परमेश्वर भक्ताचे मन, भाव पाहतो

santvani

गोंदवलेकर महाराज म्हणतात की, तुम्ही सर्वजण छान सेवा करत आहात याबद्दल शंका नाही. अशीच सेवा अखंड चालू ठेवा, त्यातच कल्याण आहे. त्यानेच आपण तरून जाऊ. जरी कुणी काहीही सांगितले, ‘यात काय आहे, त्यात काय आहे, याने काय होणार आहे,’ असे म्हटले, तरी तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. परमेश्वराची सेवा वाढवावी तेवढी थोडीच आहे. तो फार मोठा आहे, अमर्याद आहे, त्याला पहायला तशीच सेवाही फार मोठी करायला पाहिजे. त्याला पाहण्यासाठी तशी मोठी शक्तीही आपल्याला लागेल. अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्म्याने दिव्य दृष्टी देऊन दर्शन घडविले. ती दिव्य दृष्टी आपल्याजवळ नाही, पण ती मिळविण्याची शक्ती आपल्याजवळ आहे. भक्तीची प्रगती ही खरी शक्ती आणि त्याकरिता अखंड नामस्मरण हेच खरे साधन.

श्रीरामप्रभू आपल्या घरातला कुणीतरी आहे याबद्दल खात्री बाळगा. त्याला तुम्ही आपली सुख-दुःखे सांगा. दिवसाकाठी एकदा तरी रामापुढे उभे राहून त्याला अनन्यभावाने शरण जा; दिवस आनंदात जाईल आणि तुमचे दुःख दूर होईल. आपले ज्ञान, शक्ती, वैभव, सत्ता, त्याच्यापुढे काहीच नाहीत. तेव्हा या सर्वांचा विसर पाडून, त्याला शरण जा आणि त्याच्याजवळ प्रेम मागा. ‘देवा ! आम्ही जे तुझे दर्शन घेतो ते सर्व बाह्य स्वरूपाचे; तुझे आम्हाला खरे दर्शन घडव. आम्ही अवगुणसंपन्न असू, तुझे दर्शन व्हावे एवढी सेवा आमच्याजवळ नाही, परंतु तू आता आम्हाला क्षमा कर. यापुढे देवा, कितीही संकटे येवोत, आमच्या प्रारब्धाचे भोग आम्ही तुझ्या नामात आनंदाने भोगू. जे काही व्हायचे असेल ते होऊ दे, आमचे समाधान टिकून तुझ्या नामात आमचे प्रेम राहील एवढी तुझी कृपा असू दे.’

खरोखर, परमेश्वर भक्ताचे मन पाहतो, त्याचा भाव पाहतो; एरव्ही तो त्याच्याजवळच असतो. जो श्रद्धेने परमेश्वराचे चिंतन करतो त्याला, परमेश्वर जवळ असून आपल्याला तो मदत करायला सिद्ध आहे याची खात्रीच असते. आपल्याला दोन मार्ग आहेत; एक श्रद्धेचा, आणि दुसरा अनुभवाचा. एका गावी पायवाटेने गेले तर फक्त तीन मैलांचे अंतर आणि मोटारच्या रस्त्याने गेले तर दहाबारा मैलांचे अंतर. श्रद्धा ही त्या पायवाटेसारखी आहे. तिने चालले तर अंतर कमी पडेल. मोटारीचा मार्ग म्हणजे अनुभवाचा मार्ग. मोटार कुठे रस्त्यात बिघडली किंवा वाटेत कुठे अडथळा आला, की प्रगती थांबते; त्याप्रमाणे अनुभवात काही चुकले की प्रगती खुंटते. तेव्हा शक्यतो आपण श्रद्धेचा मार्ग पत्करावा. सद्गुरूच्या शब्दावर विश्वास ठेवून श्रद्धेने आणि प्रेमाने नाम घ्यावे.