घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तरी तेचि येतुलां अवसरीं | काय किजत असे येरयेरीं | तें झडकरी कथन करी | मजप्रती
तर ते परस्परांत एवढा वेळपर्यंत काय करीत आहेत तें मला लवकर सांग.
तिये वेळीं तो संजय बोले | म्हणे पांडवसैन्य उचललें | जैसें महाप्रळयीं पसरलें | कृतांतमुख //
तेव्हा संजय म्हणाला :- ज्याप्रमाणे महाप्रलयाचे वेळी काळाचे तोंड पसरलेले असते, त्याप्रमाणे, पांडवांचे सैन्य खवळले.
तैसें तें घनदाट | उठावलें एकवाट | जैसें उसळलें काळकूट | धरी कवण //
अशा प्रकारे सर्व पांडवसैन्य एकदम तयार झाले, तेव्हा त्याला कोण आवरणार? ज्याप्रमाणे काळकूट विष उसळले असता त्याचे शमन कोण करणार?
नातरी वडवानळु सादुकला | प्रळयवातें पोखला | सागरु शोषूनि उधवला | अंबरासी //
किंवा वडवानल पेटून तो प्रलयवाताने भडकल्यावर ज्याप्रमाणे समुद्रातील पाण्याचे शोषण करून आकाशापर्यंत प्रदीप्त होतो,
तैसें दळ दुर्धर | नानाव्यूहीं परिकर | अवगमलें भयासुर | तियें काळीं //
त्याप्रमाणे पांडवांचे भयंकर सैन्य नानाप्रकारच्या व्यूहरचनेने तयार केलेले असल्यामुळे त्या वेळेस अति भेसूर असे दिसले.
तें देखोनियां दुर्योधनें | अव्हेरिलें कवणें मानें | जैसें न गणिजे पंचाननें | गजघटांतें //
(परंतु) ज्याप्रमाणे हत्तींचे कळप पाहून सिंह त्यांना क:पदार्थ मानतो, त्याप्रमाणे दुर्योधनाने पांडवांचे ते सैन्य पाहून त्यास य:कश्चित मानले.
मग द्रोणापासीं आला | तयातें म्हणे हा देखिला | कैसा दळभारु उचलला | पांडवांचा //
मग द्रोणाचार्याजवळ येऊन त्यांस म्हणाला, पांडवांचे हे सैन्य कसे उसळले आहे पाहिले ना?
गिरिदुर्ग जैसे चालते | तैसे विविध व्यूह सभंवते | रचिले आथि बुद्धिमंते | द्रुपदकुमरें //
बुद्धिमान असा जो द्रुपदपुत्र धृष्टद्युम्न, त्याने त्या सैन्याची अशी चमत्कारिक रचना केली आहे की, ते चालत्या डोंगरी किल्ल्याप्रमाणेच दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -