महापुरुषांना मोजण्याचा वेडेपणा!

महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय वातावरण पार बिघडून गेले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये, कारण त्याची प्रचिती सर्वांनाच सातत्याने येत आहे. सत्ता मिळविण्यासाठी नेते मंडळींनी एकमेकांवर इतक्या खालच्या पातळीवर जाऊन ताशेरे, टीका आणि अर्वाच्च भाषेचा वापर केला आहे की, या मंडळींना कोण आणि कसे आवरणार, असा प्रश्न लोकांना पडलेला आहे.

संपादकीय

महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय वातावरण पार बिघडून गेले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये, कारण त्याची प्रचिती सर्वांनाच सातत्याने येत आहे. सत्ता मिळविण्यासाठी नेते मंडळींनी एकमेकांवर इतक्या खालच्या पातळीवर जाऊन ताशेरे, टीका आणि अर्वाच्च भाषेचा वापर केला आहे की, या मंडळींना कोण आणि कसे आवरणार, असा प्रश्न लोकांना पडलेला आहे. त्यात पुन्हा इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमातून या मंडळींना सतत प्रसिद्धी मिळत असल्यामुळे या मंडळींना एकापेक्षा एक शेलकी विधाने करण्याला अधिक जोर चढत आहे. राजकीय नेत्यांनी एकमेकांवर आरोप करताना आता सीमा पार केल्या आहेत. आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी त्यांनी महापुरुषांना आणि देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणार्‍या नेत्यांनाही वादात ओढले आहे. त्यासाठी त्यांनी आक्षेपार्ह विधाने करण्याचा सपाटाच लावला आहे. त्यातून मग तुम्ही बोललात म्हणून मीही तुम्हाला उत्तर देणार या भावनेतून स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेच्या धरतीवर भारत जोडो यात्रा सुरू केलेली आहे. त्याची सुरुवात त्यांनी कन्याकुमारीपासून केली, त्यांना ही यात्रा काश्मीरपर्यंत घेऊन जायची आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडोची व्याख्या स्पष्ट करताना सांगितले की, केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशभरात भीती, जातीय, धार्मिक दुरावा निर्माण केला आहे.

अनेकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मोदी सरकारने लोकांची मने तोडली आहेत, त्यामुळे ती मने जोडण्याचे काम आपण त्या यात्रेतून करणार आहोत. म्हणूनच आपण या यात्रेला ‘भारत जोडो’ असे नाव दिलेले आहे. २०१४ च्या अगोदर गुजरातचे विकास पुरुष म्हणून नरेंद्र मोदी यांचा डंका वाजत होता. त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत मोदींना भाजपकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आल्यावर मोदींनी लोकसभेसाठी प्रचार सुरू केला. त्यावेळी काँग्रेसमुक्त भारत म्हणजेच भ्रष्टाचारमुक्त भारत असा नारा त्यांनी दिला. मोदींच्या पारड्यात आपले मत टाकले तर ते गुजरातसारखाच देशाचाही विकास करून दाखवतील, अशी आशा लोकांना वाटत असल्यामुळे मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला पहिल्यांदा केंद्रात बहुमत मिळाले. मोदींच्या नेतृत्वाखाली २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केंद्रात बहुमत मिळाले, पण या दोन टर्ममध्ये महागाई रोखण्यात मोदींना यश आलेले नाही, बेरोजगारीही वाढत आहे.

जनतेच्या हिताशी संबंधित असलेले हे मुद्दे राहुल गांधी आपल्या भारत जोडो यात्रेच्या काळात मांडत होते, लोकांचाही त्यांना मोठा प्रतिसाद मिळत होता. त्यांच्या यात्रेने महाराष्ट्रात प्रवेश केला. तेव्हाही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत होता, पण महाराष्ट्रातून ही यात्रा पुढे जाण्यासाठी चार दिवस बाकी असताना राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात काही आसभास नसताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानावरच आक्षेप घेतला, त्यानंतर महाराष्ट्रात त्याविरोधात आवाज उठला. त्यावेळी असे वाटत होते की, आपल्या या भूमिकेमुळे आतापर्यंत व्यवस्थित चाललेल्या भारत जोडो यात्रेला गालबोट लागेल, म्हणून राहुल गांधी याबाबत नमते घेतील, पण तसे न होता, उलट राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन सावरकरांनी अंदमानातील कारागृहातून आपली सुटका होण्यासाठी ब्रिटिशांकडे माफी पत्र लिहिले होते, ती प्रत आपल्याकडे असल्याचा दावा करत ती सर्वांसमोर फडकवून दाखवली, पण हे असे करताना राहुल गांधी यांना हे कळायला हवे होते की, आपण मोदी सरकारने निर्माण केलेली द्वेष भावना दूर करण्यासाठी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे, असे एका बाजूला सांगत आहोत, तर दुसर्‍या बाजूला आपण स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान केलेल्या नेतृत्वाचा अवमान करून नव्याने द्वेषभावना निर्माण करत आहोत. खरे तर राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन सावरकरांचा अवमान केल्यामुळे इथल्या काँग्रेस नेत्यांचीही मोठी पंचाईत झाली आहे. कारण महाराष्ट्रातील लोकांच्या मनात सावरकरांविषयी अत्यंत आदराची भावना आहे. आपण आपलेच नुकसान करून घेत आहोत, हे खरे तर राहुल गांधी यांच्या सल्लागारांनी लक्षात आणून द्यायला हवे होते.

राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील आक्षेपार्ह विधानानंतर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी राहुल गांधी यांची विधाने खोडून काढताना थेट देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचे चारित्र्यहनन होईल, असे विधान केले. लेडी माऊंट बॅटन या बाईसाठी जवाहरलाल नेहरु यांनी भारताची फाळणी केली, असे विधान रणजीत सावरकर यांनी केले. त्यामुळे एकच गहजब उडाला. स्वांतत्र्यवीर सावरकर आणि जवाहरलाल नेहरू हे दोघेही देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील मोठे नेते होते. देशाला स्वातंत्र्य मिळविण्याचे त्यांचे मार्ग वेगळे असले तरी दोघांचे देशासाठी मोठे योगदान आहे. दोघेही उच्चविद्याविभूषित होते. दोघांनीही अनेक मौलिक पुस्तके लिहिलेली आहेत. अशा या दोन्ही नेत्यांच्या योगदानावर आक्षेप घेऊन तसेच त्यांची मानहानी करून आपण काय साध्य करत आहोत, याचा संबंधितांनी विचार करायला हवा. सावरकरांचे देशासाठी इतके मोठे योगदान आहे की, राहुल गांधी यांनी त्यांच्यावर आरोप करून किंवा कमी लेखून त्यांचा त्यांना काहीही राजकीय फायदा होणार नाही, त्यांचे झाले तर नुकसानच होईल.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे बोलताना काही वेळा इतके वाहत जातात की, त्याचे त्यांना भान राहत नाही. जनतेने आवाज उठवला की, मग ते गयावया करतात, पण आपण ज्या राज्यामध्ये आहोत, तिथल्या लोकांच्या मनात ज्यांच्याविषयी आत्यंतिक आदर आहे, अशा महापुरुषांबाबत आपण बोलत असताना भान राखायला हवे, हेही त्यांच्या लक्षात राहत नाही. त्यांनी मागे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातून त्यांचा जोरदार निषेध करण्यात आला होता. आता पुन्हा त्यांनी वाहवत जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना कमीपणा आणणारे विधान केले. त्यामुळे राज्यभरातून त्यांचा निषेध होत आहे. त्यात कहर म्हणजे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाच माफीची पत्रे लिहिली, असे विधान केले. त्यावरून आता संताप उसळला आहे. महापुरुषांचा अवमान करण्याच्या या स्पर्धेचा राजकीय फायदा उठवण्यासाठी वापर केला जात आहे हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही, पण एक लक्षात घ्यावे लागेल की, महापुरुष आणि देशासाठी योगदान केलेले नेते हे मोठेच असतात, त्यांना आपल्या छोट्या फूटपट्ट्यांनी मोजण्याचा वेडेपणा करण्यात काही अर्थ नसतो.