गंगेचें उदक गंगे जैसें । अर्पिजे देवपितरोद्देशें । माझें मज देती तैसें । परि आनानीं भावी ॥
ज्याप्रमाणे गंगेचे पाणी देव व पितर यांच्या नावाने गंगेतच अर्पण करितात, त्याप्रमाणे ते माझे मलाच देतात, पण निराळ्या भावाने!
म्हणौनि ते पार्था । मातें न पवतीचि सर्वथा । मग मनीं वाहिली जे आस्था । तेथ आले ॥
म्हणून पार्था, ते कधीही मला पावत नाहीत व मनात जी इच्छा धारण करितात, त्या ठिकाणी जातात.
मनें वाचा करणीं । जयांचीं भजनें देवांचिया वाहणी । ते शरीर जातिये क्षणीं । देवचि जाले ॥
मन, वाचा व इंद्रिये यांच्या योगाने जे इंद्रादी देवांचे (देवतोद्देशाचे) भजन करितात, ते शरीर जाताक्षणीच देवरूप होतात.
अथवा पितरांचीं व्रतें । वाहती जयांचीं चित्तें । जीवित सरलिया तयांतें । पितृत्व वरी ॥
अथवा ज्याच्या मनाने पितरांची व्रते करण्याचे घेतले आहे, त्यांना मरणोत्तर पितृलोक प्राप्त होतो.
कां क्षुद्रदेवतादि भूतें । तियेचि जयांचीं परमदैवतें । जींहीं अभिचारिकीं तयांतें । उपासिलें ॥
किंवा वेताळादी पिशाच्च व क्षुद्र देव ही ज्यांची परम दैवते आहेत व ज्यांनी घातक अशा जारणमारण साधण्याकरिता त्यांची उपासना केली आहे.
तयां देहाची जवनिका फिटली । आणि भूतत्वाची प्राप्ति जाहली । एवं संकल्पवशें फळलीं । कर्में तयां ॥
त्यांना देहाचा पडदा पडताच (मेल्यावर) पिशाच्चयोनीची प्राप्ती होते. अशा प्रकारे त्यांच्या संकल्पाप्रमाणे त्यांची कर्मे त्यांना फळतात!
मग मीचि डोळां देखिला । जींहीं कानीं मीचि ऐकिला । मीचि मनीं भाविला । वानिला वाचा ॥
मग जे दृष्टीने मलाच पाहतात, कानांनी माझ्या नावाचेच श्रवण करितात, मनाने माझेच ध्यान करितात व वाचेने माझेच वर्णन करितात.
वाणी ज्ञानेश्वरांची
written By My Mahanagar Team
Mumbai
मागील लेख
पुढील लेख
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -