसाठी एक प्रतिष्ठेचा मुद्दा बनलेला आहे. इंग्रजी माध्यमात शिकलेल्या बहुसंख्य मराठी मुलांसाठी मराठी भाषा ही आता बोलण्यापुरती मर्यादित राहिलेली आहे. त्यांना मराठी व्यवस्थित वाचता आणि लिहिता येत नाही.
मराठीतील साहित्यिक, कवी आणि त्यांचे साहित्य यांची माहिती असण्याचा तर प्रश्नच नाही. याचा अर्थ मराठी लोकांनी इंग्रजीचा बहिष्कार करावा असा नाही, पण ज्यासाठी साहित्य संमेलनाचे आयोजन केेले जाते, काही कोटी रुपये त्यावर खर्च केले जातात, त्याचा उद्देश सफल होत आहे की केवळ संमेलनाध्यक्षांच्या सुरुवातीच्या आणि समारोपाच्या भाषणाइतकेच त्याचे महत्त्व राहणार आहे. भाषा का दुर्लक्षित होते, तिचा प्रभाव का कमी होत जातो, हळूहळू लोक अन्य भाषेचा अवलंब का करतात, हा खरंतर समाजशास्त्रीय संशोधनाचा विषय आहे.
संस्कृत ही केवळ एका राज्यातील नव्हे तर भारतीय उपखंडातील ज्ञानभाषा होती. असे असताना तिचा प्रभाव का कमी होत गेला याचा विचार करावा लागेल. मराठी भाषा आज अनेक मराठी लोकांना नकोशी का वाटत आहे, अनेक लोक आर्थिक ऐपत नसताना उधारउसणवारी करून आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये का घालत आहेत, त्यांच्या शिकवण्यांवर का खर्च करीत आहेत, त्यांना इंग्रजी शिकल्यावर आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल होईल असा विश्वास का वाटतो, तो विश्वास देण्यात मराठी भाषा कुठे कमी पडत आहे, आपण इंग्रजी माध्यमात न शिकल्यामुळे पुढील आयुष्यात आपल्याला ज्या अचडणी आल्या त्या आपल्या मुलांना भेडसावू नयेत असे मराठी लोकांना का वाटते, त्यामुळे मराठी शिकताना ही कमरतता कशी भरून काढता येईल याचा विचार व्हायला हवा. आपल्या मराठी समाजातील बहुजन वर्ग हा अभिजनांचे अनुकरण करीत असतो.
अभिजन वर्गाने जेव्हा काळाची पावले ओळखून आपल्या मुलांना युरोप अमेरिकेमध्ये जाण्यासाठी आणि जागतिक नागरिक होण्यासाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये घालायला सुरुवात केली, तेव्हा बहुजन समाजाने त्यांचे अनुकरण करायला सुरुवात केली. आपल्याला अभिजनांच्या पंगतीला जाऊन बसायचे असेल, त्यांच्यासारखी प्रगती करायची असेल, त्यांच्या मुलांप्रमाणे आपल्या मुलांना युरोप-अमेरिकेत पाठवायचे असेल तर त्याला इंग्रजी माध्यमाशिवाय पर्याय नाही, असे त्याला वाटू लागले. त्यामुळे ते आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये घालू लागले. इंग्रजी माध्यमात शिकणे हे आज प्रगतपणाचे लक्षण मानले जात आहे. ही स्थिती फक्त शहरांमध्येच नाही, तर गावोगावी इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा सुरू झाल्या आहेत. मराठी शाळा पटसंख्येअभावी बंद पडत आहेत. ही अवस्था केवळ मराठी भाषेची आहे असे नाही, तर अन्य राज्यांमध्येही त्यांच्या राज्याच्या भाषेची थोड्याबहुत फरकाने अशीच परिस्थिती आहे. भाषेचे प्रेम कुणाला नसते, पण जेव्हा ती भाषा आपल्या भौतिक प्रगतीला पोषक ठरते तेव्हाच ते प्रेम टिकून राहते हे कटू वास्तव आहे. कारण भौतिक प्रगती झाली नाही तर संस्कृती टिकवणेही कठीण असते.