वाणी ज्ञानेश्वरांची

तो गाजत असे अद्भुतु | दोन्ही सैन्यांआंतु | प्रतिध्वनी न समातु | उपजत असे //
तो नाद दोन्ही सैन्यांत इतका दुमदुमून गेला की, त्याचा प्रतिध्वनी आकाशातदेखील मावेना.
तयाचि तुलगासवें | वीरवृत्तीचेनि थावें | दिव्य शंख भीष्मदेवें | आस्फुरिला //
तो प्रतिध्वनी होत आहे, तोच वीरवृत्तीच्या बळाने भीष्मांनी आपला दिव्य शंख वाजविला.
ते दोन्ही नाद मीनले | तेथ त्रैलोक्य बधिरीभूत जाहलें | जैसें आकाश कां पडिलें | तुटोनियां //
ते दोन्ही नाद एकत्र झाले असता त्रैलोक्य बधिर झाले, त्या वेळी आकाशच कोसळून पडत आहे की काय असा भास झाला!
घडघडीत अंबर | उचंबळत सागर | क्षोभलें चराचर | कांपत असे //
त्या वेळी आकाश गडगडू लागले, समुद्र उसळू लागला, हे सारे विश्व घाबरून जाऊन थरथर कापू लागले;
तेणें महाघोषगजरें | दुमदुमिताती गिरिकंदरें | तंव दळामाजीं रणतुरें | आस्फुरिलीं //
आणि त्या महानादाच्या घोषाने पर्वतांच्या गुहांमधूनदेखील प्रतिध्वनी उठले; इतक्यात दोन्ही सैन्यांमध्ये रणवाद्ये वाजू लागली.
उदंड सैंघ वाजतें | भयानकें खाखातें | महाप्रळयो जेथें | धाकडांसी //
त्या नानाप्रकारच्या रणवाद्यांचा ध्वनी इतका कर्कश आणि भयंकर होता की, मोठ्या धैर्यवानांनादेखील तो महाप्रलय वाटला!
भेरी निशाण मांदळ । शंख काहळ भोंगळ । आणि भयासुर रणकोल्हाळ । सुभटांचे ॥
नौबती, डंके, ढोल, शंख, मोठ-मोठ्या झांजा, कर्णे इत्यादी रणवाद्यांचा गजर सुरू झाला; आणि त्यात वीरांच्या भयानक रनगर्जना मिसळून गेल्या.
आवेशें भुजा त्राहाटिती । विसणेले हांका देती । जेथ महामद भद्रजाती । आवरती ना ॥
कोणी युद्धातील विरश्रीच्या आवेशाने दंड ठोकू लागले आणि अतिशय त्वेषाने युद्धासाठी एकमेकांना हाका मारू लागले. त्यामुळे हत्तीदेखील बेफाम झाले आणि त्यांना आवरणे अशक्य झाले.