घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

देखैं कामनाअभिभूत । होऊनि कर्में आचरत । ते केवळ भोगीं चित्त । देऊनियां ॥
हे पहा ते केवळ भोगाच्या लोभाने आसक्त झाल्यामुळे कर्मफळावर दृष्टी ठेवूनच सकाम कर्मे करतात,
क्रियाविशेषें बहुतें । न लोपिती विधीतें । निपुण होऊन धर्मातें । अनुष्ठिती ॥
अनेक प्रकारची विधियुक्त अनुष्ठाने करून ती शेवटास नेण्याकरिता फार दक्षतेने धर्माचरण करतात;
परी एकचि कुडें करिती । जे स्वर्गकामु मनीं धरिती । यज्ञपुरुषा चुकती । भोक्ता जो ॥
परंतु, अर्जुना, ते एकच गोष्ट फार वाईट करतात. ती ही की, ते मनामध्ये स्वर्गाची इच्छा धारण करतात आणि यज्ञभोक्ता जो ईश्वर त्याला विसरतात.
जैसा कर्पूराचा राशी कीजे । मग अग्नि लाऊन दीजे । कां मिष्टान्नीं संचरविजे । काळकूट ॥
ज्याप्रमाणे कापुराचा ढीग करावा आणि त्याला आग लावून द्यावी, अथवा मिष्टान्नात काळकूट विष मिसळावे.
दैवें अमृतकुंभ जोडला । तो पायें हाणोनि उलंडिला । तैसा नासिती धर्मु निपजला । हेतुकपणें ॥
किंवा दैवयोगाने मिळालेला अमृताचा कुंभ पायाने लवंडून द्यावा, त्याप्रमाणे संपादन केलेला धर्म फलप्राप्तीच्या इच्छेने वाया घालवितात.
सायासें पुण्य अर्जिजे । मग संसारु कां अपेक्षिजे? । परी नेणती ते काय कीजे । अप्राप्य देखै ॥
असे पहा की, मोठ्या श्रमाने पुण्य संपादन करावे, मग संसाराची इच्छा का धरावी? परंतु काय करावे, हे त्या अज्ञानी लोकांना माहीत नसते.
जैसी रांधवणी रससोय निकी । करूनियां मोलें विकी । तैसा भोगासाठीं अविवेकी । धाडिती धर्मु ॥
ज्याप्रमाणे उत्तम स्वयंपाकीण नानातर्‍हेचा चांगला स्वयंपाक तयार करून तो मोल घेऊन विकते, त्याप्रमाणे अविचारी लोक सुखोपभोगासाठी धर्म गमवितात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -