वाणी ज्ञानेश्वरांची

 

जैसें स्वप्नामाजीं देखिजे । तें स्वप्नींचि साच आपजे । मग चेऊनिया पाहिजे । तंव कांहीं नाहीं ॥
ज्याप्रमाणे स्वप्नातील गोष्टी स्वप्नांतच खर्‍या भासतात, परंतु जागे झाल्यावर पाहावे तो काहीएक नसते;
तैसी हे जाण माया । तूं भ्रमतु आहासी वायां । शस्त्रें हाणितलिया छाया । जैसी आंगीं न रूपे ॥
त्याप्रमाणे हे सर्व मायिक असून तू व्यर्थ भ्रमात पडला आहेस. अरे माणसाच्या सावलीवर शस्त्रप्रहार केला तर तो जसा त्याच्या अंगात रूपत नाही.
कां पूर्ण कुंभ उलंडला । तेथ बिंबाकारू दिसे भ्रंशला । परी भानु नाहीं नासला । तयासवें ॥
किंवा पाण्याने भरलेले भांडे पालथे केल्यावर त्यांतील सूर्यबिंब नाहीसे होते, परंतु त्याच्याबरोबर खरा सूर्य नष्ट होत नाही.
ना तरी मठीं आकाश जैसें । मठाकृती अवतरलें असे । तो भंगलिया आपैसें । स्वरूपचि ॥
अथवा बांधलेल्या घरात आकाश त्या घराच्या आकृतीचे दिसते; पण ते घर मोडल्यावर ज्याप्रमाणे त्याचे मूळ स्वरूपच राहते.
तैसें शरीराच्या लोपीं । सर्वथा नाशु नाहीं स्वरूपीं । म्हणौनि तूं हे नारोपीं । भ्रांति बापा ॥
त्याचप्रमाणे शरीर नाश पावले तरी आत्म्याचा कधीही नाश होत नाही; म्हणून बाबारे! तू हा जन्ममरणाचा नुसताच भ्रम आत्म्यावर आरोपू नको.
जैसें जीर्ण वस्त्र सांडिजे । मग नूतन वेढिजे । तैसें देहांतरातें स्वीकारिजे । चैतन्यनाथें ॥
मनुष्य ज्याप्रमाणे जुने झालेले वस्त्र टाकून नवे धारण करितो, त्याप्रमाणे हा आत्मा एक देह टाकून दुसर्‍या देहाचा स्वीकार करितो.
हा अनादि नित्यसिद्धु। निरुपाधि विशुद्धु । म्हणौनि शस्त्रादिकीं छेदु । न घडे यया ॥
हा आत्मा जन्ममरणरहित असून नित्य स्वतः सिद्ध आहे; व तो उपाधिरहित असून शुद्ध आहे; म्हणून, याचा शस्त्रादिकांनी घात होत नाही.