घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

देखैं खेळतां अग्नि लागला । मग तो न सांवरे जैसा उधवला । तैसा इंद्रियां लळा दिधला । भला नोहे ॥
हे पहा, बुद्धिपूर्वक नव्हे, परंतु सहज खेळताना जरी अग्नी लागला, तरी तो जसा भडकल्यावर आवरत नाही, तसे कौतुकाने इंद्रियांचे लाड पुरविणे चांगले नाही.
एर्‍हवीं तरी अर्जुना । या शरीरा पराधीना । कां नाना भोगरचना । मेळवावी ॥
अर्जुना, वास्तविक पाहता हे शरीर पराधीन (गुणाधीन) जर आहे, तर त्याच्याकरिता यत्नाने विषयोपभोग मिळविण्याची खटपट का करावी?
आपण सायासेंकरूनि बहुतें । सकळही समृद्धिजातें । उदोअस्तु या देहातें । प्रतिपाळावें कां? ॥
पुष्कळ यत्न करून आणि सर्व गोष्टी संपादन करून या देहाचे अहोरात्र लालन का करावे?
सर्वस्वें शिणोनि एथें । अर्जवावीं संपत्तिजातें । तेणें स्वधर्मु सांडूनि देहातें । पोखावें काई ॥
या ठिकाणी सर्व परिश्रम करून पुष्कळ संपत्ती मिळवून व धर्माचा त्याग करून केवळ देहाचे पोषण करावे का?
मग हें तंव पांचमेळावा । शेखीं अनुसरेल पंचत्वा । ते वेळीं केला कें गिंवसावा । शीणु आपुला ॥
मग हे पंचतत्त्वाचे झालेले शरीर शेवटी पंचतत्त्वातच जाऊन मिळाल्यावर त्या वेळी आपण केलेली खटपट कोठे शोधीत बसावे?
म्हणौनि केवळ देहभरण । ते जाणें उघडी नागवण । यालागीं एथ अंत:करण । देयावेंना ॥
म्हणून केवळ शरीरपोषण करणे म्हणजे प्रत्यक्ष हानी आहे, असे समज. याकरिता, त्याच विचारांत सर्व लक्ष ठेवू नये.
एर्‍हवीं इंद्रियांचियां अर्था । सारिखा विषयो पोखितां । संतोषु कीर चित्ता । आपजेल ॥
विषयसेवनापासून प्रत्यक्ष सुख प्राप्त होत असता, त्यात सुख नाही, हे म्हणणे योग्य नाही, असे तुला वाटल्यास, सहज विचार केला असता, इंद्रियांना आवडेल त्याच विषयांचे सेवन केले, तर मनाला समाधान होईल, हे खरे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -