वाणी ज्ञानेश्वरांची

तें कारण मनीं धरिलें । मग सरोष बोलों आदरिलें । जैसें मातेच्या कोपीं थोकुलें । स्नेह आथी ॥
याच्या या भ्रमाचे कारण अज्ञान आहे, असा मनात निश्चय करून भगवान जणूकाही राग आल्याप्रमाणेच बोलू लागले. ज्याप्रमाणे आईच्या रागात प्रेम ओतप्रोत भरलेले असते,
कीं औषधाचिया कडुवटपणीं । जैसी अमृताची पुरवणी । ते आहाच न दिसे परी गुणीं । प्रकट होय ॥
किंवा औषधाच्या कडवटपणातच जशी अमृताची व्याप्ती असते, पण ती प्रत्यक्ष दिसत नाही तर ती गुणावरून प्रकट होते,
तैसीं वरिवरि पाहतां उदासें । आंत तरी अतिसुरसें । तियें वाक्यें हृषीकेशें । बोलों आदरिलीं ॥
त्याप्रमाणे, वरवर ऐकण्यास कठोर, परंतु परिणामी अत्यंत हितकर असे भाषण भगवान करू लागले.
मग अर्जुनातें म्हणितलें । आम्ही आजि हें नवल देखिलें । जें तुवां एथ आदरिलें । माझारींचि ॥
मग अर्जुनास म्हणतात :- आज आम्ही हे एक आश्चर्यच पाहत आहोत. या युद्धसमयी तू हे अकस्मात काय आरंभिले आहेस?
तूं जाणता तरी म्हणविसी । परी नेणिवेतें न संडिसी । आणि शिकवूं म्हणों तरी बोलसी । बहुंसाल नीति ॥
तू स्वतःला तर मोठा ज्ञानी म्हणवितोस, पण अज्ञान सोडीत नाहीस; बरे, तुला एखादी गोष्ट शिकवावी म्हटले, तर तू आम्हालाच शहाणपणाच्या गोष्टी सांगतोस,
जात्यंधा लागे पिसें । मग तें सैरा धांवे जैसें । तुझें शाहाणपण तैसें । दिसतसे ॥
जन्मांधाला वेड लागल्यावर तो जसा सैरावरा धावतो, तसेच तुझे हे शहाणपण दिसते.
तूं आपणपे तरी नेणसी । परी या कौरवांते शोचूं पहासी । हा बहु विस्मय आम्हांसी । पुढतपुढती ॥
तू स्वत:ला न जाणता कौरवांकरिता शोक करतोस, याबद्दल आम्हांस वारंवार आश्चर्य वाटते.