वाणी ज्ञानेश्वरांची

उद्देशें एक दोनी | जायिजती बोलोनी | तुम्ही आदिकरूनी | मुख्य जे जे //
आपण व इतर वीर जे आहेत, त्यांपैकी काही मुख्यवीरांची नांवे दिग्दर्शनार्थ सांगतो, ऐका.
हा भीष्म गंगानंदनु | जो प्रतापतेजस्वी भानु | रिपुगजपंचाननु | कर्णवीरु //
शौर्याने व बलाने केवळ प्रतिसूर्यच असे हे गंगानंदन भीष्माचार्य, शत्रुरूपी हत्तीला केवळ सिंहासारखा भासणारा असा हा पराक्रमी कर्ण;
या एकेकाचेनि मनोव्यापारें | हें विश्व होय संहरे | हा कृपाचार्यु न पुरे | एकलाचि //
यातील एकेकाच्या केवळ संकल्पाने या विश्वाचा संहार होईल. फार काय पण एकटे कृपाचार्यदेखील पुरे आहेत.
एथ विकर्ण वीरु आहे | हा अश्वत्थामा पैल पाहें | याचा आडदरु सदा वाहे | कृतांतु मनीं //
हा या ठिकाणी विकर्ण वीर आहे, तसाच तो पलीकडे अश्वत्थामा पाहा; प्रत्यक्ष काळालादेखील त्याची भीती वाटते!
समितिंजयो सौमदत्ति | ऐसे आणीकही बहुत आहाती | जयांचिया बळा मिती | धाताही नेणें //
युद्धामध्ये सदैव विजयी असणारा हा सौमदत्ति (भूरिश्रवा); त्याचप्रमाणे ज्यांच्या शौर्याचा अंत प्रत्यक्ष
ब्रह्मदेवालाही लागत नाही, असे आणखी कितीतरी वीर आहेत,
जे शस्त्रविद्यापारंगत | मंत्रावतार मूर्त | हो कां जे अस्त्रजात | एथूनि रूढ //
की जे शस्त्रविद्येत निपुण असून अस्त्रविद्येत तर साक्षात अवतार आहेत. फार कशाला, यांच्यापासून अस्त्रविद्या जगात प्रसिद्धीस आली!
हे अप्रतिमल्ल जगीं | पुरता प्रतापु अंगी | परी सर्व प्राणें मजचिलागीं | आरायिले असती //
हे जरी अति शक्तिशाली आहेत व जगात जरी यांच्या तोडीचे दुसरे योद्धे नाहीत, तरी ते जीवाभावाने मलाच अनुसरले आहेत.