वाणी ज्ञानेश्वरांची

सृष्टी गेली रे गेली | देवां मोकळवादी जाहली | ऐशी एक टाळी पिटिली | सत्यलोकीं //
सत्यलोकी,‘सृष्टी बुडाली रे बुडाली, आतां देव निराधार झाले’ अशी एकच हाकाटी झाली;
दिहाचि दिन थोकला | जैसा प्रळयकाळ मांडला | तैसा हाहाकारु जाहला | तिहीं लोकीं //
सूर्य दिवसाच थांबला आणि प्रळयकाळचे वेळेप्रमाणे तीन्ही लोकात हाहाकार उडून गेला.
तें देखोनि आदिपुरुषु विस्मितु | म्हणे झणें होय पां अंतु | मग लोपिला अद्भुतु | संभ्रमु तो //
तें पाहून भगवान श्रीकृष्ण फार विस्मित झाले, आणि कदाचित सृष्टीचा अंत होईल, असे जाणून, त्यांनी तो आवेशयुक्त शंखनाद थांबवला.
म्हणौनि विश्व सांवरलें | एर्‍हवीं युगान्त होतें वोडवलें | जैं महाशंख आस्फुरिले | कृष्णादिकीं //
म्हणूनच हे जग वाचले, नाही तर कृष्णादिकांनी जेव्हा शंख वाजविले, तेव्हाच त्याचा अंत होण्याची वेळ आली होती.
तो घोष तरी उपसंहरला | परी पडिसाद होता राहिला | तेणें दळभार विध्वंसिला | कौरवांचा //
तो शंखनाद थांबला, पण त्याचा जो प्रतिध्वनी घुमत होता, त्या योगाने कौरवसैन्याची दाणादाण झाली,
जैसा गजघटाआंतु | सिंह लीला विदारितु | तैसा हृदयातें भेदितु | कौरवांचिया //
ज्याप्रमाणे सिंह हत्तीच्या समुदायाचे विदारण करितो, त्याप्रमाणे त्या प्रतिध्वनीने कौरवांची हृदये विदीर्ण केली.
तो गाजत जंव आइकती | तंव उभेचि हियें घालिती | एकमेकांतें म्हणती | सावध रे सावध //
तो ध्वनि ऐकून उभ्याउभ्याच सर्वांचे धैर्य सुटले आणि एकमेकांस सावध रे सावध असे म्हणू लागले.
तेथ बळें प्रौढीपुरते | महारथी वीर होते | तिहीं पुनरपि दळातें | आवरिलें //
त्या ठिकाणी, शक्तीने व पुरुषार्थाने युक्त असे जे महारथी होते, त्यांनी सैन्याला पुनः धीर देऊन सावरले.