वाणी ज्ञानेश्वरांची

ना तरी प्रळयवन्ही महावातु | या दोघां जैसा सांघातु | तैसा हा गंगासुतु | सेनापति //
किंवा प्रलयकालच्या अग्नीला महावाताचे साहाय्य मिळून त्या उभयतांचा जसा संयोग व्हावा, तसे या आमच्या अफाट सैन्यास भीष्म हे सेनापती मिळाले आहेत.
आतां येणेंसि कवण भिडे | हें पांडवसैन्य कीर थोकडें | परि वरचिलेनि पांडे | दिसत असे //
तेव्हा या आमच्या सैन्याबरोबर कोण युद्ध करील? पांडवांचे सैन्य वर सांगितलेल्या आमच्या सैन्याच्या तुलनेने अगदी थोडे दिसत आहे.
वरी भीमसेनु बेथु | तो जाहला असे सेनानाथु | ऐसें बोलोनियां मातु | सांडिली तेणें //
शिवाय त्यांचे सेनापत्य दांडग्या भीमसेनाने स्वीकारले आहे. इतके सांगून दुर्योधन स्तब्ध राहिला.
मग पुनरपि काय बोले | सकळ सैनिकांतें म्हणितलें | आतां दळभार आपुलाले | सरसे करा //
मग फिरून सर्व सेनापतींना म्हणाला:- अहो, आता आपापले सैन्य सज्ज करा.
जया जिया अक्षौहिणी | तेणें तिया आयणी | वरगण कवणकवणी महारथीया //
ज्यांच्या ताब्यात सैन्याच्या ज्या अक्षौहिणी आहेत, त्यांतील श्रेष्ठ महारथ्यांनी आपापल्या अक्षौहिणीपुढे जाऊन उभे राहावे.
तेणें तिया आवरिजे | भीष्मातळीं राहिजे | द्रोणातें म्हणे पाहिजे | तुम्ही सकळ //
व त्यांनी त्या त्या अक्षौहिणी संभाळून भीष्मांच्या आज्ञेत वागावे. नंतर तो द्रोणाचार्यांस म्हणाला,‘तुम्ही सर्व सैन्यावर देखरेख ठेवावी
हाचि एकु रक्षावा | मी तैसा हा देखावा | येणें दळभारु आघवा | साचु आमुचा //
आणि भीष्मांना माझ्याप्रमाणेच समजून त्यांचे रक्षण करावे; कारण, आमच्या सर्व सैन्याची भिस्त त्यांच्यावरच आहे.’
या राजयाचिया बोला | सेनापति संतोषला | मग तेणें केला | सिंहनादु //
राजा दुर्योधनाचे हे भाषण ऐकून भीष्मांना फार आनंद झाला आणि त्यांनीं सिंहनाद केला.