वाणी ज्ञानेश्वरांची

तरी न्यून तें पुरतें | अधिक तें सरतें | करूनि घेयावें हें तुमतें | विनवितु असें //
तरी कमी असेल तर पूर्ण करा व अधिक असेल तर काढून टाका एवढी माझी आपणांस विनंती आहे.
आतां देईजो अवधान | तुम्हीं बोलविल्या मी बोलेन | जैसें चेष्टे सूत्राधीन | दारुयंत्र //
महाराज, आता आपण इकडे लक्ष द्यावे; कारण, जर आपण मला बोलण्याची शक्ती दिली, तर मी बोलेन. ज्याप्रमाणे लाकडाची कळसूत्री बाहुली दोर्‍याचे आधाराने नाचते,
तैसा मी अनुग्रहीतु | साधूंचा निरूपितु | ते आपुलियापरी अलंकारितु | भलतयापरी //
त्याप्रमाणे मी तुमच्या कृपेतला असून आज्ञाधारक आहे; तर, हे साधो, तुम्ही मला आपल्या इच्छेप्रमाणे वाटेल तसा नटवा.
तंव श्रीगुरू म्हणती राहीं | हें तुज बोलावें नलगे कांहीं | आतां ग्रंथा चित्त देईं | झडकरी वेगा //
तेव्हा श्रीगुरू म्हणतात: ‘हे तू आम्हाला सांगावेस असे नाही, आता या गोष्टी बाजूस ठेवून गीतार्थ सांगण्याकडे लक्ष दे.’
या बोला निवृत्तिदासु | पावूनि परम उल्हासु | म्हणे परियसा मना अवकाशु | देऊनियां //
हे श्रीगुरूंचे भाषण ऐकून निवृत्तीदास ज्ञानदेव मनात अतिसंतुष्ट होऊन म्हणतात की, मी बोलतो ते स्वस्थ मनाने ऐका.
तरी पुत्रस्नेहें मोहितु | धृतराष्ट्र असे पुसतु | म्हणे संजया सांगें मातु | कुरुक्षेत्रींची //
पुत्राच्या प्रेमाने मोहित झालेला धृतराष्ट्र राजा संजयास म्हणाला,‘संजया, कुरुक्षेत्राची काय हकीगत आहे ती मला सांग.
जें धर्मालय म्हणिजे | तेथ पांडव आणि माझे | गेले असती व्याजें | जुंझाचेनि //
ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे ठिकाण असे म्हणतात, तेथे माझे व पंडूचे पुत्र युद्ध करण्याच्या निमित्ताने गेले आहेत.