घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

हें अनावर न विचारितां / वायांचि धिंवसा उपनला चित्ता / येर्‍हवी भानुतेजीं काय खदयोत / शोभा आथी //
हे गीतार्थाचे काम फार कठीण आहे. याचा विचार मनात न करता तो स्पष्ट करण्याविषयी माझ्या चित्तात व्यर्थ धैर्य उत्पन्न झाले आहे. बाकी सूर्याच्या तेजापुढे काजव्याचे तेज काय पडणार?
कीं टिटभू चांचुवरी / माप सूये सागरीं / मी नेणतु त्यापरी प्रवर्ते येथ //
(आपली पिल्ले समुद्रात पडली असता त्यांना काढण्याकरिता) ज्या प्रमाणे समुद्र कोरडा करण्यासाठी टिटवीने आपल्या चोचीने पाणी उपसण्याचा प्रयत्न केला, त्याप्रमाणे मी अज्ञानी गीतेचा अर्थ करण्याकरिता प्रवृत्त झालो आहे.
आइका आकाश गिंवसावे / तरी आणीक त्याहूनि थोर होआवें / म्हणौनि अपाडू हें आघवें / निर्धारितां //
असे पाहा, आकाशाचे आकलन करावयाचे म्हटले म्हणजे ज्याप्रमाणे त्याहून मोठे झाले पाहिजे, त्याप्रमाणे वास्तविक पाहता माझे हे कृत्य अवघड आहे.
या गीतार्थाची थोरी / स्वयें शंभू विवरी / जेथ भवानी प्रश्नु करी / चमत्कारोनि //
या गीतार्थाची थोरवी एवढी आहे की, स्वत: शंकर त्याची चर्चा करीत असता भवानीला चमत्कार वाटून तिने शंकराला प्रश्न केला असता.
तेथ हरू म्हणे नेणिजे / देवी जैसें कां स्वरूप तुझें / तैसे हें नित्य नूतन देखिजे / गीतातत्व //
शंकर म्हणाले, ‘हे मायादेवी तुझ्या स्वरूपाचा जसा अंत लागत नाही, त्याप्रमाणे या गीतातत्वापासून नित्य नवा आनंद प्राप्त होत असल्यामुळे त्याचाही पार लागत नाही.
हा वेदार्थसागरू / जया निद्रिताचा घोरू / तो स्वयें सर्वेस्वरू / प्रत्यक्ष अनुवादला //
ज्या सर्वेश्वराच्या केवळ (योगनिद्रेतील) घोरण्यापासून वेद उत्पन्न झाले, त्या जगदीश्वराने हे गीताशास्त्र जागृतावस्थेमध्ये स्वतः (अर्जुनाला) सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -