नवे वर्ष उजाडल्यावर हे वर्ष सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो, अशा शुभेच्छा अनेकांनी एकमेकांना दिल्या. तशा शुभेच्छा दरवर्षी देण्याची प्रथाच आहे. हे झाले माणसांविषयी, पण प्राणीसुद्धा आपल्या सृष्टीचक्राचे भाग आहेत. त्याच पार्श्वभूमीवर या वर्षाची सुरुवात वाघांसाठी मात्र काही चांगली झालेली नाही. कारण 2025 हे नवे वर्ष सुरू झाल्यानंतर अवघ्या 22 दिवसात 11 वाघांचा मृत्यू झाला. त्यामुळे व्याघ्रप्रेमींना धक्का बसला असून असे होत असेल तर वन खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी करतात काय, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.
वाघांचे अल्पावधीत इतक्या मोठ्या संख्येने झालेल्या मृत्यूबद्दल विविध कारणे सांगण्यात येत आहेत. काहींना शिकार्यांनी मारले, काहींना विष घालून मारले, तर काही वाघ आपल्या सीमारक्षणाच्या लढाईत किंवा मादी मिळवण्याच्या संघर्षात आपापसात लढून मेले. जंगलातल्या वाघांची अशी चिंताजनक स्थिती असताना राज्यातील महायुतीच्या सरकारमधील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आम्ही ऑपरेशन टायगर सुरू केलेले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटातील 20 पैकी 18 आमदार शिंदेंच्या शिवसेनेत आलेले असतील.
खरंतर उदय सामंत हेसुद्धा आता शिवसेनेत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील शिवसैनिकांना वाघ म्हटले जात असे. शिवसेनेचे प्रतीक चिन्ह वाघ आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील वाघांची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर फुटली. पुढे आमदार, खासदारांच्या संख्याबळावर कायदेशीररित्या शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आली. अर्थात या सगळ्या मागे महाशक्ती भाजप होती.
उदय सामंत एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले. त्यामुळे तेसुद्धा वाघच आहेत. त्यामुळे आता ते जर पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या आमदारांची म्हणजे वाघांची शिकार करून त्यांना आपल्या सोबत घेऊ इच्छित असतील तर खरंतर ही वाघांमधील आपापसातील लढाई आहे, असे म्हणावे लागेल. तसे पाहिले तर शिवसेना या मूळ पक्षातून छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे असे अनेक नेते आपापल्या समर्थकांना घेऊन बाहेर पडले. त्यामुळे मूळ शिवसेना कमकुवत झाली.
एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने जे बंड केले, त्यामुळे तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार असलेल्या उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गमवावे लागले. मागील वर्षात जेव्हा लोकसभा निवडणूक झाली, तेव्हा शिवसेनेत फूट पडली असली तरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला चांगले यश मिळाले होते.
त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला होता, पण पुढे जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना सुपरडुपर यश मिळाले. त्यावेळी महाविकास आघाडी भुईसपाट झाली. त्यातच असलेल्या उबाठा गटाचाही मोठा अपेक्षाभंग झाला, पण आता जसे नवे वर्ष सुरू झाले आहे तसे सगळ्याच राजकीय पक्षांना दीर्घकाळ रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. या निवडणुकांच्या तारखा नव्या वर्षात लवकरच जाहीर होतील असे सगळ्याच पक्षांना वाटत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या गटाचा नुकताच जो मेळावा झाला त्यावेळी काही आमदार गैरहजर होते. त्यामुळे उदय सामंत यांनी जी ऑपरेशन टायगरची घोषणा केली त्यामुळेच ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांना धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत नवा उदय होणार आहे. तो उदय शिंदे आणि अजित पवार यांचे आमदार आपल्यासोबत घेईल आणि तिसरा उपमुख्यमंत्री उदयाला येईल, असा इशारा दिला आहे.
उदय सामंत हे वाघांच्या शिकारीच्या मोहिमेचा इशारा देत असले तरी वाघांचा मूळ शिकारी हा भाजप आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही. कारण 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळण्यासाठी अडून बसले होते. त्यामुळे शपथविधीपासून ते खातेवाटपापर्यंतचा विषय रखडलेला होता.
एकनाथ शिंदे यांनी आपली नाराजी दाखवली तरी त्याचा काही उपयोग झालेला नाही. त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले. कारण एकनाथ शिंदे यांनी भाजपची अडवणूक केली तरी ती पोकळी भरून काढण्यासाठी अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहे. भाजपने राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी या महाराष्ट्रातील दोन पक्षांमधील अनेक वाघांची शिकार केली आहे.
त्यासाठी त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचे शिकारी रात्रंदिवस महाराष्ट्रात कामाला लावले होते. त्या माध्यमातून भाजपने अनेक वाघांना आपल्याकडे घेऊन राज्यात आपली सत्ता आणली. आता पुन्हा सत्ता आणून मुख्यमंत्रीपद आपल्याकडे घेतले. भाजपचे चाणक्य आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची शतप्रतिशत सत्ता असायला हवी, असे बजावले आहे. त्यामुळे त्यांना अधिकाधिक वाघांची शिकार करावीच लागणार आहे.