घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

ध्वजस्तंभावरी वानरु | तो मूर्तिमंत शंकरु | सारथी शार्ङ्गधरु | अर्जुनेसीं //
साक्षात शंकराचा अवतार जो मारुती, तो त्याच्या ध्वजस्तंभावर असून शार्ङ्गधनुष्य धारण करणारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी होते.
देखा नवल तया प्रभूचें | अद्भुत प्रेम भक्ताचें | जें सारथ्यपण पार्थाचें | करितु असे //
पाहा त्या प्रभूचे केवढे आश्चर्य आहे ! त्याचे भक्तांवर विलक्षण प्रेम असल्यामुळे तो पार्थाचे सारथ्य करू लागला.
पाइकु पाठीसीं घातला | आपण पुढां राहिला | तेणें पांचजन्यु आस्फुरिला | अवलीळाचि //
त्याने आपल्या सेवकाला पाठीशी घातले, स्वतः पुढे उभा राहिला आणि आपला पांचजन्य नावाचा शंख सहज वाजविला.
परी तो महाघोषु थोरु | गर्जतु असे गंहिरु | जैसा उदैला लोपी दिनकरु | नक्षत्रांतें //
त्याचा फार मोठा आवाज झाला, त्यामुळे सूर्याचा उदय झाला असता ज्याप्रमाणे नक्षत्रे लोपतात, त्याप्रमाणे त्या शंखाच्या महानादात,
तैसें तुरबंबाळु भंवते | कौरवदळीं गाजत होते | ते हारपोनि नेणों केउते | गेले तेथ //
कौरवांच्या सैन्यांमध्ये होत असलेले अनेक वाद्यगजर कोठे लोपून गेले ते कळेना.
तैसाचि देखे येरें | निनादें अति गजरें | देवदत्त धनुर्धरें | आस्फुरिला //
त्याचप्रमाणे अर्जुनानेही आपला देवदत्त नावाचा गंभीर नादाचा शंख आवेशाने वाजविला.
ते दोनी शब्द अचाट | मिनले एकवट | तेथ ब्रह्मकटाह शतकूट | हों पाहत असे //
त्या वेळी त्या दोन्ही शंखांचा अद्भुत ध्वनी एकत्र झाल्यामुळे ब्रह्मांडाचे शतशः तुकडे होतात की काय असे वाटू लागले !
तंव भीमसेनु विसणैला | जैसा महाकाळु खवळला | तेणें पौंड्र आस्फुरिला | महाशंखु //
इतक्यात भीमसेनालाही आवेश आला आणि महाकाळाप्रमाणे खवळून त्याने आपला पौंड्र नावाचा महाशंख वाजविला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -