-प्रदीप जाधव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगण्याची ऊर्जा, प्रेरणा आणि श्वाससुद्धा आहेत. जगाच्या इतिहासात अनेक विचारवंत, क्रांतिकारक होऊन गेले, परंतु प्रतिकूल परिस्थितीवर मात करून इतिहासच बदलून नव्याने इतिहास लिहून आधुनिक भारताचा नकाशा जगासमोर आणणार्या प्रकांड पंडिताला अख्ख जग सॅल्यूट करते, असा एकमेव महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी कित्येक आयुष्यांचं काम एकाच आयुष्यात करून ते यशस्वी केलं.
त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक क्रांतीने दलित, उपेक्षित, वंचित, शेतकरी, भटके, कष्टकरी, आदिवासी वर्गाला सन्मान मिळाला. जगभरातील महापुरुष, विचारवंत, राष्ट्रीय नेत्यांपेक्षा बाबासाहेबांचा सन्मान अधिक होतो, ते विद्वान तर होतेच, परंतु मानवमुक्तीचा मार्ग दाखवणारे थोर क्रांतिकारक होते. आजच्या परिस्थितीत त्यांची तुलना कुणाबरोबरही करता येत नाही. भारताच्या विकासाचा कोणताही आधुनिक विचार बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून सुटलेला नाही. म्हणूनच ते राष्ट्रनिर्माते ठरतात.
आताच्या घडीला बाबासाहेबांच्या विचारांचा प्रवाह अधिक जोमाने वाढतो आहे. जगभरात सर्वाधिक पुतळे बाबासाहेबांचेच असून त्यांची जयंती संपूर्ण जगभर साजरी होते आणि महापरिनिर्वाणदिनाला चैत्यभूमीला विविध जाती, धर्म, पक्ष, संस्था, संघटना आणि अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात, हा एकमेव विश्वविक्रम आहे. बाबासाहेबांना त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे विविध उपाधींनी संबोधतात. विश्वरत्न, क्रांतीसूर्यापासून ते ज्ञानाचा महासागर, महासूर्य अशा उपमा देताना शब्दकोशही संपतो. त्यांनी समाजातील उपेक्षितांसाठी केलेला संघर्ष व कार्य अजोड स्वरुपाचे आहे.
त्यांचे विविध विषयांवर प्रभुत्व होते. समाजकारण, राजकारण, अर्थकारण, कृषी, कामगार, धर्म, संस्कृती, शिक्षण, उपेक्षितांचे संरक्षण, सार्वभौमत्व, कायदा, संविधान, विकास, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, संघठन, संघर्ष, भौतिक सुविधा या विषयांवरचा त्यांचा व्यासंग दांडगा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक पैलूंवर स्वतंत्र ग्रंथ, खंड होऊ शकतात. हे सगळे खंड आणि ग्रंथ सामान्य वाचकाला पूर्ण वाचता येतीलच असं नाही म्हणून बाबासाहेबांचं चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व आणि विचारांचे संकलन करून डॉ. मिलिंद रणवीर यांनी ‘बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे पुस्तक लिहिले आहे.
डॉ. मिलिंद रणवीर व्यवसायाने पाळीव प्राण्यांचे डॉक्टर. आंबेडकरी विचारधारेने झपाटलेले कार्यकर्ते, त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल त्यांना अनेक सन्मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. ‘बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या पुस्तकात बाबासाहेबांचे विविध पैलू, शैक्षणिक, मानद पदव्या, देशातील व जगातील लोकांनी त्यांच्यात असलेल्या गुणांबद्दल, देशसेवेबद्दल त्यांनी व्यक्त केलेले विचार, त्यांनी केलेली आंदोलने, ब्रिटिशांच्या भूमीत त्यांच्याच खर्चाने जाऊन संपूर्ण स्वातंत्र्यांची मागणी करणे, सामाजिक स्तरावरती मजूर व शेतकर्यांसाठी केलेल्या सुधारणा, सार्वभौमिक राष्ट्रनिर्मिती, देशाला एकत्रित बांधून ठेवणारे संविधान, देशाला महासत्ताक व विकसित राष्ट्र बनविण्यासाठी त्यांनी केलेल्या भौतिक सुधारणा आणि त्यांचे जीवन, विचार, कार्य, बौद्धधम्माची स्वीकृती, त्याचबरोबर कामगार कल्याण, सामाजिक चळवळीचे पुरस्कर्ते, स्त्री-पुरुष समान मजुरीचे पुरस्कर्ते, ग्रंथप्रेमी, पत्रकार, परखड व बुद्धिवादी, धर्म आणि धम्म यांचे चिकित्सक, परिवर्तनाची चळवळ स्थापन करणारे, तसेच द प्रॉब्लेम ऑफ रुपी ग्रंथावर आधारित रिझर्व्ह बँकेची स्थापना, बुद्ध धम्म हाच जीवनमार्ग मानणारे बाबासाहेब अशा १४९ मुद्यांचे लेखकाने अभ्यासपूर्ण संकलन केले असून त्यासंबंधातील संक्षिप्त परंतु महत्त्वाची माहिती या पुस्तकात समाविष्ट केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या मूलभूत हक्कांसाठी चवदार तळे सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, काळाराम मंदिर, अंबाबाई मंदिर सत्याग्रह असे लढे दिले. वंचित समाजाच्या जीवनात मोठे परिवर्तन करून सामाजिक क्रांतीचा आविष्कार घडविला. म्हणून त्यांना जगातील समतेचे महान क्रांतिकारक, तत्त्वज्ञ म्हणून ओळखले जाते. बाबासाहेबांनी जगातील सर्वात मोठे लोकशाहीवादी संविधान लिहून भारत हे सार्वभौमवादी राष्ट्र निर्माण केले.
व्हॉईसरॉयच्या मंत्रिमंडळात पाच खात्यांच्या मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळून भारतात मूलभूत सुविधा निर्माण करून दिल्या. मजुरांसाठी किमान निर्धारित वेतन, स्त्रियांसाठी हिंदू कोड बिल, शेतकर्यांच्या हितासाठी सावकारी पद्धत नष्ट करणे, बेरोजगारांसाठी सेवायोजन या सर्व संकल्पनातून भारताला सर्वश्रेष्ठ बनविण्याचे महान कार्य बाबासाहेबांनी केले आहे. त्याचबरोबर जलनियोजन, विद्युत, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, खनिज निर्मिती या विभागांचा कार्यभार सांभाळला. भारताला शेती व औद्योगिकीकरणासाठी पायाभूत संरचना निर्माण करून दिली.
या कार्यपद्धतीला आजही तोड नाही. याचाही थोडक्यात परिचय या पुस्तकात आहे. लोकशाहीचे कट्टर पुरस्कर्ते आचार्य प्र.के.अत्रे यांनी डॉ. आंबेडकरांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त ‘नवयुग’चा खास विशेषांक काढायचे ठरविले. त्यानिमित्ताने खास मुलाखत घेण्यात येणार होती. तेव्हा बाबासाहेब म्हणतात, मी लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता आहे. मला विभूतीपूजा कशी आवडेल? विभूतीपूजा हा लोकशाहीचा विपर्यास आहे. पुढारी लायक असेल तर त्याच्याबद्दल प्रेम बाळगावे, आदर राखावा, पण पुढार्यांची देवाप्रमाणे पूजा कसली करता? त्यामुळे पुढार्यांबरोबर भक्तांचाही अध:पात होतो.
आताच्या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांचे विचार महत्त्वाचे असून सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढार्यांना ही चपराकच आहे. बाबासाहेब तत्त्वाला जागणारे, नीतीमत्ता पालन करणारे आणि शील जपणारे होते. बाबासाहेब म्हणतात, मी माझ्या जीवनात जाणीवपूर्वक कधीही शीलाचा भंग केला नाही. मी अमेरिकेत लंडनमध्ये असतानासुद्धा सिगारेट किंवा दारूला स्पर्श केला नाही. ५ जून १९५२ ला कोलंबिया विद्यापीठाने बाबासाहेबांना भारतीय संविधान निर्मितीबद्दल एल.एल.डी.ची पदवी प्रदान केली. त्यांना व्हाईट हाऊसवर जेवणासाठी आमंत्रित केले होते.
त्या ठिकाणी प्रचलित पद्धतीप्रमाणे दारू, सिगारेट ओढणे अगत्याचे असते. शील भ्रष्ट होऊ नये म्हणून बाबासाहेब व्हाईट हाऊसला गेले नाहीत. बाबासाहेब एवढे दक्ष होते की, एके ठिकाणी भाषणात म्हणतात की, काँग्रेस नेते व इतर राजकीय पुढारी माझ्याकडे असलेल्या शीलाला आणि तत्त्वांना घाबरतात. बाबासाहेबांच्या अनुयायांना मात्र याचा विसर पडला आहे, यांचं आश्चर्य वाटतं. सत्ता संपत्तीसाठी तत्वाला मूठमाती देऊन शीलभ्रष्ट, नीतीभ्रष्ट लोकांची संख्या वाढताना दिसत आहे, मग प्रश्न पडतो की आपण कोणता बुद्ध आणि बाबासाहेब स्वीकारले?
दिवसातील १८ ते २१ तास अभ्यास आणि काम करणारे बाबासाहेब स्वयंप्रज्ञ होते. त्यांच्या विद्वत्तेपुढे सर्वच नतमस्तक होतात. बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्या प्रत्येक कृतीवर प्रचंड विश्वास होता. त्यांचा कोणताही मुद्दा सहजासहजी कुणालाही खोडता येत नव्हता. लंडनमध्ये पदवीसाठी केलेल्या संघर्षावरून ते सिद्ध होतं. लंडन विश्वविद्यालयात ‘रुपयाचा प्रश्न’ (The problem of rupee) हा शोधप्रबंध लिहून सादर केला आणि पुढील शिक्षणासाठी ते बॉन (जर्मनी) येथे गेले.
लंडन विश्वविद्यालयातील सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ प्रोफेसर कॅननने बाबासाहेबांना लंडनला बोलावून प्रबंधातील काही आक्षेपार्ह भाग वगळण्यास सांगितले, परंतु बाबासाहेबांनी दृढविश्वासाने विचारले, तुम्हाला कोणता भाग अशास्त्रीय वाटतो तो मी काढून टाकीन, परंतु तुम्ही म्हणाल की, हा सर्व प्रबंध तुमच्या विचारांसारखा असावा तर त्यासाठी मी अजिबात तयार होणार नाही. मग तुम्ही मला डॉक्टरेट नाही दिली तरी चालेल. बाबासाहेबांचे बोलणे ऐकून समिती चकीत झाली. प्रो. हॅननने मध्यस्थी करून थोडासा बदल करून प्रबंध स्वीकृत केला व डॉक्टर ऑफ सायन्सची (D.Sc) ही पदवी त्यांना बहाल केली. बाबासाहेबांच्या विद्वत्तेपुढे अनेकदा विरोधक चकीत व्हायचे.
१७ डिसेंबर १९४६ रोजी जवाहरलाल नेहरूंनी मांडलेल्या उद्देश व प्रस्तावावर बाबासाहेबांचे पहिले भाषण झाले. त्यांचे कायद्याबद्दलचे ज्ञान आणि विश्लेषण करण्याची तर्कसंगत पद्धती, देशाबद्दलचे प्रेम, संविधानाबद्दलचे प्रगाढ ज्ञान यामुळे संविधान सभा भारावून गेली. भाषण सुरू असताना विरोधक असलेल्या काँग्रेस सदस्यांनी बाके वाजवून साथ दिली व त्यांची स्तुती करून अभिनंदन केले. यावरून विरोधक असले तरी आजच्यासारख्या केवळ टीका टिप्पणी करण्यात त्यावेळचे विरोधक वेळेचा अपव्य करत नव्हते हे सिद्ध होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंसदर्भातील माहिती याआधी आपल्या वाचनात आली असेल, परंतु या पुस्तकात ती संकलित स्वरूपात एकत्रित वाचायला मिळते, हे या पुस्तकाचे वैशिष्ठ्य असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा शोध घेऊ पाहणार्या अभ्यासकांसाठीही हे पुस्तक दस्ताऐवज ठरेल. सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर यांची प्रस्तावना आणि प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांच्या अभिप्रायाने पुस्तकाची उंची अधिकच वाढली आहे.
=लेखक-डॉ. मिलिंद रणवीर
=प्रकाशन -सुमेरू पब्लिशर्स
=पृष्ठे ११५, मूल्य – १५० रुपये