मुंबईसह राज्यभरात पुन्हा एकदा हेल्मेटसक्तीचा विषय जोर धरताना दिसत आहे. त्याला कारणीभूत ठरले आहे ते अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाने 25 नोव्हेंबर 2024 रोजी जारी केलेले एक परिपत्रक. या परिपत्रकानुसार राज्यातील विविध शहरे आणि जिल्ह्यांतील पोलीस आयुक्त, पोलीस सहआयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना विनाहेल्मेट वाहन चालवणार्या चालकांसोबतच विनाहेल्मेट सहप्रवाशावरही कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मागील 5 वर्षांमध्ये वाढलेले रस्ते अपघात आणि विनाहेल्मेट वाहनचालक, सहप्रवाशाविरोधात कडक कारवाई होत नसल्याकडे या परिपत्रकातून अंगुलिनिर्देश करण्यात आला आहे. एकूणच काय तर रस्ते अपघातांच्या वाढत्या संख्येचा हवाला देत महाराष्ट्र वाहतूक विभागाने पुन्हा एकदा राज्यभर हेल्मेटसक्तीचा विषय हाती घेतला आहे, तर दुसरीकडे वाहनचालक या विषयावर पुन्हा नाकं मुरडू लागले आहेत. वाहतूक पोलिसांच्या ‘वर’कमाईत भर पडावी इथपासून ते हेल्मेट कंपन्यांच्या विक्रीत वाढ व्हावी इथपर्यंतच्या चर्चा सोशल मीडियावर हॉट टॉपिक होऊ लागल्या आहेत.
आपल्याकडे हेल्मेटसक्तीचे फर्मान काढावे लागते हेच मुळात दुर्दैवी आहे. रस्ते अपघातांची कारणमीमांसा करताना असे आढळते की यांत्रिक दोषापेक्षा मानवी दोषाने होणार्या अपघातांचे प्रमाणच भारतात सर्वाधिक आहे. मद्यपान करून वाहन चालवणे, मोबाईलवर वा वाहनातील सहप्रवाशांसोबत बोलत रस्त्याकडे लक्ष न देता वाहन चालवणे, पुरेशी झोप न घेता रात्रीच्या वेळेत वाहन चालवणे, सिग्नल वा लेनची शिस्त न पाळणे, वेगाने वाहन चालवणे, सीट बेल्ट न लावणे या व इतर अनेक कारणांमुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून बहुतांश चारचाकींचे अपघात होतात. दुचाकीस्वारांना होणार्या अपघातांची कारणेही वेगळी नाहीत.
भारतात दरवर्षी सरासरी दीड लाखांहून अधिक जण रस्ते अपघातांमध्ये प्राण गमावतात. यात सर्वाधिक अपघात हे दुचाकी वाहनांचे असून डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्युमुखी पडणार्यांचे प्रमाण मोठे आहे. अशा वेळी हेल्मेट नावाचे महत्त्वपूर्ण सुरक्षा कवच घालण्याकडे भारतीय दुचाकीस्वार दुर्लक्ष का करतात, हा संशोधनाचा विषय असून त्यावर आधी काम होणे गरजेचे आहे. मनात आले की हेल्मेटसक्ती लागू करायची, मुख्य रस्त्यातील वाहतुकीला शिस्त लावण्याऐवजी कुठेतरी आडबाजूला लपून बसायचे आणि नियम मोडणार्या वाहनचालकांकडून दंडाच्या स्वरूपात पैसे उकळायचे, पोलिसांच्या या छळवादी वृत्तीलाही वाहनचालक वैतागलेत.
दोन वर्षांपूर्वी संजय पांडे मुंबई पोलीस आयुक्तपदी असताना मुंबईत अशीच हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने २५ मे 2022 रोजी एक परिपत्रक जारी करीत हेल्मेटसक्तीसाठी मुंबईकरांना १५ दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत संपताच पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली. कुठे कॅमेर्याच्या माध्यमातून, कुठे वाहनचालकांना अडवून पहिल्याच दिवशी हेल्मेट न घातलेल्या ३,४२१ सहप्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारला होता, तर चालक, सहप्रवासी मिळून एकाच दिवशी ६,२७१ जणांना ई-चलान जारी केले होते.
या कारवाईवरून संतापलेल्या मुंबईकरांनी टीकेचा भडिमार करताच कारवाई शिथिल करण्यात आली. 15 दिवसांची मुदत देऊनही अनेकांना सहप्रवाशाला हेल्मेटसक्तीची कल्पना नव्हती. त्यामुळे पोलिसांनी अडवल्यानंतर काही जण त्यांच्यासोबत वाद घालत होते. अनेक ठिकाणी साहेब, आजच्या दिवस सोडा. पुन्हा नियम मोडल्यास कारवाई करा, अशी विनंती करीत होते. याचाच अर्थ हेल्मेटसक्तीचा हा नियम तळागाळापर्यंत पोहचलेलाच नव्हता. असेच होणार असेल तर तुम्ही दंड आकारा किंवा वाहन परवाना रद्द करा, त्याने काहीच फरक पडणार नाही.
वाहनचालक पोलिसांसोबत हुज्जतच घालतील. काही पोलिसांच्या हाती चिरीमिरी देऊन निघतील. काही जण पोलीस दिसताच वेग वाढवून पसार होतील, तर काही जण लोकप्रतिनिधींकडे दाद मागून सक्तीचा विषयच मार्गी लावतील. त्यातल्या त्यात मुंबईकर तरी हेल्मेटचा नियम पाळतात. त्या तुलनेत पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद आदी जिल्ह्यांतील दुचारीस्वारांना तर हेल्मेट नावाचा प्रकारच माहीत नसतो. मध्यंतरी पुण्यात हेल्मेटसक्ती करण्यात आली होती, तेव्हा पुणेकरांनी विराट मोर्चा काढला होता. या मोर्चातील एकाने तर हेल्मेटऐवजी डोक्यात पातेले घातले होते.
शहरातल्या वाहतूक कोंडीमुळे 30 ते 40 किमी वेगाच्या पुढे दुचाकी चालवूच शकत नाही, तर हेल्मेट कशासाठी, असा प्रश्न विचारला जात होता. वाहतूक कोंडी सोडवा, रस्ते खड्डेमुक्त करा. कारण खड्ड्यांमुळे अनेकांचे बळी जातात. प्रवासानंतर हेल्मेट ठेवायचे कुठे? वाहनचालकांच्या या प्रश्नांची उत्तरेही सोडवायला हवीत. हेल्मेटसक्ती ही महामार्गावरच लागू होते. महापालिकेेच्या हद्दीत पोलीस हेल्मेटसक्ती करू शकत नाहीत, पोलिसांना असे ज्ञान देणारेही भेटतात. भारतासह महाराष्ट्रातही बाईक रायडिंग, टुरिंगचा ट्रेंड वाढलेला आहे.
हे दुचाकीस्वार टुरिंग करताना नेहमीच रायडिंग गियर अर्थात सुरक्षा जॅकेट, पँट, शूज, हँडग्लोव्हज आणि अर्थातच हेल्मेट घातलेले दिसतात. पाश्चात्य देशात बहुतांश वेळा दुचाकीस्वार हे रायडिंग गियरमध्येच दुचाकी चालवताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच ठाण्याच्या हद्दीत एका अपघातात 2 तरुणांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या डोक्यात हेल्मेट नव्हती. त्यामुळेच हेल्मेट वापरण्याकडे ‘सक्ती’ म्हणून न पाहता सुरक्षा म्हणून पाहा. हा दृष्टिकोन तयार होणे आवश्यक आहे. केवळ दंडात्मक कारवाई करून हेल्मेटसक्तीची मोहीम कधीच यशस्वी होणार नाही.