घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

यालागीं मृत्यूच्या भागीं जें जें । तेंही पैं रूप माझें । आणि न मरतें तंव सहजें । मीचि आहें ॥
याकरिता मृत्यूच्या वाट्याला आलेली जी जी रूपे आहेत ती ती माझीच आहेत आणि न मरणारे तर सहज माझेच रूप आहे.
आतां बहु बोलोनि सांगावें । तें एकिहेळां घे पां आघवें । तरी सतासतही जाणावें । मीचि पैं गा ॥
आता फार बोलून काय सांगावे! सर्व तुला एकदाच सांगतो की, सत् व असत् म्हणजे खरी व खोटी अशी दोन्ही रूपे माझीच आहेत, असे जाण.
म्हणौनि अर्जुना मी नसें । ऐसा कवणु ठाव असे? । परि प्राणियांचें दैव कैसें । जे न देखती मातें ॥
म्हणून अर्जुना, मी नाही असे कोणते तरी ठिकाण आहे का? परंतु प्राण्यांचे दैव काय चमत्कारिक आहे की, ते मला पाहत नाहीत.
तरंग पाणियेविण सुकती? । रश्मि वातीविण न देखती! । तैसे मीचि ते मी नव्हती । विस्मो देखे ! ॥
ज्याप्रमाणे लाटा पाण्याशिवाय सुकाव्या किंवा सूर्यकिरण दिव्याच्या उजेडाशिवाय दिसू नयेत, त्याप्रमाणे सर्व जीव मीच बनलेला असून ते मला ओळखीत नाहीत, हे केवढे आश्चर्य आहे पाहा.
हें आंतबाहेर मियां कोंदलें । जग निखिल माझेंचि वोतिलें । कीं कैसें कर्म तयां आड आलें । जे मीचि नाहीं म्हणती ॥
या सकल विश्वात अंतर्बाह्य मीच भरलेला आहे व हे जग मद्रूपच आहे, परंतु जीवांचे कर्म कसे आड आले आहे की, ते मीच ‘नाही’ असे म्हणतात.
परि अमृतकुहां पडिजे । कां आपणयांतें कडिये काढिजे । ऐसे आथी काय कीजे । अप्राप्तासी ॥
परंतु अमृताच्या कुपांत पडल्यावर ज्याप्रमाणे एखादा मनुष्य आपण बाहेर निघण्याचा प्रयत्न करितो, तेव्हा तशा त्या अभाग्याला काय म्हणावे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -