घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

येर्‍हवीं माझ्यां चित्तीं जें होतें । तें मी विचारूनि बोलिलों एथें । परी निकें काय यापरौतें । तें तुम्हीं जाणा ॥
बाकी माझ्या मनात जे होते, ते मी इथे सविस्तर सांगितले; परंतु यापेक्षा खरे काय ते तुम्हांसच माहीत.
पै विरु जयांसी ऐकिजे । आणि या बोलींचि प्राणु सांडिजे । ते एथ संग्रामव्याजें । उभे आहाती ॥
हे पहा- ज्यांच्याशी आमचे वैर आहे ही अक्षरे ऐकल्याबरोबर आम्ही प्राण सोडावे, तेच रणभूमीवर युद्ध करण्याकरिता उभे आहेत.
आतां ऐसियांतें वधावें । कीं अव्हेरूनियां निघावें । या दोहींमाजीं बरवें । ते नेणों आम्ही ॥
तर यांना मारावे किंवा सोडून निघून जावे, या दोहोंमध्ये चांगली गोष्ट कोणती, हे आम्हांला समजत नाही.
आम्हां काय उचित । ते पाहतां न स्फुरे एथ । जे मोहें येणें चित्त । व्याकुळ माझें ॥
आम्हास कोणती गोष्ट करणे योग्य आहे, हे विचार करूनही याप्रसंगी आम्हास सुचत नाही; कारण या मोहाने चित्त व्याकुळ झाले आहे.
तिमिरावरुद्ध जैसें । दृष्टीचें तेज भ्रंशे । मग पासींच असतां न दिसे । वस्तुजात ॥
तिमिररोगाने नेत्रांची शक्ती जशी क्षीण होते आणि मग जवळ असलेलाही कोणताच पदार्थ दिसत नाही.
देवा तैसें मज जाहलें । जें मन हें भ्रांती ग्रासिलें । आतां काय हित आपुलें । तेंही नेणें ॥
त्याप्रमाणे देवा, माझी स्थिती झाली आहे. माझे मन भ्रमाने ग्रासून गेले असून आपले हित कशात आहे तेही मला या वेळी समजत नाही.
तरी श्रीकृष्णा तुवां जाणावें । निकें तें आम्हां सांगावें । जे सखा सर्वस्व आघवें । आम्हांसि तूं ॥
तर श्रीकृष्णा, आपण विचार करून खरे असेल ते आम्हाला सांगा; कारण, आमचे इष्टमित्र वगैरे सर्वस्व आपण आहात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -