Eco friendly bappa Competition
घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तें आदि नाहीं खंडलें । समुद्रीं तरी असे मीनलें । आणि जातचि मध्यें उरलें । दिसे जैसें ॥
ते गंगेचे पाणी उगमाच्या ठिकाणी अखंड असते, पुढे ते सागराला जाऊन मिळते आणि जात असताना मध्ये वाहत्या प्रवाहातही ते जसे पाणीच दिसते;
इयें तिन्ही तयापरी । सरसींच सदा अवधारीं । भूतांसि कवणीं अवसरीं । ठाकतीना ॥
त्याप्रमाणे प्राणिमात्रांस उत्पत्ती, स्थिती व लय ही तीनही नेहमीसारखीच आहेत. त्यांचा प्रवाह अखंड राहतो असे समज.
म्हणौनि हें आघवें । एथ तुज नलगे शोचावें । जे स्थितीचि हे स्वभावें । अनादि ऐसी ॥
म्हणून तू यांतील कोणाकरिताच दुःख करू नकोस. कारण स्वभावतच हा असा अनादिसिद्ध सृष्टिक्रम आहे.
ना तरी हें अर्जुना । नयेचि तुझिया मना । जे देखोनि लोकु अधीना । जन्मक्षया ॥
हे तुझ्या मनाला पटत नसेल तर प्रणिमात्र जन्ममरणाच्या अधीन आहेत असे पाहून
तरी एथ कांहीं । तुज शोकासि कारण नाहीं । हे जन्ममृत्यू पाहीं । अपरिहर ॥
तरी यांतील कोणाविषयीच तुला दुःख करण्याचे कारण नाही. हे जन्म-मृत्यू अटळ आहेत, असे तू समज.
उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे । हें घटिकायंत्र जैसें । परिभ्रमे गा ॥
जन्मास आले ते नाश पावणार व नाश पावलेले पुनः जन्मास येणार ही जन्ममरणपरंपरा रहाटगाडग्याप्रमाणे सतत चालू आहे.
ना तरी उदो अस्तु आपैसें । अखंडित होत जात जैसे । हें जन्ममरण तैसें । अनिवार जगीं ॥
अथवा सूर्याचे उदयास्त ज्याप्रमाणे निरंतर होत असतात, त्याप्रमाणे या जगात जन्ममरण अनिवार्य आहे.
महाप्रळय अवसरें । हें त्रैलोक्यही संहरे । म्हणौनि हा न परिहरे । आदि अंतु ॥
महाप्रलयकाली या त्रैलोक्याचाही संहार होतो, म्हणूनच आदि व अंत हे अपरिहार्य आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -