घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

जैसीं बीजें सर्वथा आहाळलीं । तीं सुक्षेत्रीं जर्‍ही पेरिलीं । तरी न विरूढती सिंचिलीं । आवडे तैसीं ॥
ज्याप्रमाणे भाजलेले बी कितीही उत्तम जमिनीत पेरले व त्यास मनमुराद पाणी घातले तरी उगवत नाही.
तैसें राज्यभोगसमृद्धि । उज्जीवन नोहे जीव बुद्धि । एथ जिव्हाळा कृपानिधि । कारुण्य तुझें ॥
त्याप्रमाणे मला सर्व राज्यभोग व संपत्ती प्राप्त झाली तरी या मोहातून पार पडण्यास त्यांचा अजिबात उपयोग होणार नाही. तर हे कृपानिधी, तुझ्या कृपेचा जिव्हाळाच उपयोगी पडेल.
ऐसें अर्जुन तेथ बोलिला । जंव क्षणएक भ्रांती सांडिला । मग पुनरपि व्यापिला । उर्मी तेणें ॥
याप्रमाणे, क्षणभर भ्रम दूर झाल्यामुळे अर्जुन त्या ठिकाणी बोलला; परंतु त्याला पुनः मोहाने झपाटले.
कीं मज पाहता उर्मी नोहे । हें अनारिसें गमत आहे । तो ग्रासिला महामोहें । काळसर्पें ॥
या अर्जुनाच्या स्थितीवर महाराज असे रूपक करितात की, याला मोहाची लहर नसून हा काही निराळाच प्रकार असावा असे मला वाटते; तो कोणता म्हणाल तर, मोहरूपी काळसर्पाने अर्जुनास ग्रासले;
सवर्म हृदयकल्हारीं । तेथ कारुण्यवेळेच्या भरीं । लागला म्हणोनि लहरी । भांजेचिना?॥
आणि हृदयकमलात कारुण्याची उकळी आहे अशी संधि साधून मर्मस्थानी दंश केला असता, त्यास लहरीवर लहरी येऊन झेंडू फुटणार नाही काय?
हें जाणोनि ऐसी प्रौढी । जो दृष्टिसवेंचि विष फेडी । तो धावया श्रीहरी गारुडी । पातला कीं ॥
असा प्रसंग पाहून, ज्याच्या कृपादृष्टीने विष नाहीसे होते असे ज्याचे ऐश्वर्य तो कृष्णरूपी गारुडी त्याचे रक्षण करण्याकरिता धावून आला.
तैसिया पंडुकुमरा व्याकुळा । मिरवतसे श्रीकृष्णा जवळा । तो कृपावशें अवलीळा । रक्षील आतां ॥
तेव्हा अर्जुन श्रीकृष्णाजवळ मोहाने व्याप्त झालेल्या स्थितीत शोभू लागला. त्याचे तो श्रीकृष्ण आपल्या कृपेने आता सहज रक्षण करील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -