घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

हां गा उपदेशु जरी ऐसा । तरी अपभ्रंशु तो कैसा । आतां पुरला आम्हां धिंवसा । आत्मबोधाचा ॥
अज्ञान घालविण्याकरिता जर असा संदिग्ध उपदेश कराल, तर याहून निराळा भ्रम तो कोणता? आता आमची आपणापासून आत्मबोध करून घेण्याची इच्छा पूर्ण झाली म्हणावयाची!
वैद्यु पथ्य वारूनि जाये । मग जरी आपणचि विष सुये । तरी रोगिया कैसेनि जिये । सांगै मज ॥
मला सांगा की, वैद्य हा रोग्याची प्रकृती पाहून त्यावर पथ्याची योजना करून गेल्यावर जर आपण होऊनच औषधात विष घालील, तर रोग्याने जगावे कसे?
जैसें आंधळें सुइजे आव्हांटा । कां माजवण दीजे मर्कटा । तैसा उपदेशु हा गोमटा । वोढवला आम्हां ॥
ज्याप्रमाणे आंधळ्यास आडवाटेला लावावे किंवा या माकडाला मद्य पाजावे, तसा आपला हा उत्तम उपदेश आम्हांस चांगलाच फळला!
मी आधींचि कांहीं नेणें । वरी कवळिलों मोहें येणें । श्रीकृष्णा विवेकु या कारणें । पुसिला तुज ॥
देवा, असे पहा, मला आधीच काही समजत नाही, त्यातूनच मी त्या मोहाने ग्रस्त झालो आहे, म्हणून तुम्हाला विचाराची गोष्ट पुसली;
तंव तुझी एकेक नवाई । एथ उपदेशामाजीं गोवाई । तरी अनुसरलिया काई । ऐसें कीजे? ॥
तो तुमचे आपले एकेक नवलच ! तुमच्या उपदेशात साराच घोटाळा! तर शरणागताशी असे का वागावयाचे!
आम्हीं तनुमनुजीवें । तुझिया बोला वोटंगावें । आणि तुवांचि ऐसें करावें । तरी सरलें म्हण ॥
आम्ही कायावाचामने करून आपल्या बोलण्यावर भरवसा ठेवावा आणि तुम्हीच जर असे करू लागला तर मग आटोपलेच म्हणावयाचे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -