घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

मग आणिकही या योगातें । राजर्षि जाहले जाणते । परि तेथोनि आतां सांप्रतें । नेणिजे कोण्हीं ॥
पुढे आणखीही काही राजर्षीना हा योग माहीत होता, परंतु आता अलीकडे तो फारसा कोणी जाणत नाही.
जे प्राणियां कामीं भरु । देहाचिवरी आदरु । म्हणौनि पडिला विसरु । आत्मबोधाचा ॥
कारण, प्राणिमात्राची आवड विषयसेवनाविषयी असून देहावरच विशेष प्रेम असल्यामुळे त्यांना आत्मबोधाचा विसर पडला.
अव्हांटलिया आस्थाबुद्धि । विषयसुखचि परमावधि । जीवु तैसा उपाधि । आवडे लोकां ॥
आस्तिकबुद्धि आडमार्गाने गेल्यामुळे विषयसुख म्हणजेच इतिकर्तव्यता असे लोकांना वाटून, ते जीवाप्रमाणेच विषयरूप उपाधीवर प्रेम करू लागले!
एर्‍हवीं तरी खवणेयांच्या गांवीं । पाटाउवें काय करावीं । सांगैं जात्यंधा रवी । काय आथी ॥
असे पहा, दिगंबराच्या गावात उंची वस्त्राची चाड काय असणार? किंवा जन्मांधाला सूर्याचा काय उपयोग सांग बरे?
कां बहिरयांच्या आस्थानीं । कवण गीतातें मानी? । कीं कोल्हेया चांदणीं । आवडी उपजे? ॥
किंवा बहिर्‍यांच्या सभेत गाण्याला कोण मान देईल? अथवा कोल्ह्याला चांदण्यापासून कसा आनंद होईल?
पैं चंद्रोदया आरौतें । जयांचे डोळे फुटती असते । ते काउळे केवीं चंद्रातें । वोळखती? ॥
तसेच, चंद्रोदयापूर्वी ज्यांचे डोळे फुटतात मिटतात ते कावळे चंद्रास कसे ओळखतील?
तैसीं वैराग्याची शिंव न देखती । जें विवेकाची भाषा नेणती? । ते मूर्ख केवीं पावती । मज ईश्वरातें? ॥
त्याचप्रमाणे ज्यांनी वैराग्याची शीवसुद्धा पाहिली नाही आणि ज्यांना विचाराचे नावदेखील माहीत नाही, त्या मूर्खांना मग परमेश्वराचा लाभ कसा होईल?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -