घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

ऐसे हे रणीं वधावे । मग आपण राज्यसुख भोगावें । तें मना नये आघवें । जीवितेसीं ॥
अशांना युद्धात मारून मग आपण राज्यसुख भोगावे ही गोष्ट माझ्या मनात प्राण गेला तरी येणार नाही.
हें येणें मानें दुर्धर । जे याहीहुनी भोग सधर । ते असतु येथवर । भिक्षा मागतां भली ॥
इतके हे कृत्य अवघड आहे. याच्यापेक्षा राज्योपभोग श्रेष्ठ असतील तर असोत बिचारे! पण त्यापेक्षा भिक्षा मागणेच बरे!
ना तरी देशत्यागें जाइजे । कां गिरिकंदर सेविजे । परी शस्त्र आतां न धरिजे । इयांवरी ॥
नाहीपेक्षा देशत्याग करावा अथवा डोंगरदर्‍यात जाऊन रहावे; परंतु यांजवर आता शस्त्र म्हणून धरू नये.
देवा नवनिशतीशरीं । वावरोनी यांच्या जिव्हारीं । भोग गिंवसावे रुधिरीं । बुडाले जे ॥
देवा, नवीन पाजळलेल्या बाणांनी यांच्या मर्मस्थानी प्रहार करून त्यांच्या रक्तात बुडालेले भोग आम्ही शोधीत बसावे काय?
ते काढूनि काय किजती? । लिप्त केवीं सेविजती? । मज नये हे उपपत्ती । याचिलागीं ॥
ते प्राप्त करून ते रक्तांत बुडालेले भोग बाहेर काढून काय करावयाचे आहे! रक्ताने माखलेल्या त्या भोगाचे सेवन आम्ही कसे करावे ! म्हणूनच ही गोष्ट माझ्या मनास पटत नाही.
ऐसें अर्जुन तिये अवसरीं । म्हणे श्रीकृष्णा अवधारीं । परी तें मना नयेचि मुरारी । आइकोनियां ॥
अर्जुन त्या वेळेस श्रीकृष्णास म्हणाला,‘देवा, आपण या गोष्टीचा विचार करा.’ पण अर्जुनाचे हे भाषण ऐकून श्रीकृष्णास ठीक वाटले नाही.
हें जाणोनि पार्थु बिहाला । मग पुनरपि बोलों लागला । म्हणे देवो कां चित्त या बोला । देतीचिना ॥
असे पाहून अर्जुन आपल्या मनात भिऊन पुन: म्हणाला:- ‘देवा, माझ्या बोलण्याकडे आपण लक्ष का देत नाही?’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -