घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तेथ भेडांची कवण मातु | कांचया केर फिटतु | जेणें दचकला कृतांतु | आंग नेघे //
त्या ठिकाणी भित्र्यांची काय कथा? जे कचरले ते तर कस्पटाप्रमाणे उडूनच गेले; यमाससुद्धा दहशत बसून तो इकडे तोंडदेखील करीनासा झाला!
एकां उभयांचि प्राण गेले | चांगांचे दांत बैसले | बिरुदाचे दादुले | हिंवताती //
कित्येकांचे उभ्या उभ्याच जीव गेले; जे धैर्यवान होते, त्यांची दातखिळी बसली आणि जे नामांकित योद्धे होते, त्यांच्या अंगास कांपरे सुटले!
ऐसा अद्भुत तुरबंबाळु | ऐकोनि ब्रह्मा व्याकुळु | देव म्हणती प्रळयकाळु | वोढवला आजी //
अशा प्रकारचा तो भयंकर वाद्यध्वनी ऐकून ब्रह्मदेवदेखील व्याकुळ झाला आणि इंद्रादी देव तर,‘आज हा प्रलयकालच ओढवला की काय’ असे म्हणू लागले.
ऐसी स्वर्गीं मातु | देखोनि तो आकांतु | तंव पांडवदळाआंतु | वर्तलें कायी //
याप्रमाणे स्वर्गलोकांत दाणादाण उडून गेली असता, इकडे पांडवसैन्यांत काय झाले पाहा.
हो कां निजसार विजयाचें | कीं तें भांडार महातेजाचें | जेथ गरुडाचिये जावळियेचे | कांतले चार्‍ही //
जो रथ विजयाचे प्रत्यक्ष माहेरघर असून तेजांचे केवळ भांडारच व ज्यास गरुडाप्रमाणे वेगवान असे चार घोडे जुंपलेले असून,
कीं पाखांचा मेरु जैसा | रहंवरु मिरवतसे तैसा | तेजें कोंदाटलिया दिशा | जयाचेनि //
पंख असलेल्या मेरुपर्वताप्रमाणे तो श्रेष्ठ रथ तेथे शोभला. त्याच्या तेजाने दाही दिशा भरून गेल्या;
जेथ अश्ववाहकु आपण | वैकुंठींचा राणा जाण | तया रथाचे गुण | काय वर्णूं //
ज्या रथावर प्रत्यक्ष वैकुंठाधिपती श्रीकृष्ण सारथी होते, त्या रथाचे गुण वर्णन किती करावे?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -