घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

यालागीं सुमनु आणि शुद्धमती । जो अनिंदकु अनन्यगती । पैं गा गौप्यही परी तयाप्रती । चावळिजे सुखें ॥
याकरिता प्रशस्त अंत:करणाचा, शुद्ध बुद्धीचा, निंदा न करणारा व एकनिष्ठ असा जर भक्त असेल, तर त्याला आपली मनातील गुप्त गोष्टही आनंदाने सांगावी,
तरि प्रस्तुत आतां गुणीं इहीं । तूंवांचून आणिक नाहीं । म्हणौनि गुज तरी तुझ्या ठायीं । लपऊं नये ॥
तर या गुणांनी नवसंपन्न असा सध्यातरी तुजवाचून कोणी नाही, म्हणून गुप्त अशी ही गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवणे योग्य नाही.
आतां किती नावानावा गूज । म्हणतां कानडें वाटेल तुज । तरि ज्ञान सांगेन सहज । विज्ञानेंसी ॥
आता वारंवार गुप्तगुप्त म्हणून वाखाणणी करण्याचा तुला कंटाळा येईल, म्हणून ते गुह्य प्रापंचिक ज्ञानासह ब्रह्मज्ञान सांगतो.
परि तेंचि ऐसेनि निवाडें । जैसें भेसळलें खरें कुडें । मग काढिजे फाडोवाडें । पारखूनियां ॥
परंतु खरे किंवा खोटे नाणे एके ठिकाणी मिसळल्यावर ज्याप्रमाणे फाडी लावून निराळे करितात, त्याप्रमाणे ज्ञान व विज्ञान निराळे करून दाखवितो.
कां चांचूचेनि सांडसें । खांडिजे पय पाणी राजहंसें । तुज ज्ञान विज्ञान तैसें । वांटूनि देऊं ॥
किंवा राजहंस आपल्या चोचीची सांडस करून दूध व पाणी निरनिराळे करितो, त्याप्रमाणे हे ज्ञान आणि विज्ञान तुला स्पष्ट विभाग करून सांगतो.
मग वारयाचिया धारसा । पडिन्नला कोंडा कां नुरेंचि जैसा । आणि कणांचा आपैसा । राशिवा जोडे ॥
म्हणजे मग कोंडा व धान्य वेगळे तरण्याकरिता वार्‍यावर धरले असता धान्याच्या खाली सहज रास होऊन कोंडा निराळा होतो.
तैसें जें जाणितलेयासाठीं । संसार संसाराचिये गांठीं । लाऊनि बैसवी पाटीं । मोक्षश्रियेच्या ॥
त्याप्रमाणे ते जाणल्याबरोबर शरीराची व जन्ममरणाची गाठ घालून मुमुक्षूस आत्मस्वरूपमोक्षैश्वर्याच्या पट्टावर नेऊन बसविते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -