काँग्रेस हा असा पक्ष आहे की ज्यांची महाराष्ट्रात बहुतांश काळ सत्ता राहिली, पण हा पक्ष मुंबई आणि परिसरात मराठी माणसांवर अन्याय होतो त्यावेळी कधी पुढे आला किंवा मराठी माणसांसाठी आंदोलन केले असे कधी झाले नाही. नुकताच कल्याणमध्ये एका मराठी माणसावर एका अमराठी माणसाने बाहेरून गुंड आणून जीवघेणा हल्ला केला. सगळ्या मराठी माणसांना अवमानकारक शिव्या दिल्या. ही घटना घडली त्यावेळी विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होते. त्यामुळे त्याचे पडसाद तिथे उमटले.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आमदारांनी मराठी माणसावर जो हल्ला आणि शिवीगाळ झाली तो विषय आक्रमकपणे लावून धरला. त्यावेळी काँग्रेस आणि त्यांचे दुसरे सहकारी शरद पवार गटाच्या आमदारांनी विरोधी बाकांवर असल्यामुळे त्यांच्या सुरात सूर मिसळला. शरद पवार हेदेखील मूळचे काँग्रेसचेच. मुंबईत जेव्हा मराठी माणसाच्या हक्काचा आणि अस्मितेचा प्रश्न येतो त्यावेळी शिवसेना आणि मनसे सोडले तर अन्य पक्ष शांत राहतात.
काँग्रेस हा मोठा पक्ष असूनही तो मराठी माणसांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवत नाही. महाराष्ट्रावर दीर्घकाळ राज्य करूनही मराठी माणसाबाबत काँग्रेसचे नेते गप्प बसतात. त्यांना मान हलवायलादेखील त्यांच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींची अनुमती लागते. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना मराठी माणसाविषयी फार आस्था असल्याचा इतिहास नाही. इतकेच काय तर त्यांचे राज्यातील नेतेही वेळोवेळी कातडीबचावू धोरण अवलंबतात. खरंतर मराठी माणसांविषयीच्या काँग्रेसच्या या उदासीनतेमुळेच मुंबईत शिवसेनेचा जन्म झाला.
काँग्रेस पक्षाचा इतिहास पाहिला तर असे दिसेल की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांना सगळे काही आयते मिळाले आहे. कारण भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काँग्रेस ही एक चळवळ होती. पुढे जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा सर्वांना समान राजकीय संधी मिळावी यासाठी काँग्रेसचे आता विसर्जन करण्यात यावे, कारण आता काँग्रेसचा हेतू पूर्ण झालेला आहे, असे महात्मा गांधी यांनी सुचवले होते, पण काँग्रेसच्या नेत्यांना या काँग्रेसच्या माध्यमातून राजकीय फायदा मिळवायचा होता म्हणून त्यांनी काँग्रेस विसर्जित केली नाही.
त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीचा वारसा असलेल्या आणि स्वातंत्र्यापूर्वी गावोगावी पोहचलेल्या काँग्रेसचा त्यांच्या नेत्यांना राजकीय फायदा उठवता आला. स्वातंत्र्यप्राप्तीचा वारसा सांगून निवडणुकीच्या राजकारणात विजय मिळवता आला. त्यांच्यासमोर बराच काळ दुसरे पक्ष टिकूच शकले नाहीत. देशात दीर्घकाळ त्यांची सत्ता चालली. देशाला स्वातंत्र्य मिळल्यानंतर भाषावर प्रांत रचनेसाठी राज्य पातळीवरून आंदोलने उभी राहिली.
संयुक्त महाराष्ट्रासाठी जेव्हा आंदोलन सुरू झालेे तेव्हा काँग्रेस त्यापासून लांब राहिली. काँग्रेस सोडून सगळे प्रमुख पक्ष ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’च्या छत्राखाली एक होऊन लढत होते. काँग्रेस सत्तेत होती. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाला त्यांची साथ नव्हती. संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेते मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी करीत होते, तेव्हा राज्यातील काँग्रेसचे एक नेते स. का. पाटील यांनी असे जोशात म्हटले होते की, जोपर्यंत आकाशात सूर्य-चंद्र आहेत, तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही.
यावर उत्तर देताना संयुक्त महाराष्ट्र समितीतील प्रमुख नेते आचार्य अत्रे म्हणाले होते की, मुंबई आम्ही मिळवणारच. सूर्य-चंद्र हे काय सदोबाच्या बापाचे नोकर आहेत का? आचार्य अत्रे यांनी त्यावेळी या आंदोलनाला विरोध करणारे काँग्रेसचे नेते यशवंतराव चव्हाण यांच्यावरही परखड टीका केली होती. संयुक्त महाराष्ट्रासाठी काही वर्षे आंदोलन चालले. त्यावेळी मुख्यमंत्री काँग्रेसचे मोरारजी देसाई होते. आंदोलनकर्त्यांवर गोळीबार करण्याचे आदेश त्यांच्याच सरकारने पोलिसांना दिले होते. त्यात १०६ आंदोलक शहीद झाले होते.
संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेते आणि कार्यकर्ते तसेच महाराष्ट्रातील सामान्य माणूस यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आंदोलन चालवले. त्यामुळे १ मे १९६० साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. केंद्रातील काँग्रेस सरकारला तशी मंजुरी द्यावी लागली. ज्या काँग्रेसने आणि राज्यातील त्यांच्या नेत्यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाला विरोध केला, त्याच काँग्रेसचे नेते संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले.
म्हणजे ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या आंदोलनाचा विरोध केला, त्या पक्षाला नव्या राज्यावर राज्य करण्याचा मान मिळाला. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत, आम्ही व्यापक विचार करतो, असा टेंभा महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते मिरवत होते, पण या देशाची आर्थिक राजधानी मुंबईत मराठी माणसांच्या न्याय हक्कांची गळचेपी होत होती त्याकडे काँग्रेस ढुंकूनही पाहत नव्हती. त्यामुळेच शिवसेनेची निर्मिती झाली आणि पुढील काळात मुंबईतील सामान्य मराठी माणसांच्या नोकर्यांसाठी आणि अस्मितेसाठी आंदोलने झाली.
नागपूर येथे नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात शिवसेनेच्या ठाकरे गटाने मराठी माणसावर झालेल्या हल्ल्याविरोधात आवाज उठवल्यानंतर भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही माजोरड्यांचा माज उतरवू, महाराष्ट्र आणि मुंबई ही मराठी माणसाचीच आहे, असे म्हटले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कितीही मोठ्या बापाचा असला तरी त्याच्यावर कारवाई होईल, असे ठणकावून सांगितले. अर्थात याला मुंबईतील आगामी महानगरपालिका निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. कारण मराठी माणसांची बाजू घेणे ही या दोघांचीही परंपरा नाही.