घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

म्हणौनि परियेसी गा प्रियोत्तमा । यापरी मी विश्वेसीं विश्वात्मा । जो इया लटकिया भूतग्रामा । भाव्यु सदा ॥
म्हणून हे प्रियोत्तमा ऐक की, अशा प्रकारे मी सृष्टीचा विश्वात्मा किंवा खोट्या सृष्टीचा आधार, या कल्पना मिथ्या आहेत.
रश्मीचेनि आधारें जैसें । नव्हे तेंचि मृगजळ आभासे । माझ्यां ठायीं भूतजात तैसें । आणि मातेंही भावी ॥
ज्याप्रमाणे सूर्याच्या किरणांवर वास्तवात नसलेले मृगजळ आहेसे दिसते, त्याप्रमाणे माझ्या निर्गुणस्वरूपाचे ठिकाणी सर्व भूते आहेत अशी भावना करितात इतकेच नव्हे, तर मीही एक त्यांच्यामध्ये आहे अशी भावना करितात.
मी ये परीचा भूतभावनु । परि सर्व भूतांसि अभिन्नु । जैसी प्रभा आणि भानु । एकचि ते ॥
याप्रकारे करून मी भूतांची उत्पत्ती करितो असे म्हणतात, परंतु वास्तविक भूते आणि मी एकच. ज्याप्रमाणे सूर्य व सूर्याची प्रभा ही दोनही एक असतात.
हा आमुचा ऐश्वर्ययोगु । तुवां देखिला कीं चांगु?। आतां सांगे कांहीं एथ लागु । भूतभेदाचा असे? ॥
हा आमचा ऐश्वर्ययोग तुला चांगला समजला ना? तर आता सांग बरे की, मी व प्राणीमात्र यांच्यात काही तरी भेदाचा संबंध आहे काय?
यालागीं मजपासूनि भूतें । आनें नव्हती हें निरुतें । आणि भूतांवेगळिया मातें । कहींच न मनीं हो ! ॥
याकरिता माझ्याहून सर्व प्राणिमात्र खरोखर वेगळे नाहीत आणि मीही त्यांच्यापासून वेगळा आहे, असे कधीच समजू नको हो.
पैं गगन जेवढें जैसें । पवनुहि गगनीं तेवढाचि असे । सहजें हालविलिया वेगळा दिसे । एर्‍हवीं गगन तेंचि तो ॥
आकाशाचा जेवढा विस्तार आहे, तेवढा वारा भरून राहिलेला आहे, परंतु तो सहज हालवला तर आकाशापासून निराळा भासतो, एर्‍हवी आकाश तेच तो आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -