घरसंपादकीयअग्रलेखगर्दीचं ठीक, पण दर्दींचं काय?

गर्दीचं ठीक, पण दर्दींचं काय?

Subscribe

गेल्या महिन्याभरापासून दसरा मेळाव्यावरुन सुरू असलेल्या महाभारताचा अखेर समारोप झाला. या युद्धात कोण जिंकले आणि कोण हरले हे आत्ताच सांगणे अवघड असले तरी युद्धातील प्रतिस्पर्धी हे एकमेकांसाठी तुल्यबळ आहेत, हे पुन्हा अधोरेखित झाले. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटांनी दसरा मेळावा हा प्रतिष्ठेचा मुद्दा केला होता. ज्या मेळाव्याला गर्दी कमी त्यांच्या बाजूने जनमत कमी असाच समज करुन घेत जणू दोन्ही गटांकडून गर्दी खेचण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी विविध क्लुप्त्या करण्यात आल्यात.

ठाकरे गटातील बहुतांश आमदार शिंदे गटाकडे गेल्याने या आमदारांचे समर्थक मेळाव्याला येणार नाहीत, त्यामुळे गर्दी होणार नाही, याची चिंता ठाकरे गटाला होती. तर शिंदे गटात केवळ आमदारच आहेत. कार्यकर्त्यांची फौज मात्र नाही. त्यामुळे बीकेसी मैदान भरेल इतकी गर्दी जमवण्याचे अवघड आव्हान शिंदे गटासमोर होते. प्रारंभी शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी या दोन्ही गटांनी कंबर कसली होती. परंतु या लढाईत उच्च न्यायालयाचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने गेला आणि पहिली लढाई जिंकल्याच्या आवेषात जल्लोष करण्यात आला. या जल्लोषानेच शिंदे गटाला आव्हान दिले आणि इरेला पेटल्यागत शिंदे गटाने बीकेसी मैदानावर दसरा मेळाव्याची तयारी सुरू केली.

- Advertisement -

यात दोन्ही गटांनी आपापल्या पदाधिकार्‍यांना, आमदारांना आणि अन्य लोकप्रतिनिधींना गर्दीचे टार्गेट दिले होते. त्यानुसार प्रत्येकाने एसटी बसपासून रेल्वेच्या तिकीट बुकिंगपर्यंतची व्यवस्था केली होती. शिवाय खासगी वाहनांची नोंदणीही मोठ्या प्रमाणात झाली होती. एसटी महामंडळाला एकाच दिवसात रेकॉर्डब्रेक पैसे कमवण्याची मोठी संधी मिळाली, त्याचे त्यांनी सोनेही करुन घेतले. शिंदे गटात कार्यकर्त्यांचे जाळे अद्याप फारसे पसरलेले नसल्याने त्यांना गर्दी करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्यांचा वापर करावा लागला. या गटाने मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी बाळासाहेबांचा आवाज वापरला. त्यानंतर दसरा मेळाव्याचा टीझरदेखील रिलीज केले. त्यात शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरेंचा फोटा आणि त्यांचाच आवाज वापरला. ‘एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ’ असे म्हणत या टीझरच्या माध्यमातून शिवसैनिकांना दसरा मेळाव्यासाठी आमंत्रित केले. तसेच ‘आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार’ आणि ‘बाळासाहेब तुमचा वाघ, म्हणून हिंदुत्वाला जाग’ अशा प्रकारचे दोन पोस्टर शिंदे गटाकडून मुंबईत लावण्यात आलेत. तर ठाकरे गटातूनही बाळासाहेबांच्या आठवणींचा उजाळा देणार्‍या चित्रफिती व्हायरल करण्यात आल्यात. अशा वातावरण निर्मितीने खरे तर लोकांच्या दोन्ही गटांकडून अपेक्षाही वाढल्या होत्या. परंतु दोन्ही मेळाव्यांत शिळ्या कढीलाच उत देण्यात आला. त्यात नवे असे काहीच नव्हते. त्यामुळे मेळाव्यापूर्वी केलेली वातावरण निर्मिती दोन्ही गटांसाठी फुसका बार ठरली.
खरे तर, दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी ठाकरे परिवाराला यापूर्वी इतके प्रयत्न कधीही करावे लागले नव्हते. मराठी माणसांना एकत्र आणण्याच्या मोहिमेत यश मिळवल्यानंतर शिवसेनेचा पहिला मेळावा ३० ऑक्टोबर, १९६६ ला शिवतीर्थ मैदानावर झाला होता. या मेळाव्यापासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवतीर्थावरील मराठी माणसांची प्रचंड गर्दी यांच्यात नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली होती. तेव्हापासून शिवतीर्थावरील गर्दी आणि बाळासाहेब ठाकरे असे जुळलेले गणित बाळासाहेब हयात असेपर्यंत कधीच फिसकटले नाही. अर्थात बाळासाहेबांचे परखड पण मार्मिक भाषणाचे दिवाणे संपूर्ण राज्यभर होते. त्यामुळे त्यांच्या सभेला गर्दी कशी करावी असा प्रश्न कधीही संयोजकांना पडायचा नाही. किंबहुना, संभाव्य गर्दीवर नियंत्रण कसे ठेवायचे असा प्रश्न पक्षातील पदाधिकार्‍यांसह पोलीस प्रशासनाला असायचा. त्यादृष्टीनेच तयारी व्हायची. परंतु बाळासाहेबांइतके मार्मिक आणि परखड वकृत्व उद्धव ठाकरे यांचे नाही. बरेचदा उद्धव ठाकरे भाषण करीत असताना इतिहासाच्या गोष्टींमध्ये रमतात. शिवाय त्यांच्या वकृत्वातून विरोधकांना जोरदार टोले बसणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ते टोमणेबाज भाषण होते. यंदाचे भाषणही तसेच होते. हे भाषण इतके स्क्रिप्टेड असते की त्यात सहजता कुठेही दिसत नाही. उसणे अवसान आणून परखड बोलण्याचा आव आणल्याचा स्पष्ट भास या भाषणातून होतो. त्यामुळे असले भाषण ऐकायला कार्यकर्ते गर्दी का करतील? असाही प्रश्न आहे. त्यामुळेच उद्धव यांना दसरा मेळाव्यासाठी गर्दी खेचून आणावी लागत आहे. त्यातच सत्तासंघर्षातील हाराकीरीत आपले आणि त्यासोबत शिवसेनेचे अस्तित्व दाखवण्यासाठी दसरा मेळाव्याचे शक्तीप्रदर्शन करणे ठाकरेंनाही अपरिहार्य होते. या मेळाव्याला नेहमीइतकीच गर्दी होती. परंतु शिंदेंच्या गर्दीसमोर ठाकरेंचा मेळावा काहीसा झाकोळला गेला. आता गर्दीचे आकडे बाहेर येत आहेत. शिवाजी पार्कची क्षमता ही ८० हजारांची आहे, तर बीकेसी मैदानाची क्षमता १ लाख इतकी आहे. शिंदे गटाकडून मैदानावर ३ लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती, असे सांगितले जाते. शिंदे गटाच्या मेळाव्याला २ लाखांची गर्दी तर उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला १ लाख लोक होते असा पोलिसांचा अंदाज आहे. हे झाले गर्दीचे आकडे पण दर्दींचे काय? या मेळाव्यांना स्वयंस्फूर्तीने आलेले दर्दी शिवसैनिक किती होते या प्रश्नाचे खरे उत्तर दोन्ही गटांचे प्रमुख देऊ शकणार नाहीत. विविध प्रलोभने देऊन आणलेल्या भाडोत्री गर्दीसमोर दोन्ही गटाचे नेते कोणता विचार मांडणार होते? हे दोन्ही विचारींचे मेळावे होते की अविचारींचे? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाहीत. मेळाव्यांचे एकूण स्वरुप बघितले तर ते दोन्ही उत्तम इव्हेंट होते, पण त्यातून साध्य फारसे काही झाले नाही. भाडोत्री गर्दीसमोर कितीही बुद्धी पाजळली तरी त्याचा उपयोग काय होणार? मुळात अशा प्रकारे भाडोत्री गर्दी करुन मेळावे करणे हाच आत्मघात समजावा. गर्दी हे जनमताचे प्रतीक मानले जाते. परंतु भाडोत्री गर्दीने जनमत तपासता येत नाही. त्यातून आत्मघात होण्याचीच अधिक शक्यता असते. त्यामुळे ही गर्दी म्हणजेच जनमत असा समज जर कुणी करुन घेत असेल तर तो आत्मघात मानावा. मेळाव्यांना गर्दी होण्यासाठी जो खर्च केला तो पैसा कोठून आणला याची चौकशी आता ईडी करेल काय, असाही प्रश्न सर्वसामान्य माणूस विचारु लागला आहे. अर्थात कुठल्याच सरकारच्या काळात सर्वसामान्यांना ‘व्हाईस’ नसतो. त्यामुळे त्याला पडणार्‍या प्रश्नांनाही किंमत दिली जात नाही. परंतु पैशांच्या मस्तीत जनतेला गृहीत धरणार्‍यांना आणि जनमताकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करणार्‍यांना निवडणुकीत जनताच धडा शिकवते हा आजवरचा अनुभव विसरता येणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -