सध्या उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे महाकुंभ भरला आहे. तिथे देशविदेशातील कोट्यवधी भाविक दाखल होऊन गंगेत डुबकी घेत आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अतिमहत्त्वाच्या व्यक्तीदेखील आहेत. पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी गंगेत डुबकी घेतली. एवढ्या मोठ्या संख्येने सुरू असलेल्या या सोहळ्याला गेल्या आठवड्यात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे गालबोट लागले. श्रद्धाळूंच्या बेशिस्तपणाचा तो परिणाम होता.
त्यात अधिकृतपणे 30 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात हा आकडा खूप मोठा आहे हे निश्चित. मौनी अमावास्येला दुसरे अमृत स्नान केले जाते. तो योग साधण्यासाठी कोट्यवधी भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आणि ही दुर्दैवी घटना घडली. प्रयागराजमधील घटना म्हणजे अपुरे नियोजन आणि भाविकांची अलोट गर्दी यात श्रद्धा चिरडली गेली, असेच म्हणावे लागेल. एकीकडे अशी स्थिती असताना साधारणपणे ज्यांना प्रसिद्धीचे वलय आहे, त्यातील बहुतांश जण या श्रद्धेचा अतिरेक करीत असल्याचे दिसते.
त्यात प्रामुख्याने हिंदी सिनेसृष्टी आणि राजकीय नेतेमंडळी यांच्यावर हा पगडा अधिक दिसतो. सिनेसृष्टीत चित्रपटाच्या नावापासून शूटिंगच्या मुहूर्तापर्यंत सर्वच बाबतीत श्रद्धा आणि अंधश्रद्धेची सांगड पाहायला मिळते. विशिष्ट अक्षराने सुरू केलेल्या कलाकृतीला चांगली लोकप्रियता मिळते, असा गैरसमज याच क्षेत्रात आहे.
राजकीय मंडळी तर तिकीटवाटप, जागावाटपातील संख्या, शपथविधी या सर्व गोष्टींसाठी मुहूर्ताचाच आधार घेऊन नशीब आजमावतात, पण आता पुरोगामी म्हणवल्या जाणार्या महाराष्ट्रात अंधश्रेद्धेने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. निमित्त आहे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेला ‘वर्षा’ बंगला. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन बरोबर दोन महिने झाले तरी देवेंद्र फडणवीस अद्याप वर्षा बंगल्यावर राहायला गेलेले नाहीत.
यावरून फडणवीस या बंगल्यात राहायला जाण्यास का घाबरत आहेत, असा प्रश्न करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी टिप्पणी केली आहे. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्याच्या आवारात कामाख्या देवीसाठी कापलेल्या रेड्याची मंतरलेली शिंगे पुरली आहेत. मुख्यमंत्रीपदी फडणवीस फार काळ टिकू नयेत म्हणून त्यांनी असे केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
विशेष म्हणजे पत्रकारितेची पार्श्वभूमी असलेल्या खासदार संजय राऊत यांनी अकारणच हा मुद्दा उपस्थित केला आहे, पण तरीही काही नेत्यांकडून याला हवा दिली जात आहे. जादूटोणाविरोधी कायदा राबवणारे पहिले राज्य म्हणून गौरविलेल्या महाराष्ट्रात अशा प्रकारचा मुद्दा उपस्थित होणे आणि त्याची चर्चा होणेच हास्यास्पद आहे. या राजकारण्यांवरील अंधश्रद्धेची पकड मजूबत असली तरी अशा प्रकारे शिंगे पुरण्यापर्यंत ते जाणार नाहीत हेही मान्य करावे लागेल, पण मधे-मधे अशी चर्चेची पुडी सोडावीच लागते की काय? असा प्रश्न पडतो. त्यातही वर्षा हाच बंगला मध्यवर्ती असतो.
23 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी झालेल्या बहुचर्चित शपथविधीपूर्वी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी सपत्नीक होम-हवन केले होते. राजकीय घडामोडी टोकाला पोहचलेल्या असताना शपथविधीच्या आदल्या रात्री एक ते दीडच्या सुमारास फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी हवन आणि अनुष्ठान केले.
मध्य प्रदेशातील माळव्याच्या एका मंदिरातील तंत्रविद्या पंडितांनी हे हवन केले आणि आहुतीही दिली होती. सत्तास्थापनेचे मिशन यशस्वी होण्यासाठी हे अनुष्ठान करण्यात आले होते, असे सांगण्यात आले, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मदतीने सत्तास्थापनेची देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी झाली नाही.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन शिवसेनेने काँग्रेस आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता मिळवली. मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले. त्यानंतर वर्षा बंगल्याच्या भिंतींवर आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आल्याची चर्चा रंगली होती. त्याचा कथित व्हिडीओही व्हायरल झाला होता. अर्थातच तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा इन्कार केला, पण या कथित ‘भित्तलिखिता’च्या पार्श्वभूमीवर नव्या मुख्यमंत्र्यांसमोर उभ्या राहणार्या कथित अडचणी दूर करण्यासाठी याच वर्षा बंगल्यावर मोठी पूजा करण्यात आली.
त्यासाठी काही पंडितही बोलावण्यात आले होते. या पूजेबाबत कुठेही वाच्यता न करण्याची ताकीद देण्यात आली होती, मात्र तरीही त्याची चर्चा रंगलीच. शिवाय उद्धव ठाकरे आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात सातत्याने आजारी होते ते वेगळेच. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची तड लावणे, संकटकाळात त्यांना आधार देणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे या भूमिकांमध्ये हे राजकारणी जात नाहीतच.
केवळ अशा गोष्टी घडवून किंवा चर्चा घडवून आपण किती कुचकामी आहोत हेच हे पुढारी दाखवतात किंवा जे हळव्या मनाचे आहेत, जे कशावरही विश्वास ठेवतात, त्यांच्या मनातील अंधश्रद्धेला खतपाणी घालतात. आता जनतेनेच सुजाण होऊन या निरर्थक चर्चेकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करावे, हेच उत्तम!